क्रिकेटदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

शास्त्रीच्या षटकारांचा गवगवा..कांबळी मात्र कोपऱ्यात उभा

जगदीश ओहोळ

परवा मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम चा सुवर्ण महोत्सव सोहळा जंगी संपन्न झाला. म्हणजे खरंतर वानखेडे स्टेडियम गाजवणाऱ्या दिग्गज कलाकारांचा आणि वानखेडे स्टेडियम च्या स्मृतींचा तो सोहळा होता.
पण त्याच वानखेडे स्टेडियमवर इंग्लड विरुद्ध खेळताना 1993 साली 224 धावांचा पाऊस पाडणारा विनोद कांबळी नावाचा खेळाडू मात्र गर्दीत कुठेतरी जागा शोधत उभा होता. खरंतर त्या व्यवस्थेने विनोद कांबळी या खेळाडूला नव्हे तर विनोद कांबळी च्या वर्गातून येतो त्या वर्गाला अशाप्रकारे बाहेर उभा करून त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. कारण सहा चेंडूत सहा षटकार ठोकणारा खेळाडू म्हणून रवी शास्त्री यांचा मोठा गौरव होतो. तेंडुलकर, वेंगसकर, शास्त्री, गावसकर, कोहली ही मंडळी या सोहळ्यात सन्मानमूर्ती असतात. पण गुणवत्ता असूनही, स्वतःला सिद्ध केलेला कांबळी आजही या क्रीडा मंदिराच्या बाहेर उभा केला जातो. वैयक्तिक आयुष्यात बरबाद असेल पण एक खेळाडू म्हणून कांबळीने वानखेडे गाजवलं होतं, हे कसं नाकारता येऊ शकतं?

कांबळी नशेत, कांबळी आजारी, कांबळीला याने केली मदत, त्याने केली मदत अशा बातम्या सतत येत असतात, पण या व्यवस्थेने कायमच अशा प्रकारे त्याचं कर्तृत्व नाकारत त्याला नैराश्यात ढकललं आणि परिणाम समोर आहेत.

यावरून आजच्या तरुणाईने लक्षात घेणे गरजेचे आहे, या देशात तुम्ही कोणत्याही क्षेत्रांमध्ये स्वतःला सिद्ध करत असाल तर ते सोप्पं नाहीये.. तुमची जात तुम्हाला आडवी येत राहणार आहे, तुम्हाला का डावलं.? तुम्हाला अनुलेखाने का मारलं ? हे तुमच्या लक्षात ही येणार नाही पण ते घडवून आणणारे द्रोणाचार्य आजही सगळ्या क्षेत्रात उभे आहेत, हे विसरता कामा नये. तुम्ही कितीही म्हणत असाल की आम्ही सगळे सोडले, आम्ही ते मानत नाही, पण ज्या दिवशी हा अनुभव, ही वेळ तुमच्या स्वतःवर येईल त्या दिवशी तुम्हाला कळेल की इथली जातव्यवस्था, जातीवाद संपला नाही तर त्याने फक्त आपलं रूप बदललेलं आहे. नव्या लढाईसाठी सज्ज रहा. स्वतःच्या क्षमतावर, गुणवत्तेवर विश्वास ठेवा. आणि काम करत राहा. तुम्हाला अनुलेखाने मारून असे अनेक तेंडुलकर, गावस्कर, शास्त्री, वेंगसकर पुढे उभे केले जाणार आहेत. तरीही तुम्हाला खचून न जाता ताकतीने बॅटिंग करावी लागणार आहे.

  • जगदीश ओहोळ लेखक व वक्ता
    mob 099218 78801

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!