बहादुरवाडीच्या सुपुत्रास गोव्यात साहित्य पुरस्कार जाहीर

बागणी ता. २१ (प्रतिनिधी)
बहादुरवाडी (ता. वाळवा) येथील कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कवितासंग्रहास गोवा येथील गोमंतकीय साहित्य सेवक संस्थेच्यावतीने देण्यात येणारा पहिलाच कै. ब्रम्हराज उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार जाहीर करण्यात आला असून गोवा आणि महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या कवितासंग्रहातून या संग्रहाची उत्कृष्ट संग्रह म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रदीर्घ परंपरा आणि वाड्मयीन क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी गोमंतक साहित्य सेवक मंडळ संस्था आठ्याण्णव वर्षे जुनी असून आजअखेर तिचं काम अविरतपणे सुरु आहे. संस्था दरवर्षी उत्कृष्ट साहित्य कलाकृतींचा पुरस्कार देऊन गौरव करते. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातून कवी लेखकांच्याकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या.तज्ञ परीक्षक समितीने महाराष्ट्रातील कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या कवितासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली असून गोव्यातून महाराष्ट्रात जाणारा हा पहिलाच पुरस्कार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मा. रमेश वंसकर यांनी दिली.
दहा हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मान्यवरांच्या शुभहस्ते २७ मार्च रोजी पणजी (गोवा) येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
साहित्यात वर्तुळात सध्या चर्चेत असलेले कवी व समीक्षक धनाजी धोंडीराम घोरपडे यांचा ‘गा-हाणं’ नंतरचा जामिनावर सुटलेला काळा घोडा हा दुसरा कवितासंग्रह असून तो लक्षवेधी ठरला आहे. सदरच्या कवितासंग्रहास पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार, लोकनेते राजारामबापू उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार, कवयित्री शैला सायनाकर साहित्य पुरस्कार, शिवांजली साहित्यपीठ उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, इ. सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी त्यांच्या ‘गा-हाणं’ संग्रहाला पद्मश्री नारायण सुर्वे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार,शांता शेळके उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, महाकवी कालिदास साहित्य पुरस्कार,तापी- पुर्णा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार,दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार इत्यादी साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत