महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ

लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- ५/९/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ३५
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला. हा सत्याग्रह फक्त पाणी पिण्यासाठी होता काय? तर तो आम्ही सुद्धा माणसे आहोत.आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क;अधिकार; स्वातंत्र्य आहे. आणि ते हिंदू धर्मातील मनुवादी (ब्राम्हणी धर्म) जाती व्यवस्थेने लादलेल्या विषमतावादी विचार सरणीतून आलेले आहेत. तेव्हा आम्हाला समतेने वागवून घेतले पाहिजे.यासाठी चवदार तळे सत्याग्रह करावा लागला.
काळाराम मंदिर सत्याग्रह सुद्धा समतेची वागणूक मिळावी यासाठी होता. तो काही देवाचे दर्शन घेण्यासाठी नव्हता.
३०–३१ मे – जून – १ – १९३६ मध्ये मुंबई येथे महार परिषद भरली होती त्या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजाला प्रश्न विचारतात की; तुम्हाला
हिंदू (ब्राम्हणी मनुवादी धर्म) समाजात तुमच्या करिता समता आहे काय?
हा प्रश्न खरोखरीच विचारावयास नको.अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानताच आहे.एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही.अस्पृश्यतेपेक्षा जास्त उग्र स्वरुपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्यत्र कोठेच सापडणार नाही.कमी अधिक भावामुळे एकाने आपली मुलगी दुसऱ्याच्या मुलाला न देणे. कमी अधिक भावामुळे एकाने दुसऱ्याच्या बरोबर सहभोजन न करणे.अशा प्रकारचे असमानतेचे निदर्शक वर्तन आपणास पाहावयास सापडते.परंतु एका माणसाला दुसऱ्या माणसाने न शिवण्याइतकी पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज आणि हिंदू समाजाखेरीज अन्यत्र कोठेही सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने माणूस बाटतो.ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते.ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो तो प्राणी मानवाच्या कोटीत गणला गेला आहे.असे कोणी तरी म्हणेल काय? अस्पृश्य माणसाकडे पाहण्याची दृष्टी आणि रक्तपितीने भरलेल्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी यात काय फरक आहे? रक्तपितीने भरलेल्या माणसाबद्दल लोकांच्या मनात किळस जरी असला तरी त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती तरी असते.परंतु तुमच्याबद्दल सहानुभूती तर नसतेच पण किळस मात्र असते.रक्तपितीने भरलेल्या माणसापेक्षा देखिल तुमची स्थिती हीन आहे.अजूनही खेडेगावात एखादा स्पृश्य माणूस उपास सोडीत असताना जर महाराचा शब्द त्याच्या कानावर पडला तर तो अन्न ग्रहण करीत नाही.एवढा कलंक तुमच्या शरीराला; एवढा कलंक तुमच्या शब्दाला आहे.अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक आहे.असे काही लोक म्हणत आहेत.पण त्या बतावणीत खरे म्हटले असता काही अर्थ नाही.हिंदू धर्म कलंकित आहे असे एकही हिंदू मानीत नाही.तुम्ही कलंकित आहात. दूषित आहात.अपवित्र आहात. असे मात्र बहुजन हिंदू समाज मानतो.ही दशा तुम्हाला का प्राप्त झाली? तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे ही दशा तूम्हाला प्राप्त झाली आहे.असे मला वाटते.तुमच्यातील जे मुसलमान झाले त्यांना हिंदू अस्पृश्य मानीत नाहीत व असमान लेखीत नाहीत.तुमच्यातील जे ख्रिस्ती झाले त्यांना हिंदू लोक अस्पृश्य मानीत नाहीत व असमान लेखीत नाहीत. नुकताच त्रावणकोर येथे घडलेला प्रकार विचारात घेण्यासारखा आहे.तेथील थिया जातीतील अस्पृश्य लोकास रस्त्यावरून चालण्याची मनाई आहे.परवाच त्यांच्यापैकी काही जणांनी शीख धर्म स्वीकारला हे तुम्हास माहित असेलच.अस्पृश्य असतांना ज्या लोकांना त्या रस्त्यावरून चालता येत नव्हते त्याच लोकांनी शीख धर्म स्वीकारल्याबरोबर त्यांच्या वरची बंदी उठवली गेली.या सर्व गोष्टींवरून एक गोष्ट सिद्ध झाली आहे की; तुमच्या अस्पृश्यतेला व तुमच्या असमानतेला जर काही कारण कारण असेल तर ते तुमचा आणि हिंदू धर्माचा असलेला लागाबांधा हे होय.
या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की; तुम्ही शिक्षण घ्या म्हणजे तुम्हाला शिवू! तुम्ही स्वच्छ रहा म्हणजे तुम्हाला शिवू! आणि समानतेने वागवू! खरे म्हटले असता अडाणी महाराची; दरिद्री महाराची आणि अस्वच्छ महारांची जी गत होते तीच गत शिकलेल्या महाराची; पैसेवाल्या महाराची आणि स्वच्छ राहणाऱ्या महाराची होते.हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहीत आहे.पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय ; हाती पैसा असल्याशिवाय ; अंगावर पोषाख असल्याशिवाय मान मान्यता मिळणार नाही तर साध्या महाराने काय करावे? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही. ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीटनेटका पोषाख करता येत नाही त्या महाराला समानता कशी मिळणार? ख्रिस्ती धर्मात; मुसलमान धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या; धन; पोषाख ; पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मुळीच नाही.माणसाचे मनुष्यत्व हीच महत्वाची गोष्ट आहे.असे दोन्ही धर्म मानतात आणि ते मनुष्यत्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे.कोणी कोणाचा अवमान करू नये व कोणी कोणाला असमान मानू नये.असे ते धर्म शिकवतात.हिंदू धर्मात या शिकवणीचा पुर्ण अभाव आहे.ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा? आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय हशील आहे? याला उत्तर म्हणून काही हिंदू लोक उपनिषदांची साक्ष देतात व त्यात ईश्वर सर्वत्र भरला आहे असे तत्व आहे.म्हणून बढाई मारतात.विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी अगदी निरनिराळ्या आहेत.एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे.समाजाच्या गळी सर्वांभूती एक ईश्वर हा विज्ञानाचा सिद्धांत आहे.धर्माच्या तत्वाचा वागणुकीशी संबंध असतो.विज्ञानाशी नसतो.सर्वांभूती एक ईश्वर ही धर्माची शिकवण नाही.हे विज्ञानाचे तत्व आहे.धर्माची शिकवण नव्हे.ही गोष्ट हिंदू लोक त्याप्रमाणे वागत नाहीत.हा माझ्या म्हणण्याचा पुरावाच आहे.उलटपक्षी हिंदू लोकांचा असा आग्रहच असेल की; सर्वांभूती एक परमेश्वर हा विज्ञानाचा सिद्धांत नसून त्यांच्या धर्माचा पाया आहे.आणि म्हणून आमचा धर्म श्रेष्ठ आहे.तर त्यांना एवढेच उत्तर पुरे आहे की; त्यांच्याइतके नीच लोक जगामध्ये दुसरे कोणीच नसतील! मुखाने सर्वांभूती ईश्वर असा जप करणाऱ्या आणि कृतीने भूतमात्राची विटंबना करणाऱ्या लोकांचा ! मुखमे राम बगल में छुरी ! बोलणी महानुभावाची पण करणी कसाबाची अशा दुष्ट लोकातच समावेश करावा लागेल.सर्वांभूती एक ईश्वर मानणारे आणि कृतीने माणसाला पशूतुल्य लेखणारे लोक दांभिक आहेत.त्यांचा संग करू नका! मुंग्याना साखर घालणारे व माणसांना पाण्यावाचून मारणारे लोक दांभिक आहेत.त्यांचा संग करू नका! त्यांच्या संगामुळे तुमच्यावर काय परिणाम झाला आहे याची तुम्हाला कल्पना देखील नाही.तुमची इज्जत नाहीशी झाली; तुमचा मानसन्मान नाहीसा झाला! खरे म्हटले असता हिंदू समाजातच तुम्हाला मानसन्मान नाही.हे म्हणने वस्तुस्थितीच्या मानाने अपुरे पडते.तुम्हाला हिंदू लोकच हलके मानतात असे नव्हे.तर मुसलमान व ख्रिस्ती लोक देखिल तुम्हाला हलके लेखतात.खरे म्हटले असता मुसलमान धर्मात ख्रिस्ती धर्मात श्रेष्ठ कनिष्ठ; उच्च निच असा भेदभाव जागृत करणारी शिकवण नाही.असे असताना देखील हे लोक तुम्हाला कमी लेखतात.त्याचे कारण काय? ह्याचे कारण एकच; हिंदू लोक तुम्हाला नीच लेखतात म्हणूनच तुम्हाला मुसलमान व ख्रिस्ती लोक नीच लेखतात.अस्पृश्यांना जर आम्ही समान लेखले तर हिंदू लोक आपल्याला अस्पृश्यांच्या इतकेच खाली लेखतील या भीतीमुळे मुसलमान व ख्रिस्ती लोक तुमच्याशी हिंदू प्रमाणेच अस्पृश्यता पाळतात.आम्ही हिंदू समाजात हीन गणलो गेलो आहोत.इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणूकीमुळे आम्ही सर्व हिंदूस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणलो गेलो आहोत.ही अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरिता हा कलंक धुवून टाकण्याकरिता नरदेहाचे चीज करण्याकरिता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो एकच आहे व तो म्हणजे हिंदू धर्माचा व हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय.
***** उर्वरित भाग पुढे *****
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत