कारस्थानींचा रामदासी चावा बदनाम केला शिवपुत्र ‘छावा’

ज्ञानेश महाराव (ज्येष्ठ पत्रकार – संपादक)
शासकीय प्रकाशनातून छत्रपती संभाजी महाराजांची बेधुंद बदनामी करणारे “राजसंन्यास” नाटक काढून टाका, ह्या इतिहास अभ्यासक व आमदार अमोल मिटकरी यांच्या मागणीला गती मिळाली आहे. पण यामुळे “बदनामीच्या कारस्थानाचा इतिहास” पुसला जाणार नाही, ह्याची काळजी कशी घ्यायची?
“छावा” चित्रपटाने जोरदार धंदा केला असला ; तरी त्या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे समग्र जीवन आलेले नाही. काही प्रसंग वादात सापडले होते. तथापि, त्यात संभाजीराजांना बदनाम करणारे प्रसंग नाहीत; जे “मोहित्यांची मंजुळा”, “थोरातांची कमळा” ह्या चित्रपटात होते. राम गणेश गडकरी लिखित “राजसंन्यास” नाटकात तर बदनामीचा कहर गाठला आहे. ( यावर मी २०११मध्ये झालेल्या रायगडावरच्या “वाघ्या” कुत्र्याच्या वादानिमित्ताने तेव्हाच सविस्तर लिहिले आहे.) बहुचर्चित “छावा” चित्रपटाच्या निमित्ताने शंभूराजांच्या बदनामीच्या कारस्थानाला नव्याने वाचा फुटली. अजितदादा पवार गटाच्या “राष्ट्रवादी काँग्रेस”चे विधान परिषद आमदार व इतिहास अभ्यासक अमोल मिटकरी यांनी शंभूराजांची बदनामी असलेले “राजसंन्यास” नाटक शासकीय प्रकाशनात कसे, असा प्रश्न जाहीररीत्या व विधान परिषदेत उपस्थित केला.
१९६० मध्ये स्थापन झालेल्या “राज्य साहित्य व संस्कृती मंडळ” यांनी प्रकाशित केलेल्या दोन खंडी ग्रंथात हे वादग्रस्त “राजसंन्यास” नाटक आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मंडळाचे अध्यक्ष असताना “संपूर्ण गडकरी”चे प्रथम प्रकाशन झाले होते. त्याचेच गडकरींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १९८४ मध्ये (अध्यक्ष, डॉ. सुरेंद्र बारलिंगे) आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्ताने २०११ मध्ये (अध्यक्ष, मधु मंगेश कर्णिक) पुनर्मुद्रण झाले. ह्या शासकीय प्रकाशनातून “राजसंन्यास” काढून टाकण्याच्या अमोल मिटकरी यांच्या विधान परिषदेतील मागणी व पत्रावर “राज्य साहित्य व संस्कृती मंडळ”चे विद्यमान अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी अनुकूल मत दिले आहे. आता अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाला घ्यायचा आहे. निर्णय कसाही घेतला तरी “शंभूराजांना बदनाम करणाऱ्या कारस्थानींचा इतिहास” पुसला जाणार नाही, ह्याची जबाबदारी कोण घेणार?
राम गणेश गडकरी हे अल्पायुषी (जन्म : २६ मे १८८५, मृत्यू : २३ जाने. १९१९) होते. पण ३४ वर्षांच्या थोडक्या आयुष्यात त्यांनी “एकच प्याला”, “पुण्यप्रभाव”, “प्रेमसंन्यास”, “भावबंधन”, “राजसंन्यास”, “वेड्यांचा बाजार” अशी सहा नाटके लिहिली. यातील शेवटची दोन नाटके अपूर्ण आहेत. त्यांनी “गोविंदाग्रज” या नावाने “मंगल देशा, पावित्र देशा, महाराष्ट्र देशा” यासारखे सकस काव्यलेखन केलंय. “बाळकराम” या नावाने विनोदी लेखन केलंय. याशिवाय त्यांचं अन्य लेखनही आहे. अफाट कल्पनाशक्ती आणि शब्दशक्ती हा गडकरींच्या साहित्याचा विशेष आहे. त्यांच्या लेखणीने, कारुण्य आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिती सारख्याच ताकदीने केलीय. त्यात अतिशयोक्ती असली तरी त्यांच्या लेखणीत वाचक आणि प्रेक्षकांची मनं पकडून ठेवण्याचं सामर्थ्य आहे. या सर्व सामर्थ्यानिशी त्यांनी छत्रपती संभाजी राजांच्या जीवनावर “राजसंन्यास” हे नाटक लिहिलंय. हे नाटक अपूर्ण; म्हणजे पाचपैकी दोनच अंक लिहिलेत, असं अर्धवट नाही. तर, या पाच अंकी नाटकाचे पहिल्या अंकाचे दोन प्रवेश पूर्ण आणि तिसरा प्रवेश अर्धवट लिहिलाय. दुसरा अंक लिहिलेला नाही. तिसऱ्या अंकातल्या पहिल्या प्रवेशाचे एकच गाणे आहे. चौथा अंक लिहिला नाही. पाचव्या अंकात मात्र पाचही प्रवेश पूर्ण लिहिले आहेत.
ह्या नाटकाचे लेखन त्यांनी १९१७ मध्ये सोडून “भावबंधन” हे नाटक लिहायला घेतलं. त्यावेळी ते क्षयरोगाने आजारी होते. तशाही अवस्थेतही त्यांनी “भावबंधन” पूर्ण लिहिलं; आणि थोड्याच दिवसात त्यांचं निधन झालं. “भावबंधन” त्यांच्या मृत्यूनंतर १९२० मध्ये रंगभूमीवर आलं आणि पुस्तकरूपानं प्रकाशित झालं. त्यानंतर १९२२ मध्ये “अपूर्ण राजसंन्यास” पुस्तकरूपाने प्रकाशित झालं. खरं तर, इतकं अपूर्ण असलेलं नाटक पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचं कारण काय होतं? कारण एकच; त्यात संभाजीराजांची असलेली यथेच्छ बदनामी ! या नाटकाची सुरुवातच सौंदर्याच्या मोहनबाधेने धुंद झालेल्या “तुळसा”ला संभाजीराजे रायगडावर आणतात, या प्रसंगाने होते. संभाजीराजांचा रंगेलपणा, त्यामुळे त्यांचा शिवाजीराजांशी झालेला मनभेद आणि शिवरायांच्या पश्चात या साऱ्याबद्दल संभाजीराजांना झालेली उपरती; अशी ह्या नाटकाची मांडणी आहे. हे नाटक पूर्ण असावं. परंतु, परिणामांच्या भयास्तव पुस्तक प्रकाशन करणाऱ्यांनी ते संपूर्ण छापलं नसावं, अशी शंका घेण्यास भरपूर वाव आहे. “गडकरी नाटकाचा शेवट आधी लिहीत,” असं म्हटलं जातं. ते खरं मानलं, तरी लेखन पूर्ण झाल्याशिवाय कुणी “अर्पणपत्रिका” लिहीत नाही.
“राजसंन्यास” पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत “अर्पणपत्रिका” आहे आणि त्याच्या पुढच्या काही आवृत्त्यांत या नाटकाच्या प्रयोगाची छायाचित्रंही आहेत. म्हणजे पुस्तकाप्रमाणेच अर्धवट “राजसंन्यास”चे प्रयोगही झाले. ते काही असो, छापील ‘राजसंन्यास’मध्ये जे आहे, ते संतापकारी आहे. त्यातील संभाजीराजांचा कथित रंगेलपणा हा त्यांची बदनामी करण्यासाठी भटी इतिहासकारांनी रचलेला कट होता, हे इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे व डॉ. कमल गोखले यांनी पुराव्यांसह सिद्ध केलंय. त्यावरून संभाजीरांजाविरोधी कटात गडकरी सामील झाले होते; किंवा त्यांना वापरण्यात आलं होतं, ह्याची साक्षच “राजसंन्यास”मधून मिळते. या नाटकात गडकरींनी संभाजीराजांच्या तोंडून रामदासाच्या झोळीत शिवरायांनी मिळवलेल्या स्वराज्याच्या सनदा टाकल्या आहेत. संभाजीराजे म्हणतात, “राजाने वैराग्याला भीक घातली. खरा शिष्य ! खरा सद्गगुरू ! हाच राजसंन्यास !”
गडकऱ्यांच्या कल्पना-शब्द शक्तीतला हा भिकारपणा इतिहास संशोधक न.र. फाटक यांनी “शिवराय व रामदास यांची भेट कधीच झाली नव्हती,” हे सप्रमाण सिद्ध करून उघडा पाडला आहे. या नाटकात कारकून जिवाजीपंत कलमदाने आणि पैलवान देहू दफ्तरी ही खास ‘गडकरी टच’ पात्रं आहेत. “देहू” हा शिवरायभक्त आहे. त्याच्या या भक्तीची यथेच्छ टवाळी करताना जिवाजीपंत म्हणतो, “अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला; पण खरी करणी रामदासाची आहे ! त्याने आपला दासबोध ग्रंथ लिहिला नसता, तर शिवबाचा एवढा पराक्रम कदाकाळी होताच ना !… हो, घेण्यासारखी गोष्ट काय की, नुसत्या भवानी तलवारीच्या नावाने मराठेशाहीला भगवा रंग चढला नाही; तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्याच्या मुळाशी आहे !” ह्यात उपरोधिकता आहे, पण ती विनोदाने घेण्यासारखी नाही. कारण जिवाजीपंत देहूला अनेकदा “देहूड्या” म्हणत हिणवतो. त्यातून शिवरायांची भेट झालेल्या (देहू गावच्या) संत तुकाराम महाराजांच्या विरोधातला कुत्सित भाव व्यक्त होतो.
शिवरायांची दासबोधी फुटपट्टीने मापं काढून झाल्यावर गडकऱ्यांनी नाटकाच्या अखेरच्या भागात संभाजीराजांच्याच तोंडून “संभाजी हा म्हणजे केवळ छाकटा रंडीबाज!” हे वाक्य वदवून घेतलंय. इतक्यावर ते थांबले नाहीत. “हा संभाजी छत्रपती या किताबतीला नालायक आहे. छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थाची श्रीगंगासागराची व्यभिचाराने मोरी केली. वैराग्याच्या वेगाने फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूबाजाचे तोंड पुसण्याचा रुमाल केला. महालक्ष्मीच्या वैभवाचा जरीपटका फाडून त्याची रांडेची काचोळी केली.” यासारख्या न केलेल्या अपराधांची कबुलीही संभाजीराजांना द्यायला लावलीय. “राजसंन्यास”मधला जिवाजीपंत कलमदाने आपली कट – कारस्थानी ओळख सांगताना म्हणतो, “वारुळातील दोन जिभांची पिवळी नागीण चावली तर एकाच पिढीचा घात होतो. परंतु, कारकुनी कानावरची दोन जिभांची काळी नागीण (लेखणीचा टाक) डसली, तर ती सात पिढ्यांचा सत्यानाश करते !” अगदी अशाचप्रकारे संभाजीराजांना रंडीबाज, दारूबाज, स्वराज्यद्रोही ठरवण्यासाठी गडकऱ्यांची लेखणी “राजसंन्यास”मध्ये चाललीय.
अशा गडकरींचा पुतळा पुण्याच्या “छत्रपती संभाजी पार्क”वरच २३ जानेवारी १९६३ रोजी गडकरींच्या ४३ व्या स्मृतिदिना निमित्ताने बसवण्यात आला. ‘गडकरी स्मृती समिती’ ने दिलेल्या ह्या पुतळ्याचे अनावरण आचार्य प्र.के.अत्रे यांच्या हस्ते झालं. अत्रे हे गडकऱ्यांना ‘लेखन गुरू’ मानत. त्यांनी गडकऱ्यांच्या सर्व नाटकांवर प्रदीर्घ अशी समीक्षा केलीय. ती शासनाच्या दोन खंडी “संपूर्ण गडकरी”मध्ये १५० पृष्ठांची प्रस्तावना म्हणून आलीय. त्यात “राजसंन्यास”ही आहे. पण त्यात अत्रेंनी चलाखीने संभाजीराजांच्या बदनामीकडे दुर्लक्ष केलंय. तसाच प्रकार पुतळा उद्घाटनाच्या भाषणातही केला. तेव्हा अत्रे म्हणाले, “संभाजी उद्यानात गडकऱ्यांचा पुतळा उभारला जात आहे, हे काय वाईट नाही. त्यांच्या ‘राजसंन्यास’ या अप्रतिम नाटकाच्या नायकाचे नाव ज्या उद्यानास आहे, त्या संभाजी उद्यानात तो उभारला जात आहे, हे ठीकच झाले !”
ह्यात काय “ठीक झाले” आणि नायकालाच बदनाम करणाऱ्या राजसंन्यासमध्ये “अप्रतिम” काय आहे, ते अत्रेंनाच ठाऊक! प्रत्यक्षात हा खोडसाळपणा आहे. तो वेळीच लक्षात आला नसेल. पण लक्षात येईल, तेव्हा खोडसाळपणाची खोड मोडली जाईल, ह्याचा अंदाज खोडकरांना असणार! म्हणूनच त्यानंतरच्या ५० वर्षांत गडकरींचा पुतळा अर्धाच राहिला; तो पूर्णपुतळा झाला नाही. तो पुतळा “संभाजी ब्रिगेड”च्या कार्यकर्त्यांनी ३ जानेवारी २०१७ रोजी तोडला. हे कृत्य समर्थनीय नव्हते. ज्याप्रकारे पुण्यातल्या लाल महालाच्या प्रांगणातील शिल्पामधून जिजाऊ – शिवरायांबरोबर असलेले दादोजी कोंडदेवचे शिल्प आंदोलकांनी पुणे महानगर पालिकेतर्फे हटविले; तसेच गडकरींच्या पुतळ्याबाबत झाले पाहिजे होते. विशेष म्हणजे, त्या चार कार्यकर्त्यांचा नितेश राणे यांनी पाच लाख रुपयांची बक्षिसी देऊन गौरव केला होता. (ती बक्षिसी कार्यकर्त्यांनी पुण्यातील “राजर्षी शाहू महाराज विद्यार्थी दत्तक योजना”ला दिली.) तेव्हा नितेश राणे “भाजप – शिवसेना युती”च्या विरोधात; म्हणजे “काँग्रेस” पक्षात होते.
असो. आचार्य अत्रे यांनी राम गणेश गडकरी यांचा “मराठीतला शेक्सपियर” असा गौरव केला आहे. कारण “गडकऱ्यांच्या नाटकांची भाषा- रचना ही ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपियर (जन्म : २६/४/१५६४; मृत्यू : २३/४/१६१६) यांच्या तोलामोलाची आहे,” असे प्र. के.अत्रे यांचं म्हणणं होतं. त्यांच्या पुढे उडी कोल्हापूरचे डॉ. आनंद पाटील यांनी मारलीय. त्यांनी गडकरींची नाटके विल्यम शेक्सपियरच्या नाटकांवर कशी बेतलेली आहेत, ते “मराठी नाटकांवर पाश्चात्य नाटकांचा प्रभाव” ह्या ग्रंथात उदाहरणांसह दाखवून दिलंय. “भाषा, संस्कृती, इतिहास” विषयाचे आंतरराष्ट्रीय “स्कॉलर – संशोधक” असलेले डॉ. आनंद पाटील हे “गोवा विद्यापीठ”च्या इंग्रजी विभागाचे प्रमुख होते. त्यांनी विल्यम शेक्सपियरच्या “किंग हेन्री IV” ह्या नाटकावर “राजसंन्यास” कसे बेतलेले आहे, ते सप्रमाण दाखवून दिलंय.
याशिवाय, “मल्हार रामराव चिटणीसची बखर”देखील संभाजीराजांच्या बदनामी कारण ठरलीय. संभाजीराजांनी अनाजीपंताप्रमाणेच बाळाजी आवजी ह्या चिटणीसालाही “स्वराज्यद्रोह”साठी देहान्ताचे शासन केले होते. ह्या बाळाजी आवजीचा खापरपणतू मल्हार रामराव! त्याने आपल्या खापर पणजोबाचा सूड १३२ वर्षांनी संभाजी राजांची बदनामी करणारी बखर (१८११) लिहून घेतला. ही बखर “टिळक – शाहू महाराजांच्या वादा”च्या पार्श्वभूमीवर (टिळकांनंतरचे “दैनिक केसरी”चे संपादक) न. चिं.केळकर यांनी राम गणेश गडकरी यांच्यापर्यंत पोहोचवली, असे म्हणतात. त्यानुसार, त्यांनी “किंग हेन्री IV” नाटकाच्या चौकटीत संभाजीराजांना कोंबण्यासाठीची लेखनकामाठी सुरू केली. परंतु ह्या बनावट इतिहासाबरोबरच परिणामांचे वास्तव समोर आल्यावर त्यांनी “राजसंन्यास”चे लेखन अर्ध्यावर थांबविले असणार, अशीच साक्ष घटनाक्रम देतो.
“राजसंन्यास” हे गडकरी १९१७ मधलं अपूर्ण नाटक. पण या नाटकामुळे पुण्याच्या “छत्रपती संभाजी पार्क”वरील गडकऱ्यांच्या पुतळ्याची शंभरी भरायला २०१७ उजाडावं लागलं. म्हणजे शंभर वर्षे! याउलट, “किंग हेन्री IV” हे नाटक प्रकाशित झाल्यावर १०० व्या दिवशी शेक्सपियरचे घर लोकक्षोभात जळाले. यावरून जातीनिशी चालवलेली कलमकसाईंची लेखणी सात पिढ्यांना खोट्या इतिहासाच्या कारस्थानात कशी बुडवून टाकते, ह्याचा पुरावाच मिळतो. हा पुरावा “राज्य साहित्य व संस्कृती मंडळ” निर्मित “संपूर्ण राम गणेश गडकरी” खंडातून “राजसंन्यास” नाटक काढल्यास नष्ट होणार नाही का? असे होऊ नये, यासाठी सदर नाटक काढून टाकण्याऐवजी, ह्या नाट्य निर्मितीमागची कारस्थानी कुबुद्धीची तपशीलवार माहिती देणारी पुरवणी खंडासोबत जोडावी. यातून कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, टिव्ही मालिका यातून खोटा इतिहास कसा लोकमानसात रुजवला जातो, ह्याची माहिती वाचकांना मिळेल.
#
(प्रसिद्धी: दै.देशोन्नती, रवि.३१/८/२०२५)
लेख आवडल्यास व्हायरल करा. 🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत