एका शीख फुटीरतावाद्याची न्यूयॉर्कमध्ये हत्या करण्याचा कट रचल्यावरून अमेरिकेने भारतीय सरकारी अधिकाऱ्याकडे बोट दाखवल्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने केलेला आरोप ही ‘चिंतेची बाब’ असल्याचे मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी गुरूवारी म्हटले आहे. अशा प्रकारे हत्या घडविणे हे सरकारचे धोरण नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
निखिल गुप्ता नामक व्यक्तीवर कटाचा आरोप ठेवण्यात आला असून एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्याने हा कट रचल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. याबाबत गुरूवारी बागची यांना विचारले असता आरोपांचा तपास करण्यासाठी भारताने एक तपास पथक स्थापन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘एका भारतीय व्यक्तीवरील आरोप व त्याचा भारतीय अधिकाऱ्याशी संबंध जोडला जाणे ही चिंतेची बाब आहे. मात्र हे सरकारच्या धोरणाविरुद्ध असल्याचे आम्ही पूर्वीही सांगितले असून मी त्याचा पुनरुच्चार करू इच्छितो’, असे बागची पत्रकार परिषदेत म्हणाले. संघटित गुन्हे, मानवी तस्करी, शस्त्रांची चोरटी आयात आणि अतिरेकी यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील परस्पर संबंध हा यंत्रणांसाठी कायम विचारात घेण्याचा गंभीर मुद्दा राहिल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेने या संबंधात काही माहिती सोपवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत