मी तुला ब्लॉक केलंय!

-विनायक सावळे.
( अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या एप्रिल 2025 च्या अंकात छापून आलेला माझा लेख आपण जरूर वाचावा आणि आपला प्रतिसाद कळवावा ही विनंती. 😊🙏🏽)
‘ ग्रोक ‘ नाव ऐकलंय ना? हे एक चॅट बॉट आहे. इलोन मस्क यांच्या कंपनीने हे विकसित केलेले. त्याची हुशारी म्हणजे,तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला ते माहितीपूर्ण, अधिकाधिक विश्वासनीय आणि वस्तुनिष्ठ उत्तर देते.अलीकडेच बीजेपी, सावरकर, आरएसएस,गोदी मीडिया अशा अनेक प्रश्नांना त्यांनी तंतोतंत वास्तविक उत्तरे दिली.
हे मी तुम्हाला का सांगतोय?तर मी एक प्रयोग केला.मी माझी संघटनात्मक हौस म्हणून प्रश्न विचारला, “सामाजिक संघटनेसाठी सर्वात महत्त्वाच्या 10 बाबी कोणत्या आहेत?”असा.
मग ग्रोक ने उत्तर दिलं.
1.समान ध्येय 2.प्रभावी नेतृत्व 3.संघटनेतील सदस्यांची एकजूट 4.संवाद आणि संपर्क 5.नियोजन 6.शिस्त आणि जबाबदारी 7.संसाधन व्यवस्थापन 8.संघर्ष निवारण क्षमता 9.समाज सहभाग आणि उपयोगिता 10.उपक्रम आणि सातत्याने प्रगती.
एवढंच सांगून ग्रोक महाशय थांबले नाहीत, तर शेवटी ते काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, ” ही मूलभूत तत्वे पाळल्यास कोणतीही सामाजिक संघटना यशस्वी आणि दीर्घकालीन प्रभाव टाकणारी ठरू शकते. “ ग्रोक महाशयांचा हा शेवट मला खूपच आवडला.
ग्रोक आता आपला मित्र झाला. संघटना म्हणून ग्रोक ची समज मला भावली. या दहाही बाबी संघटनेसाठी महत्त्वाच्या आहेत. मग मी अजून एक प्रयोग करायचा ठरवले. ग्रोक ला दुसरा प्रश्न विचारला, ” संघटनेसाठी सर्वात महत्त्वाच्या पाच बाबी कोणत्या?” म्हणजे मी आता दहा ऐवजी केवळ पाच बाबी विचारल्या.
मग ग्रोक ने उत्तर दिलं. 1.समान ध्येय 2.प्रभावी नेतृत्व 3.संवाद आणि संपर्क 4.संघटनेतील सदस्यांची एकजूट व सहकार्य 5.शिस्त आणि जबाबदारी
असं उत्तर देऊन त्याने आधी सारखाच शेवट केला.
माझा मोह संपेचना. मनात प्रचंड उत्सुकता. संघटना म्हणून यातूनही सर्वाधिक महत्त्वाचं काय असेल ? याचा मी शोध घ्यायचं ठरवलं.माझा ग्रोक मित्राला आता तिसरा प्रश्न.
“ग्रोक,मला सर्वात महत्त्वाच्या केवळ तीन गोष्टी सांग.”
ग्रोक उत्तरला. 1. समान ध्येय 2. प्रभावी नेतृत्व आणि 3. एकजूट आणि सहकार्य.
ग्रोक ने संघटनेचा विचार, त्याचे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांची एकजूट व सहकार्य याला महत्त्व दिलेले दिसून आलं. हा प्राधान्यक्रमही मला आवडला.
मग आता उत्सुकता राहिली ती यातील सर्वात महत्त्वाचे काय? अशी कोणती एकमेव गोष्ट आहे जी सामाजिक संघटनेला सर्वात महत्त्वाची असते? मोठ्या उत्सुकतेने मी ग्रोकला हे शेवटी विचारलेच. विचारता विचारता मनात काय उत्तर असू शकेल याचा अंदाजही घेत होतो. माझे उत्तर ‘समान ध्येय’ असे होते. समान ध्येय हे संघटनेला एकसंघ ठेवण्यासाठी व कृतिशील ठेवण्यासाठी सर्वात अधिक महत्त्वाचे आहे.ती सर्वोच्च प्रेरणा आहे,असावी याची मला खात्री होती.
पण साथी हो, उत्तर मात्र वेगळेच आले. ग्रोकच्या दृष्टीने सामाजिक संघटनेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ‘कार्यकर्त्यांची एकजूट आणि सहकार्य.’
त्याचं स्पष्टीकरण देताना ग्रोक सांगतो, ” संघटनेतील सदस्यांमध्ये एकजूट,समन्वय, परस्पर विश्वास आणि सहकार्य असेल तर ती संघटना कोणत्याही अडचणीवर मात करू शकते आणि आपले उद्दिष्ट साध्य करू शकते. संघटनेतील इतर सर्व घटक- नेतृत्व, ध्येय,नियोजन आणि शिस्त हे यशस्वी होण्यासाठी ही एकजूट आणि सहकार्य आवश्यक असते. उत्तर वाचून मी विचारात पडलो. विचार आणि ध्येय यांच्यापेक्षा ‘कार्यकर्त्यांची एकजूट आणि सहकार्य ‘अधिक महत्त्वाचे आहे, ही ग्रोकची भूमिका मला विचार प्रवर्तक वाटू लागली.
खरंतर संघटना चालवणे ही एक अत्यंत जटिल प्रक्रिया आहे. त्यात अनेक घटक काम करीत असतात. त्याचं एकमेव सूत्र सांगणे अर्थातच कठीण असते. पण तरीही ग्रोक चे उत्तर मला फार महत्त्वाचे वाटते.
संघटनेत ‘ सदस्याची एकजूट आणि सहकार्य ‘ हा कोणत्याही संघटनेचा पाया असतो. हा पाया मजबूत असणे आवश्यक असते. कारण याच बळावर आपल्याला संघटनेची इमारत उभी करता येते. हे मात्र सत्य आहे.
म्हणजे आता संघटनेतील एकजूट सहकार्य हे आपलं जर ध्येय आपण मानलं तर ते कसं प्राप्त होईल? किंवा त्याबद्दलची नेमकी स्थिती काय असते? याचा जरा विचार करू.
मी आधीच्या लेखात म्हटलेच आहे,” माणसे आली म्हणजे त्यांचे स्वभाव आले, आशा- अपेक्षा, महत्त्वाकांक्षा, लोभ, राजी-नाराजी, स्पर्धा हे सारे आलेच. हे अत्यंत नैसर्गिक आहे. परस्पर नात्यातील चढ उतार ही आलेत. यातून बोलणे कमी करणे, बोलणे टाळणे, केवळ कामाचेच बोलणे येथ पासून तर बोलणंच बंद करणे असेही आपल्यात घडते.
सोयीच्या,आवडीच्या माणसांशी अधिक संवाद, काही माणसांशी गरजेपुरता संवाद, काहींशी केवळ औपचारिक संवाद आणि ज्यांच्याशी जमत नाही त्यांच्याशी असंवाद असे काहीतरी, कुठेतरी घडतच असते. हे स्वाभाविक पण आहे. हे पूर्णतः आपण कोणीही टाळू शकत नाही. पण ही परिस्थिती कायम आणि मोठ्या प्रमाणात असली तर मात्र अडचण होणार. जेव्हा ही परिस्थिती जेथे आपण काम करतो,तेथे घडत असते तेव्हा तर प्रचंड अडचण तयार होते.एखादी व्यक्ती कोणाचेही सहकार्य न घेता स्वतःच प्रचंड काम करीत असेल, अन्य कोणाही सहकाऱ्याशी ते संवाद करीत नसेल, तर ते संघटना म्हणून अडचणीचे आहे.“एकट्यानेच महान काम करायचं की सगळ्यांनी मिळून छान काम करायचे? “तर संघटना म्हणून याचे उत्तर आहे, ” सगळ्यांनी मिळून छान काम करायचे. “ जेव्हा सगळ्यांनी मिळून छान काम करायचे असते.
अनेकदा न जमणाऱ्या व्यक्तीला बाजूला ठेवत आपलाच एक स्वतःचा गट तयार केला जातो. चर्चा, गप्पा, निर्णय, कामाचे वाटप हे आपल्याच सोयीच्या लोकांशी केले जाते. तेव्हाही संघटनेच्या संघटित पणाला तडा जातो आणि गटबाजी सुरू होते. असे जर होऊ द्यायचे नसेल तर चार गोष्टींची आवश्यकता असते: संवाद, समन्वय, विश्वास आणि सहकार्य. मग मी त्याच्याशी बोलणार नाही, माझे आणि त्याचे जमणार नाही, त्यांनी त्यांचे काम करावे, मी माझे काम करीन, तो असेल तर मी नसेल,मी एकटाच काम करीन, मी त्याला ब्लॉक केलंय असे पर्याय आपल्याला उपलब्ध नसतात.
मग काय अपेक्षा करता येईल? तर एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, इथं आपल्याला कायम आपल्या आवडीची, सोयीची,अनुकूल, आपल्याच मताची माणसं मिळत राहतील असं होणार नाही. कुठेही असे घडत नाही.
संघटना ही अनेक लोकांचा ग्रुप असतो.
आपले ध्येय, विचार एकच असले तरीही आपण सर्व एकाच साच्यातून बाहेर पडलेले नसतोच.
त्यामुळे आचार विचारात फरक राहणार आहेच हे गृहीत धरून काम करत राहणे आवश्यक आहे.
अशावेळी संघटनेच्या व्यापक हितासाठी तुम्हाला त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा असतो. आपण प्रत्येक जण वेगळे आहोत. आपली प्रत्येकाची परिस्थितीशी सामना करण्याची पद्धत,क्षमता वेगळी आहे. म्हणून अशा प्रकरणात कायम सगळ्यांनाच लागू पडेल असं एक सूत्र शोधणं कठीण आहे. मुळातच ते अनैसर्गिक आहे. मग आपल्याला काय विचार करता येईल? ज्याला संघटनेचे नेतृत्व करायचं असतं, किंवा जो संघटक कार्यकर्ता असतो त्याला संघटनेच्या हितासाठी,कामावर परिणाम होऊ नये म्हणून उपाय करावेच लागतात.त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील.
बऱ्याचदा आपण प्रामाणिकपणे काम करतो पण काही कारणांनी संबंध बिघडत जातात. त्याचा परिणाम आधी संवादावर होतो. नंतर तो कामावर दिसायला लागतो. सहभाग आणि सहकार्य हळूहळू कमी होत जाते.मग संघटित कामावर याचा परिणाम होतो. हे हळुवार घडत जाते. अनेकांच्या ते लक्षातही येत नाही. म्हणून यावर फार चर्चाही होत नाही.
संघटना जर यातून प्रभावित होऊ द्यायची नसेल तर काही गोष्टींचा निश्चितपणे आपल्याला विचार करता येतील.एक गोष्ट मात्र सत्य आहे, “सर्व ताण,समज, मनभेद बाजूला ठेवणे आणि सारे काही विसरून एकाद्याशी सामान्य व्यवहार करणे याला उच्च कोटीचा संयम आणि उदारता लागते.” म्हणून ज्यांच्याशी आपलं जमत नाही त्यांच्यासोबत काम करणं कधीकधी आव्हानात्मक असू शकतं. मला वाटतं आपण स्वतः आपल्या भावनांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू, त्याचवेळी संघटनेच्या व्यापक हिताचाही विचार करू.ज्यात स्वतःला कमीत कमी त्रास करून घेत, संघटनेचे अधिकाधिक हित कशात आहे असा काहीतरी मार्ग शोधू. याचं अंतिम कोणतंही सूत्र कोणाकडेही नाही.
पण काही व्यवहारिक पावले उचलून आपण ही परिस्थिती नक्की सांभाळू शकतो. त्यासाठी खाली काही टिप्स देत आहे.
1. स्पष्ट आणि प्रामाणिकपणे बोला :- सहकाऱ्याशी थेट आणि प्रामाणिक संवाद ठेवा. तुमच्या अपेक्षा, जबाबदारी स्पष्टपणे सांगा,जेणेकरून गैरसमज काढता येतील. त्यांचेही शांतपणे ऐकून घ्या.
2. व्यावसायिक भूमिका:- वैयक्तिक मतभेद राजी- नाराजी बाजूला ठेवून कामावर लक्ष केंद्रित करा.भावना काहीही असोत, संघटना अडचणीत येणार नाही यासाठी व्यावसायिक राहून कामावर बोला. आपल्या सहकार्यावर कोणताही परिणाम होऊ देऊ नका.
3. स्वतःची काळजी घ्या:- परिस्थिती अधिक तणावपूर्ण असेल,तर तुमच्या भावनिक- मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. मित्रांशी, कुटुंबाशी बोलून तुमचा तणाव कमी करा.
4. सीमा निश्चित करा:- जर संबंध खूप त्रासदायक असेल,तर तुमच्या सहकाऱ्याशी स्पष्ट सीमा ठरवा.
5. शिकणे आणि वाढणे:- प्रत्येक आव्हानातून शिकण्याची संधी असते.या अनुभवातून आपणास खूप शिकायला मिळेल, कदाचित धडा मिळेल, याचा उपयोग आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी नक्कीच होईल.
लक्षात घ्या, काळ हे देखील मोठे औषध असते, कदाचित काही उत्तरे काळ देईल.
सामाजिक संघटनेमध्ये स्वतःच्या मनाला सांभाळत, स्वतःच्या भावनांची काळजी घेत पण संघटनेच्या हितासाठी लढत राहणं, काम करीत राहणं ही खरंच एक कसरत असते. ही कसरत कधी जमते, तर कधी जमतही नाही. पण स्वतःशी बोलत ही कसरत करावी लागते. विसरणे ही देखील एक छान गोष्ट आहे.तसेच माफ करून पुढे जाणे कधीही श्रेयस्कर असते.काही गोष्टी विसरता आल्या तर पुढचा प्रवास अधिक सुखद होतो. अंधश्रद्धा निर्मूलनाचं क्षेत्र हे पिढ्यानपिढ्या
काम करावं लागणारं क्षेत्र आहे. डॉ. दाभोळकरांच्या शब्दात “ही शतकांची लढाई आहे.” या शतकांच्या लढाईतील काहीच वर्ष आपण ही विवेकाची बॅटन घेऊन धावत आहोत. 🏃♀️🏃आपलं धावणं झालं की ही बॅटन पुढे अनेकांच्या हातात द्यायची आहे. ताण,निराशा, अपेक्षाभंग या साऱ्यांवर मात करीत, वादळ वाऱ्यातही हा विवेकाचा नंदादीप तेवत ठेवायचा आहे.😊👍🏽🪔 नक्कीच जमेल आपल्याला, म्हणून तर गेली 36 वर्षे आपण अखंडपणे काम करतोय, या पुढेही असंच करत राहू.✊🏽👍🏽😊 इतकी विचारांची घुसळण करायला भाग पाडणाऱ्या त्या ग्रोक मित्राचेही धन्यवाद.😊👍🏽🙏🏽
विनायक सावळे,
राज्य सरचिटणीस.
(9403259226)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत