राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ; पंजीबध्द का होत नाही ? – रणजित मेश्राम

देशात कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेविषयी सकारात्मक वा नकारात्मक मते असू शकतात. पण, हे संघटन देशाच्या सर्वोच्च चर्चेत आहे, हे स्वीकारावे लागेल.
अशी अपरिहार्य संघटना, सरकारी दप्तरी नोंदणीकृत वा पंजीबध्द नाही, ही बाब धक्का देऊन जाते.
का असे असेल ही उत्सुकता आता देशपातळीवर पसरत आहे. तीत नकारात्मकता मात्र वेगाने पसरते आहे.
येत्या २०२५ ला या संघटनेला शंभर वर्षे होतील. अर्थात, अनोंदणीची शंभरी हाही उच्चांक व्हावा !
जिथे लोकांशी, ध्येय उद्दिष्टांशी, पैशाशी, बंदोबस्ताशी, दानाशी, अनुदानाशी संबंध येतो त्या संघटनेची सरकार दरबारी नोंद असावी असा दंडक आहे. यापैकी एकाचा जरी संबंध येत असेल तरी ही नैतिक बाध्यता येते. याचसाठी ‘धर्मादाय आयुक्त’ (Charity Commission) या कार्यालयाची निर्मिती आहे.
नोंदणीकृत करतांना ‘ध्येय आणि उद्दिष्टे’सह सर्व लिखित स्वरूपात द्यावे लागते.
लोकशाही देशातील या बाध्यता आहेत ! तुमच्या मालकीचे साप्ताहिक वा पाक्षिक असले तरी, नावाची मान्यता सरकारकडून घ्यावीच लागते. एखादे आवडीचे नाव दुसऱ्या कुणाला मिळाले असेल तर ते घेता येत नाही.
इथे तर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ (आर एस एस) हे संघटनात्मक नाव सरकार दरबारी नोंदणीकृतच नाही. तोच तर हवाला दिला जातो. आता या नाव मालकीच्या कोर्ट कचेऱ्या वाचायला मिळतात.
हे सर्वश्रुत आहे की, संबधित संघटनेच्या (संघाच्या) प्रमुखांना, ८० सज्ज जवानांची ‘झेड प्लस’ सेवा उपलब्ध आहे. शिवाय नागपूर संघ मुख्यालयाला ‘सी वाय एस एफ’ सुरक्षा सेवा उपलब्ध असल्याचे समजते.
सेवा का दिली हा मुद्दा वेगळा. तो सत्तेचा विचार आहे. सरकारात नोंद नसतांना अशी सेवा देता येते काय, ही विचारणा होत असते.
चारित्र्य निर्माणाची पहिली बाब असल्याने अजुनही पुनर्विचार होऊ शकेल !
या संघटनेने असा पुनर्विचार याआधी केला आहे. आधी स्वयंसेवक, गणवेषात हाॅपपॅंट घालायचे. आता फुलपॅंट घालतात. आधी मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकत नसे. आता डौलाने फडकतो.
सनातन चे नेतृत्व करणारे बदलत नाहीतच, असेही नाही !
याशिवाय रा स्व संघ हे पितृक संघटन आहे. या संघटनेच्या प्रभावातून पन्नासेक विविध संघटना निर्माण झाल्यात. त्या विविध विषयभागात पूर्ण कार्यरत आहेत. त्या बहुधा सर्व पंजीबध्द आहेत.
मग पितृक संघटनेने तीच आचारसंहिता का स्वीकारु नये ? सत्ता येते .. जात असते .. !
० रणजित मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत