२१३८ कोटींच्या वसुलीसाठी ‘एमआयडीसी’ प्रशासनाची सुरू आहे धावाधाव.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाच वर्षांपासून टप्प्याटप्प्याने १५०० कोटींचे कर्ज राज्य रस्ते विकास महामंडळास दिले. मात्र, कर्ज आणि त्यावरील व्याजाची वाढती रक्कम लक्षात घेऊन या महामार्गालगत २१०० कोटी रुपये मूल्याची जमीन मिळावी, यासाठी ‘एमआयडीसी’ने प्रयत्न सुरू केले आहेत.
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठीच्या कर्जाचे रूपांतर प्राधान्य समभागात (प्रेफरन्स शेअर्स) करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार १५०० कोटी रुपयांचे डीमॅट शेअर प्रमाणपत्र महामंडळास उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, या समभागांपासून महामंडळास आजतागायत कोणताही लाभांश मिळालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळास उपलब्ध करून देण्यात आलेले १५०० कोटींचे कर्ज आणि त्यावरील फेब्रुवारी २०२३ पर्यंतचे ६३८ कोटींचे व्याज, अशा एकूण २१३८ कोटींच्या वसुलीसाठी ‘एमआयडीसी’ प्रशासनाची धावाधाव सुरू आहे. कर्ज, त्यावरील व्याज आणि समभागांतून लाभांशही मिळत नसल्याने या २१३८ कोटी मूल्याची जमीन तरी महामंडळास मिळावी, यासाठी आता ‘एमएसआरडीसी’कडे पाठपुरावा सुरू आहे. कर्जवसुलीसाठी हा एकमेव मार्ग उरला आहे, अशी चर्चा महामंडळात दबक्या आवाजात सुरू असून, याबाबत प्रतिक्रिया देण्यास एकही अधिकारी तयार नसल्याचे चित्र आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत