निसर्गाने आपणास एक तोंड आणि दोन कान का दिले ?प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
आदर्श शिक्षक आणि राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी निर्मिकाची संकल्पना मांडली आहे. पण मी त्यापुढे जाऊन निसर्ग म्हणतो कारण मी नास्तिक आहे. नास्तिक हे निसर्ग मानतात निसर्ग हे वास्तव आहे. निसर्गात अनेक घटक असतात आणि त्यामुळे मानवाचे या पृथ्वीवरील आयुष्य जगणे सोपे झाले आहे. तथागत बुद्ध यांनी माणसाचा जन्म कसा होतो याबद्दल पंचमहाभूताने होतो आणि हे पृथ्वीवरील पाच घटक असतात असे मानले आहे ते म्हणजे पृथ्वी ,आप,तेज,वायु आणि आकाश या पंच महाभूताने आपले शरीर जन्म घेते आणि जेंव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळी पुन्हा आपले हे पाच घटक त्या प्रत्येक घटकाला जाऊन मिळतात आणि मग हे चक्र चालू असते आणि यामुळे बुद्धाने पुनर्जन्म नाकारला आहे ,आत्मा नाकारला आहे आणि मग इतर स्वर्ग ,नर्क या काल्पनिक बाबी सुद्धा नाकारल्या आहेत तथागत बुद्धाचा पुनर्जन्म या अर्थाने वेगळा आहे म्हणजे वैज्ञानिक आहे. हे पाच घटक प्रत्येक घटकाला जाऊन मिळतात आणि पुन्हा मानव जन्म होतो पण ते पाच घटक एकाच व्यक्तीचे नसतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मा नाकारला आहे. त्यामुळे एक वेगळी वैज्ञानिक मांडणी बुद्धाने केली आहे. बुद्ध हा असा वैज्ञानिक विचार करीत असल्यामुळे त्याला जगातील पहिला वैज्ञानिक म्हणतात. आणि त्यामुळे जगातील वैज्ञानिकांचा आदर्श तथागत बुद्ध आहे. अर्थात आपला आजचा लेखाचा विषय वेगळा आहे त्यामुळे यावर जास्त चर्चा करीत नाही. म्हणजे आपला जन्म होतो त्यावेळी आपणास एक तोंड असते आणि दोन कान असतात अर्थात इतरही अवयव असतात आणि कांही लोकांना जन्मताच काही समस्या सुद्धा असतात पण आजचा आपला तो विषय नाही तर इथे आपणास या दोनच अव्यवाबद्दल चर्चा करायची आहे की, एक तोंड आणि दोनच कान का असतात? याचे एक तार्किक विश्लेषण करायचे आहे.
साधारण बर्याच वर्षापूर्वी मी असे वाचले होते की, कोणत्याही माणसाला आपली प्रगती करायची असेल तर त्याला त्याच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात जास्त ऐकावे लागेल आणि मग त्यावर विचार करावा लागेल आणि आपल्या बुद्धीत वाढ झाल्यानंतर मग अनेक वर्षाने बोलावे लागेल किंवा लिहावे लागेल. अर्थात याचा अर्थ असा नाही की, माणसाने जीवनात सुरूवातीला काहीच बोलू नये म्हणजे आवश्यक आहे तिथे बोलावे पण जास्त बोलू नये. समजा एक विद्यार्थी आहे आणि तो शिक्षण घेत आहे तर त्याने वर्गात लक्षपूर्वक ऐकावे पण जर कांही शंका असेल तर शिक्षकांना विचारावे हे महत्वाचे आहे. म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथे बोलावे पण व्यर्थ बडबड करू नये हा सांगण्याचा उद्देश आहे. आपण एखाद्या सभागृहात एखादा अभ्यासू व्याखाता बोलत आहे तर हे तर निश्चित आहे की, आपण त्याला ऐकायला आलो आहोत म्हणजे त्याला दोन गोष्टी आपल्यापेक्षा जास्त माहीत आहेत. त्यामुळे त्या लक्षपूर्वक ऐकाव्यात तसेच इतर प्रसंगी आपण कुठे घरी ,ऑफिस मध्ये , किंवा बाहेर कुठे आहोत आणि कुणीतरी आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती म्हणजे वयानेच आणि ज्ञानाने आहे आणि तो बोलत आहे तर आपण नीट ऐकले पाहिजे यात अनेक गोष्टी आपल्या जीवनासाठी सुद्धा महत्वाच्या असतात. आपण समाजात पाहतो की, कमी बोलणारे लोक कमी असतात आणि जास्त बोलणारे लोक जास्त असतात हे प्रमाण सर्व भागात आहे. आता माझा सुद्धा समावेश कमी बोलणार्यात होतो. अर्थात हे जाणीवपूर्वक नाही तर अनुवंशिक आहे पण हे फार चांगले आहे हे मला फार उशिरा समजले. मी अनेक विद्वान आणि विचारवंत लोकांना प्रत्यक्ष आणि आता अप्रत्यक्ष ( Online ) ऐकले आहे. आणि यावर विचार केला तर माझ्या लक्षात आले की, जास्त विद्वान लोक फार कमी आणि हळू बोलतात. पण आपण पाहतो की, आपल्या आजूबाजूला असे अनेक अर्धवट विद्वान असतात त्यांना माहिती आणि ज्ञान कमी असते पण जास्त जोरात आणि जास्त वेळ बोलतात पण त्यातील आपल्या कामाचे फार कमी असते आणि कधी कधी तर कांहीच नसते आपला वेळ वाया गेला आणि आपली मानसिकता सुद्धा खराब होते.पण अशा लोकांना हे कधीच समजत नाही की, आपण कमी बोलले पाहिजे.
तथागत बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात असे सांगितले आहे की, अप्रियांचा संबंध दु:खकारक आहे. प्रियांचा वियोग दु:खकारक आहे. आता हे अप्रिय कोण तर एक तर ते आपल्या विचारांचे नसतात आणि पुन्हा जास्त बोलणारे असतात हे तर फार दु:खकारक आहे. याचा अनुभव अनेकांना आला असेल म्हणजे आपण जीवनात जर कुणाला नको असेल तर मला वाटते आपले मानवी जीवन व्यर्थ आहे. आपला सहवास लोकांना हवा हवासा वाटला पाहिजे. त्यामुळे आपण हे निश्चित केले पाहिजे की, आपण किती बोलावे आणि कुठे बोलावे. बरेच लोक असतात त्यांना पाच दहा मिनिटे शांत बसवत नाही. मला वाटते मग असे लोक एखाद्या विषयावर शांत बसून विचार आणि चिंतन कधी करीत असतील ? हे शक्य होणार नाही. पण आपण जेंव्हा कोणाचे ऐकतो म्हणजे यात सुद्धा ज्याचे ऐकतो तो व्यक्ती तेवढा विद्वान आणि तो विषय आपल्यासाठी महत्वाचा असावा तेंव्हा आपल्या ज्ञानात भर पडते पण आजकाल लोकांना ऐकायची सवय नाही तर जास्त बोलायची सवय आहे. त्यामुळे असे अनेक लोक त्यांचे जीवनात कमी ज्ञान असणारे राहतात. मी माझ्या कॉलेजमध्ये असे सुद्धा लोक पाहिले आहेत की, एखादा व्यक्ती बोलत आहे आणि त्याचे बोलणे चालू असतांना मध्येच एकजण आपले बोलणे सुरू करतो, आता हे तर फार त्रासदायक असते विशेष करून ऐकणाराला कारण आता कोणाचे ऐकावे हा प्रश्न माझा असतो. अशा वेळी मला वाटते की, या लोकांना एवढे जास्त बोलण्याची आणि एक बोलणे चालू असतांना मध्येच बोलण्याची वाईट सवय का असेल ? पण ही तर जास्त बोलण्याचा कहर आहे. आणि मला अशा व्यक्तीची दया सुद्धा येते की, असे लोक जीवनात कधीच फार विद्वान होणार नाहीत कारण त्यासाठी इतरांचे ऐकावे लागते आणि कोणी काय महत्वाचे लिहले आहे ते वाचावे लागते. आणि दुसरा एक प्रकार एक व्यक्ती जास्त बोलणारी आहे पण एखाद्या मुद्द्यावर चर्चा चालू असेल तर ती व्यक्ती दुसर्याचे ऐकूनच घेणार नाही म्हणजे ती व्यक्ती म्हणेल तेच सत्य अशी त्या व्यक्तीची भावना असते. एकदा महिला संदर्भात एक विषय चालू होता. आणि मी कांही अनुभव आणि काही संदर्भ दिले पण ती व्यक्ती ऐकायला तयार नाही मग मी कॉलेज संपल्यावर घरी आलो आणि नेहमीची सवय आहे त्याप्रमाणे मोबाइलवर एक भाषण पाहत होतो आणि विषय नेमका तोच होता आणि बोलणारी व्यक्ती महिला आणि उप-जिल्हाधिकारी होती. आता मला वाटले हे तर त्या व्यक्तीला ऐकावे लागेल आणि मी ते भाषण पाठवले. आणि उद्या परत विषय सुरू झाला. आज कालचा मुद्दा आज त्या व्यक्तीला नाइलाजाने मान्य करावा लागला. मला वाटते बोलणारी महिला होती म्हणून कदाचित मान्य केला असेल. नाही तर त्या व्यक्तीला तशी सवय आहे की, कोणी कितीही सांगा इतरांचा मुद्दा मान्य करायचा नाही. आता अशा स्वभावामुळे काय होते की, त्या दुसर्याचे न ऐकणार्या व्यक्तीचे ज्ञान कधीच वाढणार नाही. आणि व्यक्ती एक चांगली वक्ता आहे त्यामुळे माझी इच्छा आणि तळमळ होती की, काही नविन दुसर्याचे ऐकले तर त्या व्यक्तीलाच पुढे बोलतांना फायदा होईल. पण स्वभाव आहे तो बदलायला तयार नाही तर आपण काय करणार ? असे अनेक किस्से आहेत. आणि अनेकांना असे अनुभव सुद्धा असतील.
असे म्हटले जाते की, जे लोक गरजेपेक्षा जास्त बोलतात ते कमी कार्यक्षम असतात. अशी अनेक माणसे आपण आपल्या सभोवताली पाहतो की, ते गरजेपेक्षा जास्त बोलतात, पण काम कमी करतात. कारण त्यांची क्षमता बोलण्यात बरीच वाया जाते ही एक बाब आणि ते आळशी असत्तात ही दुसरी बाब आहे. आणि जे कमी बोलतात ते आपली कार्यक्षमता कधीच विनाकारण वाया घालवत नाहीत. माझ्या कॉलेज मध्ये एक प्राध्यापक होते ते इतके जास्त बोलायचे की,नंतर लोक त्यांना टाळू लागले. मग त्यांनी सोबती बदलून घेतले पण शेवटी ते सुद्धा खाजगीत सत्य सांगू लागले की, हे जरा जास्तच बोलतात आणि त्यामुळे आम्ही त्यांना कंटाळलो आहोत. पण आता काय करणार ? एकदम नाही म्हणता येत नाही. ते असे प्राध्यापक होते की, त्यांना कोणताही विषय फार माहीत नसायचा पण ते बोलत राहत आणि दुसरे एका विषयावर किंवा एका बाजूवर ते फार दिवस ठाम राहत नव्हते. आणि त्यामुळे इतर लोकांना त्यांची कोणतीच गोष्ट खरी वाटत नव्हती. आणि त्यांचे पुढे तर असा कहर झाला की, एखादे वाक्य मी एखाद्या प्रसंगी म्हणालो तर ते प्राध्याप्क ते वाक्य त्यांच्या स्वत: च्या नांवावर सांगत असत. आणि त्यामुळे मला असे वाटले की, त्यांचे मानसिक संतुलन आता बिघडले आहे. जे व्यक्ती समाजात जास्त बोलतात त्यांचा पुन्हा एक दोष म्हणजे त्यांचे बोलणे अनेक लोक लक्ष देऊन ऐकत नाहीत. आणि त्यामुळे जे व्यक्ती कमी बोलतात ते काय बोलतात हे लोकांना महत्वाचे वाटते. आणि म्हणून आपण पाहतो की, समाजात अनेक असे विद्वान व्याखाते आहेत की, त्यांना ऐकण्यासाठी लोक वेळ काढून येतात आणि त्यांना पैसे देऊन ऐकतात आणि हे जास्त बोलणारे जर लोकांना म्हणाले की, माझे ऐका मी तुम्हाला चहा पाजतो ,पैसे देतो ,जेवण देतो तरी बरीच मंडळी नकार देतील कारण ते समाजासाठी काहीच महत्वाचे नसते.
त्यामुळे जीवनात प्रत्येक व्यक्तीने अगोदर अनेक अनेक चांगल्या लोकांना ऐकले पाहिजे ,अनेक चांगली पुस्तके वाचली पाहिजे ,अनेक चांगल्या लोकांबरोबर चर्चा केल्या पाहिजे किंवा चर्चेत सहभाग घेतला पाहिजे आणि मग आपली एक विचारसरणी तयार होते आणि मग समाजात बोलायला सुरुवात केली पाहिजे. यामुळे आपल्या बोलण्याला लोक ऐकतील आणि आपण एक जबाबदार देशाचा नागरिक म्हणून समाजात आपली ओळख होईल. आता जास्त बोलणार्या लोकांना कोणतीच वैचारिक बैठक नसते आणि त्यामुळे त्यांची गाडी कधी या रस्त्यावर तर कधी दुसर्या रस्त्यावर जाते म्हणजे एका मुद्द्यावर ते ठाम नसतात. आणि त्यामुळे लोक त्यांना महत्व देत नाहीत. जास्त बोलणरे व्यक्ती यांना वाटते की, ते फार हुशार आहेत पण तसे नसते तो त्यांचा भ्रम आहे. आमच्याकडे एक दुसरे महाशय प्राध्यापक आहेत ते तर इतके जास्त बोलतात की, त्यांची सर्व जिल्ह्यात पत गेली पण त्यांना भ्रम आहे की, ते फार हुशार आहेत. पण वास्तव याउलट आहे. आपण जास्त बोलतांना बर्याच वेळा इतर लोकांची मने दु:खावतो याची कल्पना आपणास नसते. आणि त्यामुळे हे फार मोठे वाईट काम आहे. म्हणजे एखाद्याला तुम्ही कठोर बोलू शकता पण त्याला तसे कारण पाहिजे. पण हे प्राध्यापक असे आहेत की, सहज बोलतांना सुद्धा अनेक व्यक्तीचे मने दुखवतात. आणि त्यांना असे टोचून बोलण्यात फार मोठेपणा वाटतो. पण त्यांना कोणी सांगावे की, शब्द हे फार मोठे शस्त्र आहे ते फार जपून वापरावे लागतात.
आपल्या देशाचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना कमी बोलल्यामुळे विरोधी पक्षाचे लोक त्यांना मौनी बाबा म्हणत असत. परंतु विरोधी पक्षाचे लोक आणि नेते त्यांना माहीत नाही की, हे मनमोहन सिंग अंतराष्ट्रीय आर्थिक क्षेत्रात काम करणार्या IMF सारख्या संस्थेवर त्यांनी काम केले आहे ,रिजर्व बँकेत गव्हर्नर होते ,दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्राचे नावाजलेले प्राध्यापक होते आणि जेंव्हा नोटबंदीचा चौकशी समितीचा रिपोर्ट द्यायचा होता तेंव्हा या विरोधी पक्षातील कोणत्याही लोकांना बोलता आले नाही. तेंव्हा डॉ. मनमोहन सिंग बोलले आणि त्यांना उत्तर दिले. कारण जास्त बोलले म्हणजे तो व्यक्ती हुशार नसतो तर तो मुळात हुशार असला पाहिजे आणि विद्वान होणे कांही अपघात नाही तर ती एक अखंड तपश्चर्या आहे. हे काम सर्वांना जमत नाही. हे काम प्रधानमंत्री , मुख्यमंत्री आणि आमदार ,खासदार होण्यासरखे सोपे नाही. म्हणून जगात आज ज्यांची प्रतिमा आहे असे लोक फार मेहनत घेऊन तयार होतात आणि ते फार कमी असतात पण ते कमी बोलतात. जास्त बोलणार्यांना त्यांच्या गावात सर्व ओळखणार नाहीत. पण या कमी बोलणार्यांना देशात आणि जगात मान्यता असते हे वाटते तेवढे सोपे काम नाही. म्हणून एखादाच डॉ.अमर्त्य सेन असतो ,डॉ. रघुराम राजन , डॉ. मनमोहन सिंग , डॉ. सुखदेव थोरात ,डॉ. नरेंद्र जाधव ,डॉ. विमल जालान ,डॉ. भालचंद्र मुनगेकर असे लोक आहेत म्हणून आपली व्यवस्था चालू आहे आणि हे फार कठीण परिश्रम घेऊन तयार होतात आणि अनेक पिढया यांना सलाम करतील कारण त्यांचे कृतृत्व मोठे असते. आणि हे लोक जास्त बोलू शकतात पण त्यांना माहीत आहे की, जास्त बोलण्यापेक्षा काम जास्त करा आणि जे जास्त बोलतात त्यांना हा इशारा आहे की, जर कमी बोलणारे लोकांनी बोलायला सुरुवात केली तर तुम्ही जास्त बोलणारे आहेत त्यांची बोलतीच बंद होईल एवढे ज्ञान त्यांच्याकडे असते. त्यामुळे यांना एका ठिकाणी अशा जास्त बोलणर्या लोकांना इशारा देतांना देशाचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग एका ठिकाणी म्हणाले होते की,
हजारों जवबोसे अच्छी है खामोशी मेरी ,
न जाने कितने सवालो की , आबरू रखे |
प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
नाशिक (9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत