अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यावरून वाद

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील एका गावात वाद; दलित-सवर्ण संघर्ष
निर्माण झाला असून त्याचे पर्यावसान टायर जाळून रास्ता रोको आंदोलनात झाले आहे. संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अक्कलकोटच्या दक्षिण बाजूला असलेल्या नागणसूर गावात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यावरून दरवर्षी वाद होतो. गावात आंबेडकरी समाजाकडून डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करताना गावच्या वेशीतून मिरवणूक नेण्यास गावक-यांकडून विरोध होतो. वादाचे हेच प्रमुख कारण आहे. यापूर्वी याच कारणावरून गावात हाणामारीचे प्रकार घडले होते. विशेषतः मिरवणुकीत उधळलेला निळा रंग रस्त्याच्या कडेला घरांसमोर उभ्या राहिलेल्या महिलांच्या अंगावर पडल्याच्या कारणावरून सवर्ण-दलित संघर्ष झाला होता. गेल्या २०१४ सालापासून गावात डॉ. आंबेडकर जयंती साजरी झाली नव्हती.
या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यास पोलिसांनी सुरूवातीला परवानगी नाकारली होती. परवानगी मिळण्यासाठी गावातील आंबेडकरी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची भेट घेतली असता शेवटी प्रातिनिधिक स्वरूपात केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाची मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सकाळी पाच व्यक्तींनी प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाची मिरवणूक काढली. परंतु या मिरवणुकीला विरोध करीत गावातील सवर्ण समाजाच्या मंडळींनी लगेचच गावातील चौकात एकत्र येऊन टायर जाळून ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या. पोलीस अधिकारी समजूत घालत असताना त्यांचे कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे गावात तणावाचे निर्माण होऊन संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. गावात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यास गावक-यांचा विरोध आहे, या गावात बहुसंख्येनेवीरशैव लिंगायत समाज राहतो. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद आहे. यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागणसुरात घडलेल्यि घटनेचे पडसाद निवडणूक प्रचारात उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत