
मा. खासदार, श्रीमती सुप्रिया सुळे,
आपणांस सविनय जयभीम.
दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवर जातीय द्वेषाने पीडित असलेल्या अँकर ने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना उत्साहाच्या भरात आरक्षण कुठल्या निकषावर असायला हवे यावर आपण आपली अक्कल पाजळली.
आत्मप्रौढी मिरवत असे ही म्हणालात की उद्या जर माझ्या मुलाने आरक्षणावर हक्क सांगितला तर मला लाज वाटली पाहिजे.
मुळात बहुतांश राजकारणी निलाजरे असतात, तुम्हीही त्याचं माळेतील मणी निघालात. तुम्हीं, तुमच्या पूर्वजांनी मागासवर्गीय जातीत जन्माला आले म्हणून स्वतःला उच्च समजणाऱ्या हिंस्त्र श्र्वापदा कडून जमावरासारखा मार कधी खाल्ला नाही, तुम्हाला कोणीही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीपासून कोणीही वंचित ठेवले नाही, गावकुसाबाहेर चे हाल अपेष्टा मध्ये जिणे काय असते, याचा तुम्हाला काहीही अंदाज नाही हेच तुमच्या अर्धवट ज्ञानावरून स्पष्टं होते.
तुम्हीं संसदरत्न आहात, मराठी आहात याचा फार अतीव नाही पण थोडा आदर वाटायचा पण तुमची मुक्ताफळे ऐकली अन तुमच्यासारखे दगडही संसदरत्न असू शकतात यांची खात्री पटली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समकालीन विद्वान लोकांनी जातीय आधारित आरक्षण देत असताना सर्व बाबीवर सखोल चर्चा करून आरक्षणाचे कलम घटनेत समाविष्ट केले होते. त्यांच्या विद्वात्तेपुढे तुम्ही अगदीच खुज्या आहात हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे (सूर्याला उजेड दाखवायला निघालेली बारामतीची पणती) तरीसुद्धा आर्थिक मागासलेपणाचे तुणतुणे का वाजवत आहात हे समजायला मार्ग नाही.
आरक्षण हे धर्माने लादलेल्या जातीय विषमतेच्या जुनाट, कुजाट, अन् तरीही शाबूत अशा रोगावर उपाय करण्यासाठी लागू केलेले औषध आहे.
आश्चर्य म्हणजे या रोगा बदल कुणीही ब्र शब्द बोलण्याची हिम्मत दाखवत नाही पण रोग निदान करणारे औषध बंद झाले पाहिजे यासाठी तमाम अडानचोट आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन नेहमी करत असतात, त्या गर्दी मध्ये आज एक संसद रत्न ही सामील झाले यांचे वैषम्य वाटते.
तुमच्या वक्तव्याचे बरेच अनवर्याथ निघतात. आपल्या पिताश्री प्रमाणे तिरकी चाल चालून कदाचित तुम्हाला मराठा समाजाचे जे जाती आधारित आरक्षणाच्या मागणीसाठी जे आंदोलन चालू आहे त्यांना संभ्रमात टाकून त्यांची दिशाभूल करायची आहे, किंवा एस सी, एस टी, ओबीसी यांची आरक्षणामुळे जी थोडीफार प्रगती झाली आहे ती तुमच्या डोळ्यात खुपते आहे, किंवा अशी सवंग वक्तव्य करून रेशीम बागेकडून शाबासकी मिळवायची आहे किंवा जगात चेष्टेचा विषय बनलेल्या विश्वगुरूच्या चरणी लिन व्हायचे आहे.
आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचे साधन नाही हे तुम्हाला माहीत नाही येवढ्या दूधखुळ्या तुम्हीं नक्कीच नाही त्यामूळे उगाच शिंगे मोडून वासरात शिरण्याचा प्रयत्न करुन स्वतःचें हसे करुन घेऊ नका.
गेल्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या खांद्यावर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा झेंडा होता म्हणून तुम्हाला आंबेडकरी समाजाने बिनशर्त पाठिंबा दिला पण आता हे स्पष्ट होतं आहे की तुमच्या झेंड्याचा दांडा रेशीम बागेतील विषारी लाकडाचा आहे.
आता बोललाच आहात तर तुमच्या पक्षांतील एस सी, एस टी, ओबीसी लोक जे तुमची पालखी वाहतात त्यांची बैठक बोलावून त्यांच्या समोर आपल्या विद्वत्तेची ओळख करून द्या अन् येणाऱ्या महानगर पालिका निवडणुक प्रचारात हे सांगा की, जातीय आधारावर आरक्षण आता बस झाले. संसदेत ही जरा या विषयावर चर्चा घडवून आणा, बघू या तूमच्या मतावर तुम्हीच किती ठाम राहता ते.
आर्थिक दृष्ट्या विकलांग लोकांबद्दल एवढे प्रेम उतू जात असेल तर तुम्ही चालवत असलेल्या अनेक संस्थांमध्ये त्यांना योग्य ते प्रतिनिधित्व दिलेली आकडेवारी जाहीर करा. जातीय आधारावर आधारित राजकीय आरक्षण रद्द करून आपल्याच पक्षातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना प्रतिनिधित्व द्या, याची सुरवात बारामती मधून करा, त्यासाठी तुम्हाला स्वतःची कुर्बानी द्यावी लागेल, हे लक्षात असू द्या.
जर खरेच तुम्हाला आर्थिक दुर्बल घटकासाठी काही करण्याची इच्छा असेल अन तेवढी तुमच्यामध्ये धमक असेल तर निदान तुमच्या मतदार संघातील जेवढी मंदिरे आहेत त्या सर्व मंदिरातील जातीत श्रेष्ठता हा आधार घेऊन शतकानुशतके मंदिरात ठाण मांडून बसलेल्या सर्व ब्राम्हण पुजारी लोकांना बाहेर काढा अन् त्यांच्या जागी आर्थिक दृष्ट्या विकलांग, गैर ब्राम्हण लोकांना योग्य ते प्रशिक्षण देऊन पुजारी बनवा. (तामिळनाडू च्या धर्ती वर)
हे जर तुम्हाला जमणार नसेल तर आपले कवडीमोल तत्त्वज्ञान घराजवळील कचऱ्याच्या डब्यात टाका, अन् तोंडाला मोठे कुलूप लावून गप्प बसा.
आप्ल्या कुवतीच्या बाहेर बोलून तुम्हीं विस्तवावर फुंकर घातली आहे, आता चटके सोसायला तयार राहा.
नागभूषण बनसोडे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत