“आंबेडकरी विचारांची प्रचार यंत्रणा उभी करणे काळाची गरज “
राष्ट्रनायक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारत देशाला विकासाची , प्रगतीची , समतेची आणि मानवतेची दिशा देण्यासाठी आयुष्यभर कठोर संघर्ष केला. जात आणि धर्माच्या नावाने पसरलेली - पोसलेली विषारी विषमता नष्ट करून स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय या तत्त्वावर आधारित मानवी मूल्यांची जपवणूक करणारी लोकशाही व्यवस्था या देशात नांदावी म्हणून आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. जगातील सर्वात महान लिखित राज्यघटना निर्माण करून देशातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा , हक्क , अधिकार , संरक्षण देणारे संविधान निर्माण केले.
परंतु त्यांच्या या महान कार्याची ओळख या देशातून हळूहळू नष्ट होत आहे. त्यांचे तत्व , विचार नेस्तनाबूत होत आहेत की काय अशी चिंतादायक परिस्थिती देशात निर्माण होत आहे…झाली आहे. ही प्रक्रिया स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रतिगामी विचारांच्या लोकांनी सुरू केली आहे. 80 च्या दशकात त्यांना थोडे बळ मिळाले.90 नंतर त्यांना उभारी आली.त्यांची शक्ती वाढू लागली. पूर्वी ज्या गोष्टींना देशाच्या एकतेच्या विरुद्ध मानले जात होते. अशा गोष्टी बेधडकपणे केल्या जात आहे.
मनुवादी – सनातनी – धार्मिक कट्टरतेचे समर्थक भारताची न्यायिक तसेच संविधानिक व्यवस्था नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत.
त्याच प्रमाणे आंबेडकरी तत्वांच्या मार्गाने चालणे त्यांच्या अनुयायांना देखील अवघड वाटू लागले की काय…परंतु ते देखील या महामानवाच्या विचारांच्या विसंगत वर्तन करू लागले आहे.
अशा परिस्थितीत देशातील करोडोंच्या संख्येने असलेल्या आंबेडकरी समुहास नेमकी आपण काय भूमिका घेतली पाहिजे ? कोणते कार्य हाती घेतले पाहिजे…? कोणत्या दिशेने वाटचाल केली पाहिजे याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला दिसून येत आहे. सच्चे अनुयायी देखील डगमगू लागले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेवून , त्यांच्या नावाने संघटना चालवून , पक्ष निर्माण करून काम करणाऱ्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. एकजूट दिसून येत नाही. ही अवस्था देशासाठी व आंबेडकरी चा लाभ घेणाऱ्या हजारो जाती समुहांसाठी खूप घातक आहे , हे कोणीही अभ्यासू व समंजस व्यक्ती मान्य केल्याशिवाय राहणार नाही.
यासाठी राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास असणाऱ्या पिढ्या तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार करणारी , प्रसार करणारी व्यवस्था देशात उभी करणे हे कार्य आपण जितक्या लवकर शक्य आहे…तितक्या लवकर , वेगाने ,ताकदीने हाती घेणे हेच महत्वाचे आहे.
यासाठी त्यांनी सांगितल्या प्रमाणे बुद्ध विहारे ही चळवळीची केंद्रे बनली पाहिजे. त्यापुढे जाऊन आम्ही असे म्हणतो की , बुद्ध विहारे ही या महामानवाच्या विचारांच्या ,तत्त्वांचा अभ्यास देणारी केंद्रे झाली पाहिजेत. येणाऱ्या पिढ्यांना त्यांचे विचार समजून सांगणारी केंद्रे तयार झाली पाहिजेत. प्रशिक्षण केंद्रे तयार झाली पाहिजेत. त्यांच्या विचारांचा प्रसार करणारी यंत्रणा म्हणजे अशी चालती – बोलती आधुनिक बुद्ध विहारे निर्माण झाली पाहिजे.
यासाठी सर्वांनी आपल्या कुवतीनुसार वेळ , बुद्धी , निधी व कौशल्य समर्पित करून देशाचे आणि पर्यायाने स्वतःच्या पिढ्यांचे संरक्षण करणारी ही यंत्रणा उभी करण्यास हातभार लावला पाहिजे.
अन्यथा येणारा काळ फार बिकट असेल….आणि आम्ही जागरूक नव्हतो म्हणून येणारी पुढील पिढी आम्हाला नाकर्ती लोकं म्हणून दोष दिल्याशिवाय राहणार नाहीत.
आपला
धर्मभुषण बागुल
राज्याध्यक्ष
समता सैनिक दल
9921323281/7020558011
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत