
🌻 प्रा रणजीत मेश्राम
शेजारच्या नेपाळमध्ये सत्तेने पळ काढला. पंतप्रधान पळाले. राष्ट्रपतींनी राजीनामा दिला. मंत्र्यांनी लागोपाठ राजीनामे दिले. आजीमाजी भयभीत आहेत. मिडियावाले घाबरून आहेत.
सध्या सुदान गुरुंग या ३६ वर्षीय युवक नेत्याच्या भोवती नेपाळ फिरतेय. हा सुदान गुरुंग की सुरुंग असे झालेय. त्याच्या एका हाकेवर लाखो तरुण रस्त्यावर येतात. कोण हा सुदान गुरुंग ?
सध्या नेपाळ , सेना संरक्षणात आहे. इतके अस्थैर्य तिथे कसे आले ? सत्तेचा वाढलेला दुरुपयोग हे प्रमुख लक्षण यात दिसते. वाढलेली बेरोजगारी , बोकाळलेली आर्थिक असमानता , इथेतिथे सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार यामुळे तरुण पिढी अस्वस्थ होती. आतून संतप्त होती. ती कदाचित नायकाच्या शोधात असावी. अशा या अस्वस्थतेत सुदान गुरुंग याचा उदय झाला. उद्या तोच नेपाळचे भविष्य ठरणार आहे.
उत्तरेला चीन आणि इतर सर्व बाजूंनी भारत असलेला नेपाळ हा लोकसत्तात्मक देश आहे. हिमालयाच्या पर्वतराजीत त्याचे वास्तव्य आहे. तसा हा संपन्न देश म्हणावा. जगातील दहा सर्वोच्च पर्वत शिखरातील आठ इथेच आहेत. माऊंट एव्हरेस्ट इथेच आहे. ८० लाखाची लोकसंख्या असलेले काठमांडू ही राजधानी आहे. शेती हाच प्रमुख उद्योग समजावा. इथे हे सारे घडतेय.
वाढलेल्या अस्वस्थतेमुळे तरुणांचे निषेध व्यक्त करणे सुरू होते. ते लहान सहान स्वरूपात होते. तरीही सरकारला हे नकोच असे वाटले. बंदोबस्तासाठी सरकारने २६ सोशल मीडिया एप्सवर बंदी आणली. ४ सप्टेंबर पासून बंदी लागू केली. शिवाय , सोशल मीडिया बंद करु असेही घोषित केले.
इथेच ठिणगी पडली. सुदान गुरुंग याने तरुणांचा असंतोष संघटित केला. त्याने या बंदीविरुध्द आवाज उचलला. तो लोकप्रिय सोशल इन्फ्लुएंसर होताच. खासकरून त्याने शाळकरी व काॅलेज तरुणांना आवाहन केले.
सुदान गुरुंग चे नेपाळी तरुणांनी का ऐकावे ? याला काही कारणे आहेत. तो गेली काही वर्षे तरुणांशी संवाद साधून आहे. २०१५ ला नेपाळात भीषण पूर आले. पुरात सुदानचा मुलगा वाहून गेला. तेव्हापासून त्याचे जीवन बदलले. तो तरुणांना समर्पित झाला. त्यांच्या प्रश्नात गुंतला. यासाठी ‘हामी नेपाळ’ हे स्वयंसेवी युवक संघटन काढले. तो एकेक प्रश्न सोडवू लागला. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरला. तरुण त्याचे दिवाने झाले. त्याचे बोलणे जीवाचे कान करून ऐकू लागले.
आता तो सरकारच्या धोरणाविरुध्द बोलू लागला. तरुणांना ते आवडत होते. त्यात सोशल मीडिया बंदी ची बाब आली. सुदान ने 'Gen Z' आंदोलन छेडले. तरुणांना हाक दिली. इंस्टाग्रामवर आवाहन करताना सुदान म्हणाला , 'मित्रांनो , ८ सप्टेंबर इतिहासात नोंदले जाईल. आपण सर्व रस्त्यावर या. वाटल्यास शाळा कॉलेजच्या गणवेषात या. आपण आपली ताकद दाखवून देऊ. मुठी आवळून सरकारला जाब विचारु. आपला आवाज हा आवाज राहील'.
आवाहनाचा परिणाम झाला. लाखो तरुण रस्त्यावर आले. सरकारला असंतोष सांभाळता आला नाही. बंदोबस्ताच्या नादात भलतेच घडले. गोळीबार झाला.
२० तरुण मरण पावले. ३०० हून अधिक जख्मी झाले. आंदोलनाची आग अधिक भडकली.
आता आंदोलन केवळ तरुणांचे उरले नाही. सामान्य नागरिक त्यात उतरलाय. तिव्रता अधिक वाढलीय. आंदोलन सुदान गुरुंग च्या हातून निसटलेय. असंतोषाचे रोज नवे कारण बाहेर येऊ लागले. ते जनआंदोलन झालेय. अधिक हिंसक बनलेय. ज्यांनी गडगंज धनसंपत्ती गोळा केली , वाट्टेल तसा भाईभतीजावाद (नेपोटिज्म) , जातिवाद केला ते अधिक लक्ष्य होऊ लागले.
नेपाळ मात्र मुक्तीचा श्वास घेत घेत चिंतेच्या सावटात आलेय !
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत