भगवान बुद्धांची शिकवण – भाग ७३

पुनर्जन्म
पुनर्जन्म हा एक कुतूहलाचा विषय राहिला आहे. याच विषयावर ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या चवथा खंड- धर्म आणि धम्म या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विवेचन करताना लिहतात-
आत्म्याच्या अस्तित्वावर बुद्धांचा विरोध होता. तथापि तथागत बुद्ध पुनर्जन्म मानीत होते.
(१) पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि
(२) पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा?
असे दोन भाग आहेत.
तथागत बुद्धांच्या मते माणसाच्या शारीरिक अस्तित्वाचे चार घटक पदार्थ (elements of Existence) आहेत:
(१) पृथ्वी, (२) आप, (३) तेज, (४) वायू.
प्रश्न असा आहे की, मनुष्यदेह मृत झाल्यावर त्याच्या या चार भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात, ‘होय’.
तथागत म्हणतात, ‘नाही.’ ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात.
जेव्हा तरंगणाऱ्या, इतरत्र पसरलेल्या समुहातून (Mass) हे चार घटक एकत्र मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो.
पुनर्जन्माचा तथागतांना अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे.
या नव्या जन्मातील घटक (elements) पूर्वीच्या एकाच विशिष्ट मृत शरीरातील असण्याची आवश्यकता नाही, आणि तसेही ते नसतात. ते वेगवेगळ्या मृत शरीरातून अवकाशात मिसळले असतील.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतात.
तथागत बुद्ध हे उच्छेदवादी होते काय? आत्म्याचे अस्तित्व मानीत नसल्याने, बुद्ध हे स्वाभाविकतः उच्छेदवादी असतील असे अपेक्षित असणार.
परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धांनी अलगद्दुप्पम सुत्तात तक्रार केलेली आहे.
ते म्हणतात, माझी शिकवण वेगळी असता, काही श्रमण आणि ब्राम्हण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो, असा माझ्यावर आरोप करतात.
खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने माझ्यावर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात!
हे विधान जर खरोखर बुद्धांचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राम्हणी सिद्धान्त लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते.
ंती समस्या अशी:
भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानीत नाहीत, मग ते आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतात?
बुद्ध शरीर घटकांचे (Matter) पुनर्जीवन मानतात; आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाहीत.
तथागत बुद्धांच्या मताचा असा अर्थ लावला तर तो विज्ञानाशी (science) सुसंगत आहे.
केवळ याच अर्थाने बुद्ध पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल.
विज्ञान म्हणते, शक्ती (Energy) कधीही नाश पावत नाही.
तथापि, ‘मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही’ ही विचारसरणी विज्ञानाविरुद्ध आहे. कारण ह्या विचारसरणीनुसार शक्तीचे विश्वातील आकारमान/प्रमाण स्थिर नाही.
ही पुनर्जन्माविषयीची दुविधा व कोंडी केवळ याच रीतीने सोडविता येते.
‘शरीर मृत झाल्यावर काय होते?’ या प्रश्नाचे योग्य उत्तर ‘शरीर शक्ती (Energy) उत्पन्न करण्याचे थांबविते’ असे होते. (The body ceases to produce energy.)
परंतु हाही उत्तराचा एकच भाग ठरतो. कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की, शरीरातून जी शक्ती (energy) बाहेर पडते ती विश्वात संचार करणा-या शक्तिसमूहात मिळून जाते.
म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे (Energy) उत्पादन थांबणे. दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणा-या शक्तिसंग्रहात नवी भर पडणे.
उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने तथागत स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच ते उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटका (Matter) बाबत मात्र ते उच्छेदवादी नव्हते.
असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्दछेवादी का म्हणवून घेत नसत हे कळणे सोपे होते.
पुनर्जन्म कोणाचा?
सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर बुद्धांचा विश्वास होता काय? असणे असंभाव्य दिसते.
मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन, त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे.
जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न, भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही.
संसरण – आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश
बुद्धांनी पुनर्जन्म प्रवचिला आहे; परंतु त्यांनी आत्म्याचे संसरण प्रवचिले नाही.
बुद्धांनी दोन परस्परविरोधी सिद्धान्तांचे प्रवचन केले, असे त्यांच्यावर टीकाकार दोषारोपण करीत होते. परंतु संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे, हे नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट केले होते. राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले,
“भगवान बुद्ध पुनर्जन्म मानीत होते काय?
नागसेनाने उत्तर दिले, “होय.”
“ह्यामध्ये परस्परविरोध नाही काय?”
नागसेन– “नाही.”
“आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय?”
नागसेन– “अर्थात; निश्चित शक्य आहे.”
“हे कसे शक्य आहे, हे समजावून सांग बरे?”
“नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे?” राजाने विचारले.
“हो शक्य आहे.”
“कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर.”
“राजा, समज, माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की, पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले?’
“अर्थात नाही.”
“राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे.”
“ह्याची अधिक उदाहरणे देऊन ते स्पष्ट कर बरे.”
“बाळपणी आपल्या गुरूपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा, तुला आठवते काय?”
“होय, आठवते!”
“तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय?”
“अर्थात नाही.”
“याप्रमाणेच संसरणाविना पुनर्जन्म होतो.”
“वा, छान! नागसेन!”
“नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय?”
“यथार्थ दृष्टीने पाहिले असता, राजा, आत्मा अशी काही चीज नाही.”
“वा, छान! नागसेना!”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२४.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ चतुर्थ खंड भाग दुसरा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



