देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

अनुसूचित जात समूहांचे एकीकरण : काळाची गरज

डॉ. अनंत दा. राऊत

१४ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड येथे आंबेडकरवादी मिशनच्या वतीने महाराष्ट्रातील प्रमुख जात समूहांच्या सह सकल अनुसूचित जातींची शिक्षण क्रांती परिषद होत आहे. भारतातील विषमतावादी व्यवस्थेने सर्व प्रकारच्या प्रगतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या या जात समूहातील लोकांमध्ये आमुलाग्र अशा शैक्षणिक क्रांतीसाठीची जागृती घडवून आणणे, सामाजिक ऐक्य निर्माण करणे व भगिनीबंधुत्व वाढीला लावणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. ऐक्य आणि भगिनीबंधुत्वासाठीचे हे अभियान राज्यभर चालवण्यात येणार आहे. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम हे या महत्त्वपूर्ण परिषदेचे प्रमुख संयोजक आहेत. या परिषदेच्या निमित्ताने अनुसूचित जात समूहांच्या एकीकरणासंदर्भात व सर्वांगीण प्रगतीसंदर्भात गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.

नैसर्गिक सत्य हे आहे की माणसाला जात नसते, माणूस फक्त ‘माणूस’ असतो. पृथ्वीवरील प्राणीसृष्टी मधील ‘माणूस’ ही एक बुद्धिमान व शक्तिमान अशी जात आहे. परंतु भारतात निर्माण केली गेलेली आणि वर्षानुवर्षे टिकवलेली जातिव्यवस्था ही जणू नैसर्गिकच आहे असे बहुतांश भारतीय लोकांना आजही वाटते. प्रत्येक जण आपापल्या जातीच्या कोशात बंदिस्त राहण्यात धन्यता मानतो. परंतु इथली जात व्यवस्था भारताचा वर्षांवर्षांपासून घात करत आलेली आहे. जात व्यवस्था ही शोषण व्यवस्था आहे. जात माणसाला माणसापासून तोडते. संकुचित बनवते. जातीची उतरंड विषमतावादी आहे. या उतरंडीत जन्मास आलेला आणि वाढलेला जवळपास प्रत्येक जण ‘वरच्यांच्या पायी माथा आणि खालच्यांना लाथा’ या पद्धतीने वागतो. जातिव्यवस्थेने अतिशूद्र स्तरात ठेवलेल्या माणसांचे मानवी हक्क हिरावून घेतले. त्यांच्यावर ज्ञानबंदी, शस्त्रबंदी, व्यवसाय बंदी, संचारबंदी व स्पर्श बंदी लादली. त्यांना हलक्या, प्रचंड काबाड कष्टाच्या आणि गलिच्छ कामात गुंतवले. त्यामुळे हे लोक हीन दीन दरिद्री राहिले. सर्व प्रकारच्या प्रगतीपासून दूर राहिले. विषमतावादी व शोषक स्वरूपाच्या जातिव्यवस्थेने भारतातील कोट्यावधी लोकांना मागासलेल्या स्थितीत ठेवले. या व्यवस्थेतील वरच्या स्तरातल्या लोकांनी या मागास लोकांना वर्षानुवर्षे आपले गुलाम म्हणून वापरले.

१९४७ साली भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले.१९५० पासून इथे सांविधानिक पद्धतीने राज्यकारभार सुरू झाला. इथे संसदीय लोकशाही येऊन ७५ वर्षे उलटली तरी भारतातील अनुसूचित जाती जमातींची स्थिती अजूनही पुरेशा प्रमाणात सुधारलेली नाही. त्यांच्यावरील अन्याय अत्याचार थांबलेले नाहीत. भारतीय संविधानात या जातसमूहातील लोकांसाठी राजकीय, शैक्षणिक व प्रशासनामधील आरक्षणाची तरतूद झालेली असली तरी या समूहांची प्रगती घडवून आणणारे खरे व इमानदार प्रतिनिधी विशेषतः कायदेमंडळात पोहोचलेले नाहीत. त्यामुळे भारतात अजूनही सामाजिक न्याय प्रस्थापित झालेला नाही. या समूहातील सर्व लोकांनी व्यवस्थेने निर्माण केलेले आपापसातील सर्व प्रकारचे भेद विसर्जित करून एकत्रित येणे व एकजीव होणे आवश्यक आहे. असे केल्याखेरीज या तळस्तरातील समूहांची सर्व अंगांनी प्रगती होऊ शकणार नाही. ही प्रगती घडवून आणण्यासाठीचे गंभीर असे विचार मंथन घडवून आणण्यासाठी ही महत्त्वपूर्ण अशी परिषद आयोजित केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या सामाजिक न्यायाच्या व मानवता प्रस्थापित करण्यासाठीच्या लढ्यामुळे शोषित जातींची अनुसूची भारतीय संविधानातील समतावादी भूमिकेनुसार तयार केली आहे.१९५० अधिकृत रीत्या ही अनुसूची करून मान्य केली गेलेली आहे. राष्ट्रपती व राज्यांच्या राज्यपालांना जातींची अनुसूची म्हणजेच यादी तयार करण्याचा अधिकार असतो. जातीची ही अनुसूची का निर्माण केली? तर जे जे जातसमूह भारतातील हिंदू धर्माने निर्माण केलेल्या विषमतावादी जातिव्यवस्थेच्या पायाखाली चिरडले गेलेले आहेत, त्या समूहांचे इतिहास काळापासून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी. त्यांचे हिरावले गेलेले मानवी हक्क परत देण्यासाठी, त्यांची माणूस म्हणून असलेली प्रतिष्ठा त्यांना बहाल करण्यासाठी, त्यांना देशाच्या राजकीय, प्रशासकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व देण्यासाठी, त्यांचा सर्व अंगांनी विकास घडवून उच्च जात वर्णीयांच्या बरोबरीने आणण्यासाठी व भारतात समता प्रस्थापित करण्यासाठी भारतातील पिळल्या गेलेल्या शोषित अशा जात समूहांची एक अनुसूची निर्माण केली गेली. त्या अनुसूचीमध्ये भारतातील११०९ जातींचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील ५९ जातींचा समावेश आहे.२०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातींच्या आणि अनुसूचित जमातींच्या लोकांचे प्रमाण अनुक्रमे १६.६%  आणि ८.६%  आहे. २५.२% (३१ कोटी) आहे. आता ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार. जगातील काही छोट्या राष्ट्रंपेक्षा ही जनसंख्या कितीतरी पटीने मोठी आहे.

महाराष्ट्रामध्ये असलेल्या अनुसूचित जातीतील पूर्वाश्रमीचे महार, मातंग, चर्मकार, ढोर या प्रमुख समूहांसह होलार, भंगी, बुरुड, गारोडी, बेडा जंगम, मला जंगम, लिंगडेर, खाटीक इत्यादी व भारतातील सारेच ११०९ पेक्षा अधिक जात समूह विषमतावादी व्यवस्थेचे बळी ठरलेले आहेत. या सर्वांना या व्यवस्थेने हलक्या व गलिच्छ कामात वर्षानुवर्षे अडकवून ठेवलेले आहे. अस्पृश्य ठरवलेले आहे. दैन्य दारिद्र्यात ठेवलेले आहे. हे सारे समूह समदु:खी आहेत. असे असले तरी इथल्या जातिव्यवस्थेने या समूहांना एकमेकापासून खूप मोठ्या कौशल्याने विभाजित ठेवलेले आहे. त्यांच्यामध्ये देखील वरचे, खालचे असे एक स्तरीकरण केलेले आहे. त्यांचे असे स्तरीकरण करणे ही मनुवादी व्यवस्थेची फोडा आणि गुलाम करा ही नीती आहे. विभागलेले राहिल्याने या समूहांची शक्ती विखुरली जाते. विखुरलेल्या अवस्थेत राहून लोकशाहीमध्ये कुठल्याही समदु:खी समूहाला आपली प्रगती साधता येत नसते,हे या समूहातील मंडळींनी ओळखले पाहिजे.आणि सर्व अर्थाने शोषित वंचित व समदु:खी म्हणून एक झाले पाहिजे. परस्परांमध्ये विलीन झाले पाहिजे.

जातीभेदासंदर्भात बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात म्हणतात “जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे. हा आपल्याकडे वहात येणारा नरक आहे आणि त्यामुळे जातिभेदाची कटू फळे व त्याचा दुष्परिणाम आपल्याला सोसावा लागत आहे. आणि खेदाची गोष्ट ही की हे हिंदू लोक आपल्यातील जातिभेद तर दूर करीतच नाहीत उलट अस्पृश्यातील अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा जातीभेद दृढ करावयास झटतात मातंगांना हाती धरून त्यांना महारांच्या विरुद्ध उठवायचे व आपली भेदनीती आमच्यात पसरवायची व आपली एकी होऊ द्यायची नाही. या जातीभेदाची मूळ जबाबदारी जरी हिंदू समाजावर असली तरी आपण आपली जबाबदारी विसरणे आत्मघातकी ठरेल. आपल्यातील जातीभेद नाहीसे करणे व आपल्या भेदनीतीचा फैलाव होऊ न देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आणि आपण हे साधल्याशिवाय आपला भाग्योदय कधीच होणार नाही. महार मांगातील रोटी बेटी बंदी पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. (जनता ८ जानेवारी १९३८)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या संदेशाला अनुसरून आता तरी मनुवाद्यांनी मनात रुजवलेली आपल्या समूहाच्या वेगळेपणाची जाणीव आपण विसर्जित केली पाहिजे.व्यवसाय धंद्यातील वेगळेपणा म्हणजे वेगळी जात नसते. संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या व्यवसाय स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामुळे आता परंपरेने दिलेला हलका व्यवसाय करण्याची गरज नाही. म्हणजेच परंपरेने लादलेले व्यावसायिक वेगळेपणही आता उरलेले नाही. स्व समूहाच्या वेगळेपणात परंपरेने चालत आलेले काही खास असे सांस्कृतिक, मूल्यात्मक वेगळेपण असेल, त्या वेगळेपणात अंधश्रद्धेचा भाग नसेल तर ते वेगळेपण जरूर जतन केले पाहिजे. सांस्कृतिक, भाषिक सौंदर्य हा जीवनाच्या समृद्धीचा भाग असतो. एकमेकाचे सांस्कृतिक, भाषिक सौंदर्य एकमेकांच्यापर्यंत पोहोचल्याने सर्वांचेच जीवन सुंदर आणि समृद्ध बनत असते. म्हणून काही एक सांस्कृतिक वेगळेपण असेल तर ते वेगळेपण परस्परांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे कारण ठरता कामा नये. परंतु संस्कृतीचा भाग म्हणून अंधश्रद्धांची जोपासना होत असेल तर ते मात्र योग्य नाही. अनुसूचित जात समूहातील सर्वच मंडळींनी आपल्या मनाचे भाबडेपण संपवले पाहिजे. आपल्या बुद्धीचा स्वतंत्रपणे वापर केला पाहिजे. चिकित्सक असा विवेकी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. जातिव्यवस्थेने दिलेला हलका, प्रचंड काबाडकष्टाचा, घाणेरडा व्यवसाय निश्चय करून सर्वांनी सोडला पाहिजे. समाजात प्रतिष्ठित असलेला, उत्तम कमाई देणारा व्यवसाय स्वीकारला पाहिजे. आणि खास म्हणजे सर्वांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. आपली नवी पिढी उत्तमपणे शिकली पाहिजे. उच्चशिक्षित बनली पाहिजे. उच्च दर्जाच्या नोकऱ्यांमध्ये गेली पाहिजे. यासाठीही अनुसूचित जात समूहातील मंडळींनी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.

फुले, शाहू, आंबेडकर विचारच मातंग, चर्मकार, आणि एकूणच अनुसूचित जाती व सर्व स्तरातील शोषित समाजाच्या उन्नतीचा विचार आहे. म्हणून मातंग, चर्मकरांनी व बाबासाहेबांच्या नावाचा नुसता जयघोष करणाऱ्या, आपले जुने महारकीचे जोहारपण न सोडलेल्या मंडळींनी हा विचार मनोमन स्वीकारला पाहिजे. आधी एस. सी. प्रवर्गातील सर्वांनी एक झाले पाहिजे. मग एस.टी., ओबीस व अल्पसंख्याकांना स्वतःशी जोडून घेतले पाहिजे. यासाठीची व्यापक आणि शिस्तशीर अशी प्रबोधन प्रक्रिया सातत्याने राबवली पाहिजे. ही शोषित वंचितांना एकजीव करण्याची चळवळ तन मन धन ओतून राबवली पाहिजे. सत्तेतील प्रस्थापित लोकांकडे काहीतरी मागण्यापेक्षा सर्व प्रकारची सत्ता स्वतःकडे खेचून घेतली पाहिजे. आपल्या कल्याणाच्या योजना आखल्या पाहिजेत. त्या प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत. शोषित बहुजनांच्या हाती सत्ता येणे हे अशक्य नाही. कारण ही सत्ता हाती घेण्यासाठीची सर्व साधने बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली आहेत हे लवकरात लवकर जेवढे हे समूह लक्षात घेतील तेवढे हिताचे आहे.

भारतातील भेदाभेद, अतिशूद्र समूहातील लोकांना मिळणारी अपमानास्पद वागनूक ही केवळ आर्थिक विकास झाल्यानेच संपणार नाही. तर आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा विचार मांडला आणि तो बौद्ध धम्माचा स्वीकार करून प्रत्यक्षात आणला. या संदर्भात बाबासाहेब असे म्हणाले होते की, “मी धर्मांतराचे मत पसंत केले. त्यात आपल्यातील महार, मांग, चांभार इत्यादी जातीभेद नष्ट व्हावेत हा एक हेतू आहे. आपण धर्म बदलला तर निदान महार, मांग, चांभार ही नावे तरी आपणास चिकटणार नाहीत. आपण सर्व एक होऊ व उन्नतीच्या मार्गाला लागू.”(अहमदनगर येथील प्रचार सभेतील डॉ. बाबासाहेबांचे भाषण २५-११-१९३७ जनता २-७-२-१९३९) अनुसूचित जातीतील बऱ्याच समूहांना बाबासाहेबांचा हा विचार अजून नीटपणाने समजून घेता आलेला नाही. त्यामुळे तो स्वीकारताही आलेला नाही. विषमतावादी व ब्राह्मणी वर्चस्वाच्या हिंदू धर्म व्यवस्थेने निर्माण केलेल्या भेदाभेदाच्या व अंधश्रद्धांच्या कुबट चिखलातून बाहेर येता आलेले नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध दिशेबद्दलचे खूप मोठे अज्ञान हेच त्याला कारणीभूत आहे. बाबासाहेबांनी दिलेली बुद्ध दिशा ही शुद्ध दिशा आहे. ती सर्व प्रकारच्या भेदाभेदातून व शोषणातून बाहेर काढते. माणूस म्हणून प्रत्येकाला सन्मान देते. बुद्ध धम्मात कुठल्याही अंधश्रद्धांना थारा नाही. बुद्ध हा भारताचा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा सर्वांच्या मनाच्या शुद्धतेला महत्त्व देतो. सर्वांचे चारित्र्य आणि नैतिकता विकसित करतो. ही गोष्ट देखील सर्वांनी समजून घेतली पाहिजे. या संदर्भातील प्रबोधन प्रक्रिया आपापल्या समूहात शिस्तशीरपणे राबवली पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वच अनुसूचित जातींचे उद्धारकर्ते आहेत. त्यांनी भारतातील प्रत्येकच नागरिकाला काही ना काही मूल्यवान अशा देणग्या दिलेल्या आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा सर्वांच्या आदराचा विषय असला पाहिजे. परंतु तो केवळ आदराचा विषय असून चालणार नाही तर अनुकरणाचा विषय झाला पाहिजे. सर्वांनी बाबासाहेबांचे बुद्धिवादी, विज्ञानवादी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतावादी विचार आत्मसात केले पाहिजेत. ते आपल्या आचरणात आणले पाहिजेत. अनुसूचित जातींमधील वेगवेगळ्या समूहांमधून जे काही कर्तृत्ववान महापुरुष इतिहासकाळात झालेले असतील त्यांच्या कर्तृत्वाचा आदर देखील सर्वांनीच केला पाहिजे. तुमच्या समूहातील महापुरुष मोठा की आमच्या समूहातील महापुरुष मोठा अशा प्रकारचा संकुचित वाद कुणीही करता कामा नये. ज्या ज्या महापुरुषांनी समतावाद आणि बुद्धिवाद सांगितला तो तो विचार प्रेरणादायी म्हणून स्वीकारला पाहिजे. कुबट रुढी परंपरा, अंधश्रद्धा व विषमतेचे समर्थन करणारा विचार नाकारला पाहिजे.

अनुसूचित जात समूहातील लोकांवरच आज देखील मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार का होतो? तर या व्यवस्थेतील वरच्या स्तरातील माणसांच्या मनामध्ये या जात समूहांच्या संदर्भातला तुच्छतावाद आजही मोठ्या प्रमाणात आहे. हे लोक आपल्या बरोबरीने येता कामा नयेत असे त्यांना तीव्रतेने वाटते. म्हणून जीवाचा आटापिटा करून वरच्या जात स्तरातील लोक या समूहांचा विविध सत्तेतील सहभाग वाढू नये यासाठी प्रयत्न करतात.अनुसूचित जातींमधील बहुतांश लोक आजही अत्यंत गरिबीत जगतात. ते भूमीहीन, संपत्तीहीन व सत्ता विहीन आहेत. राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून जे सत्तेत गेले ते या शोषितांचे खरे प्रतिनिधी नाहीत. ते प्रस्थापित पक्षांचे गुलाम आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून शोषित समाजाचे हित होईल ही अपेक्षा करता येत नाही. शोषितांचे खरे प्रतिनिधी सत्तेत पाठवण्यासाठीची व्यापक अशी यंत्रणा राबवावी लागणार आहेत. सत्तेत शोषितांचे खरे प्रतिनिधी न गेल्यामुळेच स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात त्यांचे दारिद्र्य इथली व्यवस्था संपवू शकलेली नाही. भारतीय संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी गेल्या ७५ वर्षात जर प्रमाणिकपणाने झाली असती तर अनुसूचित जाती जमातीमधील लोक आज दैन्य दारिद्र्यात राहिले नसते. या समूहांमधील सर्व लोकांचे दैन्य दारिद्र्य संपवायचे असेल, त्यांचे शोषण व त्यांच्यावरील अन्याय अत्याचार थांबवायचे असतील व त्यांना सन्मानाचे जीवन द्यायचे असेल तर या समूहातील सर्व लोकांनी एकत्र येणे हाच एकमेव मार्ग आहे.

आजवर या समूहातील लोकांना इथल्या व्यवस्थेने गुलाम बनवले. आता गुलामी सोडून मालक बनण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. अनुसूचित जात समूहातील आपण सारे बांधव एक होऊ. परस्परांना सहकार्य करू. शिक्षणाची कास धरू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मतशक्ती आपल्यामधला इमानदार असा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी वापरू. अनुसूचित जात समूहातील बऱ्याच जणांना मत विकण्याचा रोग लागलेला आहे. हा रोग फार घातक आहे. या रोगातून सर्वांनी मुक्त झाले पाहिजे. अनुसूचित जातींनी एक होऊन आपल्या अनुसूचित जमातीतील बांधवांना आपल्याशी जोडले पाहिजे. त्याचबरोबर इतर मागास वर्गातील बांधवांना देखील आपल्या सोबत जोडले पाहिजे. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागास वर्गातील समूह फुले, शाहू, आंबेडकरवादी विचार स्वीकारून या देशात जर विवेकी वाटचाल करू लागला तर या देशातील सत्ता इथल्या जात दांडग्यांच्या आणि धनदांडग्यांच्या हातातून हे शोषित समूह अगदी सहजपणे खेचून घेऊ शकतात. आणि आपल्या हातात घेतलेली सत्ता स्वसमूहांच्या हितासोबतच समग्र राष्ट्राच्या हितासाठी प्रभावीपणे राबवू शकतात.

अनुसूचित जाती समूह एकजीव झाले तर काय होईल? परस्परांमध्ये असलेला दुरावा कमी होईल. परस्परांमध्ये प्रेम मैत्री वाढेल. प्रेम मैत्री वाढल्याने सहकार्य वाढेल. खूप मोठी राजकीय सत्ता हस्तगत करता येईल. राजकीय सत्ता हस्तगत करून अनुसूचित जात समूहांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेऊन ते प्रभावीपणे राबवता येतील. सहकारातून व प्राप्त केलेल्या सत्तेतून अनेकविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांची उभारणी करता येईल. अशा संस्थांच्या उभारणीतून या जात समूहाचे परावलंबित्व कमी होईल. स्वावलंबन येईल. जे समूह संपूर्णपणे स्वावलंबी होतात तेच समूह स्वाभिमानाने जगू शकतात. त्याच समूहांना देशात प्रतिष्ठा मिळत असते. त्याच समूहांच्या शब्दाला मान असतो. परंपरेने दिलेले अपमानित स्थान संपवण्यासाठी आणि भारतामध्ये सन्मानाचे स्थान प्राप्त करण्यासाठी अनुसूचित जात समूहातील सर्व मंडळींनी आपापसातील सर्व प्रकारचे भेदभाव दूर करून एकत्र आले पाहिजे. परस्परात विलीन झाले पाहिजे. एकजीव झाले पाहिजे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!