संविधान हा अंमलबजावणीचा विषय : रणजित मेश्राम
दीक्षाभूमी आंबेडकर कॉलेजात बोलतांना
भारताचे संविधान हा अंमलबजावणीचा विषय आहे. येणाऱ्या पिढीला संविधानाची अंमलबजावणी किती झाली, नसेल झाली तर का झाली नाही, नेमके काय घडलेय, आज त्या अनुषंगाने काय घडतेय असे विचार करायला न्यावे. संविधान हा केवळ भावनिक वा श्रध्देचा विषय करु नये असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार प्रा रणजित मेश्राम यांनी इथे दीक्षाभूमी स्थित डॉ आंबेडकर कॉलेज मध्ये उदघाटक म्हणून बोलतांना केले.
बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती व संबंधित डॉ आंबेडकर कॉलेजचे हिरक महोत्सव व त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन यांचे उदघाटन करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी प पू बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे होते.
प्रारंभी काॅलेजच्या प्राचार्या डॉ भुवनेश्वरी मेहरे यांनी आयोजनाचे महत्व व स्वागतपर मनोगत व्यक्त केले.
पुढे उदघाटक रणजित मेश्राम म्हणाले, समाजिक विषमते इतकीच आर्थिक विषमता जघन्य असल्याचे बाबासाहेबांना कळत होते. पण आर्थिक विषमता दूर करण्याच्या संविधानिक तरतुदी परिस्थितीवश बाबासाहेबांना मनासारख्या करता आल्या नाहीत. ती खंत त्यांचे मनात नेहमी असायची.
हे सांगत असतांनाच त्यांनी अलीकडे बाबासाहेबांवर, ते एकटे संविधानाचे शिल्पकार नाहीत, त्यांना भारत कळलेला नव्हता, त्यांचेवर पाश्चिमात्यतेचा प्रभाव होता, असे होणारे आरोप किती तकलादू व खोटे आहेत हे सप्रमाण प्रभावी विश्लेषण करुन स्पष्ट केले. याशिवाय १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय विषमता परिषदेत जपानला गेलो असतांना, भन्ते ससाई यांचे जन्मगाव ‘निम्मी’ इथे कसा गेलो. त्यांच्या आई व मामा यांची भेट झाली. जन्मघरी बराच वेळ होतो. घरी जाणारा पहिला भारतीय होतो या हृदयस्पर्शी आठवणी रणजित मेश्राम यांनी शेवटी सांगितल्या.
आयोजनाचे संचलन प्रा विद्या चौरपगार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ रविंद्र तिरपूडे यांनी केला. आभार प्रदर्शन डॉ दीपा पान्हेकर यांनी केले. उदघाटनानंतर वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा व गीत स्पर्धा झाल्या. आयोजनाचे समन्वयक प्रा मिलिंद खेळकर व प्रा राहुल मुन हे होते.
उदघाटन आयोजनाला प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत