ललित पाटीलला 5 दिवसांची पोलीस कोठडी

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याने पोलिस यंत्रणेकडून त्याच्या जीवाला धोका असल्याचा दावा वकिलांमार्फत केला. तसेच ललितला हर्निया आणि टी.बी.चा आजार असल्याचे सांगत त्याच्या आरोग्य आणि सुरक्षेची खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली. परंतु पोलिस कोठडीत असताना स्वतंत्रपणे सुरक्षा पुरवण्याची गरज नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांनी ललित पाटीलसह तीन आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अमली पदार्थ मेफेड्रोन तस्कर प्रकरणातील मास्टरमाईंड ललित अनिल पाटील (वय ३७), शिवाजी शिंदे (वय ४०) आणि राहुल शंकर चौधरी (वय ३०) या तिघांना मुंबई येथील न्यायालयीन कोठडीतून पुणे पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले होते. या तिघांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले. सुनावणी वेळी न्यायालयीन कक्षात गर्दी होती.
अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी ललित पाटील याच्यासह आतापर्यंत १४ आरोपी निष्पन्न झाले असून, ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ललितचे या सर्व आरोपींशी कनेक्शन आहे. आरोपींनी नाशिक येथे अमली पदार्थाचा कारखाना सुरू केला. तसेच ललितने आरोपींच्या मदतीने पुण्यात अमली पदार्थांची तस्करी केली.
त्यांच्या ताब्यातून २ कोटी १४ लाखांचे मेफेड्रोन, एक कोटी ८० लाख रुपये किमतीचे तीन किलो सोने आणि दोन मोटारी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ललित आणि इतर आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे, असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त अमोल तांबे यांनी न्यायालयासमोर सांगितले.
तसेच अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा गंभीर असून, युवा पिढीवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. या गुन्ह्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. आरोपींनी तस्करीतून मिळवलेल्या पैशांतून कुठे मालमत्ता खरेदी केली आहे का ? तसेच इतर फरार आरोपींचा शोध घ्यावयाचा आहे. त्यासाठी आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलम यादव- इथापे यांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत