फडणविसांचे अंतिम ध्येय काय?-सुरेश खोपडे
कोण म्हणतो देवेंद्रजीने पोलीस दल आणि शासन बिघडविले , नासविले? मुळीच नाही! खरे तर देवेंद्र फडणवीस हा स्वतःचे आणि स्व जमातीच्या जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी पेटलेला एक गृहमंत्री!
फडणविसांचे अंतिम ध्येय काय?
शासन म्हणजे नक्की कोण? रस्त्यावर युनिफॉर्म मध्ये उभा असलेला पोलीस! कायद्याचे राज्य म्हणजे काय?
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कॉन्व्हायला हात दाखवून थांबविण्याचे किंवा योग्य दिशा
दाखवण्याचे काम तो पोलीस करतो आणि त्याला ते अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत.
अशा या महाराष्ट्रातील पोलीस दलाची अवस्था काय आहे?
पब मधून पार्टी करून आपल्या अलिशान गाडीने अनेक गाड्या उडविल्या लोकांना जखमी केले पण गाडीवान गृह मंत्र्यांच्या ‘ पार्टी विथ डीफरणस ‘ या भाजपच्या अध्यक्षांचा मुलगा असल्याने ना नोंद ना कारवाई!
शिवरायांचा पुतळा कोलमडून पडलेल्या राजकोट किल्ल्या जवळ जमलेल्या दोन गटांना शांत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला भाजपचा एक माजी खासदार दमबाजी करताना पाहिले तेव्हा राज्य घटनेच्या चौकटीत सन्मानाने काम करणाऱ्या माझ्या सारख्या असंख्य पोलिसांच्या डोक्याला झिनझिण्या आल्या.
पुण्यात शांतता प्रस्तापित करायला गेलेल्या एका असिस्टंट पोलीस इन्सपेक्टर वर कोयत्याने प्राण घातक हल्ला करण्यात आला.त्याअगोदर एका ट्रॅफिक पोलिसाच्या पोटात लाथ मारण्यात आली होती. तर एका पोलीस स्टेशन मध्ये पोलिसावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न झाला होता . नितेश राणे नावाचे लोकप्रतिनिधी तर गृह मंत्र्यांचा हवाला देत उघड उघड पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांना अपशब्द वापरत धमकी देताना पहायला मिळाले.
पोलिसाला कुणी पोलीस मानत नाहीत.आणि आयपीएस अधिकारी अधिकाऱ्या सारखे वागतही नाहीत काय झालं या पोलीस दलाला?
आशुतोष डुंबरे हे एक संवेदनाक्षम आयपीएस अधिकारी असताना त्यांच्या अधिपत्या खालील बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यास दिरंगाई का केली?
मिरज वरून एका वकिलाचा फोन आला होता. जगदीश काबरे यांच्या दारात पोलिसांची तुकडी उभी आहे त्यांना ताब्यात घेण्यासाठी. काबरे यांनी एक ऐतिहासिक संदर्भ असलेली पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. गडहिंग्लजला गुन्हा दाखल झाल्याबरोबर दोन तासाच्या आत
पोलीस काबरे यांच्या दारात उभे केले .मी विचारणा केल्यावर कोल्हापूर पोलीस म्हटले “आमच्या एस पी चा तगादा आहे”. कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना एवढी घाई का झाली होती?
पुणे विद्यापीठात रामायनावर शैक्षणिक नाट्य प्रयोग चालू होता. फडणवीस यांच्या विध्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कलाकार, प्राध्यापकाला मारहाण करून मुलींचा विनय भंग केला.एका कलाकार मुलीच्या खांद्यावर पाय देऊन एक आर्धी चड्डी वाला स्टेजवर चढला. त्यात माझ्या वारकरी मित्राची मुलगीही होती. पुणे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी विध्यार्थी व प्राध्यापकावर गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस कोठडीत डांबले. भारतीय राज्यघटनेत अशी तरतूद नाही. ती मनुच्या कायद्यात आहे!
मनोहर भिडे विरुद्ध अनेक फिर्यादी दाखला आहेत.पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला भिडेना हात लावत नाही. ती नागपूरच्या रेशीम बागेतील सूचना पाळते! आर एस एस ने बेकायदा शस्त्र साठा केलेला आहे याची तक्रार नागपूर कोतवाली पोलीस स्टेशनला ऑक्टोबर 2018 साली मी दिलेली आहे.त्यावेळी भूषण उपाध्याय हे पोलीस कमिशनर होते. ती का नोंदवून घेतलेली नाही म्हणून चौकशी करण्यास गेलो असता उपाध्याय दोन दिवस कार्यालयातून गायब झाले. तत्कालीन महासंचालक सुबोध जयस्वाल यांची अपॉइंटमेंट घेऊन दोनदा मुंबई कार्यालयात गेलो पण ते अचानक कार्यालयातून फरार झाले. आम्ही एकत्र काम केलेले होते. माझी तक्रार का नोंदविली नाही याचे माझ्या नजरेला नजर देवून उत्तर देण्याचे धाडस त्याच्या मधे नव्हते. असा पळपुटा अधिकारी आता भारताची सीबीआय सांभाळत आहे. नंतर आलेले रजनीश शेठ यांनी आश्वासन देऊन ते पाळलेच नाही. त्यांना लोकसेवा आयोगाची मलिद्याची पोस्ट मिळाली.
नोकरीच्या काळात अनेक गृहमंत्री पाहिले.
प्रत्येक गृहमंत्र्याचा ढोबळपणे पुढील उद्देश आढळला.
*प्रत्येकाला वाटले की गृहमंत्री पद हे किमान पाच वर्ष टिकावे. पुढे मुख्यमंत्रीपद मिळावे.ते नाहीच मिळाले तर किमान मंत्रीपदाची खुर्ची आयुष्यभर टिकावी. यासाठी ते मालदार पोस्टवर आपल्या जातभाईंना झुकते माप देताना आढळले. जातीचे पुरेसे मिळाले नाहीत तर रंग बदलणाऱ्यांना ते जवळ करतात. आपल्या गल्लीत(मतदार संघात)आपल्या पेक्षा सव्वाशेर तयार होवू नये, पुढच्या निवडणुकीची आर्थिक,मानवी साधन सामुग्री बळकट करणे, हाय कमांडला
सांभाळणे….वगैरे बाबीत रमलेले दिसले.
*काहींनी पोलीस दलाचे नीती धैर्य वाढविले.
*काहींनी पोलीस दलाला सामाजिक दृष्टी दिली.
*कांहिनी नेमणुका बदल्या मध्ये पैसा गोळा करून खात्याला भ्रष्ट चेहरा दिला.
*देवेंद्रने काय दिले?
देवेंद्र चा स्वतःचा असा अजेंडा आहे.त्यासाठी त्याने महत्त्वाच्या पोस्टवर रश्मी शुक्लासारख्या सुमार दर्जाच्या, विरोधकांचे संभाषण बेकायदा गुन्हेगार पद्धतीनें रेकॉर्ड करणाऱ्या, ब्राह्मणी अहमगंडाने पुरेपूर ग्रासलेल्या अधिकाऱ्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी नेमलेले आहे. भूषण उपाध्याय सुबोध जयस्वाल ,अमितेश कुमार, महेंद्र पंडित हे याच पठडीतील अधिकारी. निवृत्तीनंतरही प्रवीण दीक्षित, मकरंद रानडे सारखे आरएसएसच्या पठडीतील गाळीव अधिकारी महत्त्वाच्या पदावर नेमलेले आहेत.
बालपणापासून अर्धी चड्डी घालून शाखेत जाणारा, अभाविप मध्ये पुढारपन करणारा देवेंद्र हा सामान्यांच्या कल्याणासाठी राजकारणात आला हे साफ खोटे आहे! त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सहकारातील अगर इतर मोठी संस्था उभी केल्याचे ऐकिवात नाही. तो विधान सभेत जाहीरपणे सनातन धर्म की जय म्हणतो.सनातन धर्मात ब्राह्मण सत्व गुणी भूतलावरील देव आहे व इतर आम्हास शूद्र ठरवून रजोगुणी राक्षस आहोत असे सांगतो.
दोन हजार वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण केलेली ब्राह्मण श्रेष्ठत्व असलेली समाजव्यवस्था व राज्य संस्था होती. गांधीजींच्या नेतृत्वाखाली समता मानणारी राज्यघटना येणार या भीतीने याच आर्य ब्राह्मणांनी अर्धी चड्डी काळी टोपी व हातात लाठी घेऊन आरएसएस ची स्थापना केली. राज्यघटनेला व राष्ट्रध्वजाला विरोध केला. सुरुवातीच्या काळात तो राष्ट्र भावनेच्या प्रेरणेने पेटलेल्या पिढीने हाणून पाडला. पुढच्या पिढीला स्वातंत्र्य, त्याग, देश प्रेम अशा गोष्टींचा विसर पडला. सत्ता ही कौटुंबिक मालमत्ता ठरली. पण हे आर्य ब्राह्मण थांबले नाहीत. त्यांनी आज मितीस या आर्य ब्राह्मणांचा प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस याने ही राज्यघटना राबविणारी पोलीस हीच यंत्रणा आपली बटिक बनविली. आणि ब्राह्मणी वर्ण श्रेष्ठत्व कायम राखत बहुजनांचे शोषण करण्याचे काम सुरू केलेले आहे. थोडक्यात देवेंद्रजी व त्यांच्या मास्टर रेसला राज्य सत्तेवर ब्राह्मणी धर्म सत्तेचा अंकुश ठेवणारी राज्य व्यवस्था निर्माण करावयाची आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तर पोलीस दलाचे पूर्ण ब्राह्मणीकरण केले. ते इतक्या कुशलतेने केले की पोलीस अधिकारी आणि राजकारणी यांच्याही ते लक्षात आले नाही. यापूर्वी कोणत्याही धार्मिक उत्सवात युनिफॉर्म मध्ये पोलीस सार्वजनिक ठिकाणी मिरवणुकीमध्ये पब्लिक बरोबर नाचकाम करीत नसत .पण फडणीसांच्या काळात फिल्मी गाण्यावरती ब्राह्मणी श्रेष्ठत्व दाखविणाऱ्या धार्मिक मिरवणुकीत पोलीस कर्मचारी युनिफॉर्म मध्ये कंबर हलवताना दिसत होते. सर्व धर्मीयांच्या व हिंदूंच्या सर्व देवतांच्या मिरवणुकीत नाचताना दिसले असते तर शंका घेण्याचे कारण नव्हते. देवेंद्रजींनी महाराष्ट्र पोलिसांना दोनच कामे दिलेली आहेत.
गाईचे रक्षण आणि ब्राह्मणांचे संरक्षण करणे.
सर्व विरोधी पक्ष, साडे सत्यांनव टक्के बहुजन जनता यांना फक्त अडीच टक्के ब्राह्मण व त्याचा नेता आकाराने जगातील सर्वात मोठी, लिखित असलेल्या राज्य घटनेचे एकएक पान टरा टर फाडत या सर्वाना कसकाय निष्प्रभ, हतबल करून टाकतो?
ते पाहू या यथावकाश.
सुरेश खोपडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत