
🌻 प्रा रणजीत मेश्राम
भारताचे पूर्व उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठायत ? ते त्या पदावरून स्वेच्छेने पायउतार झाले की हटवले गेले ? प्रश्न गुलदस्त्यात आहेत.
सकृतदर्शनी ते स्वेच्छेने हटले अशी नोंद आहे. नव्या सत्राच्या पहिल्याच दिवशी (२१ जुलै) त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यात स्वास्थ्याचे कारण नमूद केले. पण कोण जाणे , लोकांच्या पचनी कारण पचलेले नाही. अनेक तर्क वितर्क वाचायला मिळाले. ऐकायला आले.
यात धनखडांना हटवले गेले हा सूर अधिक दिसतो. विद्यमान सरकार धुरिणांना ते पटेनासे झाले असण्याकडे जास्त कल आहे. काही दिवसातील धनखडांच्या हालचाली याला कारणीभूत ठरल्या. राजीनाम्याच्या एक दिवस आधी ते आप च्या वरिष्ठ नेतृत्वाशी खाजगी चर्चा करताना आढळले.
भाजपच्या नजरेत ज्या वेगाने ते वर गेले तेव्हढ्याच वेगाने खाली आले. तसेही ते मुळचे भाजपाई नाहीतच. जनता दल , कांग्रेस , भाजपा असा धनखडांचा राजकीय प्रवास आहे. उपराष्ट्रपती पदाला त्यांची दोन वर्षे उरली होती. दरम्यान हे आक्रित घडले. भारतात ही पहिली वेळ असावी जेव्हा राजीनाम्याला लोकसहानुभूती शून्य दिसतेय.
धनखड राज्यपाल , उपराष्ट्रपती होण्याआधी लोकसभेचे खासदार होते. राजस्थानातील झुंझनू येथून निवडून आले होते.तेव्हा ते जनता दलात होते. १९८९ ची ही घटना आहे. नंतर १९९१ ला कांग्रेस मध्ये आले. १९९३ ते ९८ राजस्थानात कांग्रेसचे आमदार होते. १९९८ ला झुंझनू लोकसभेत पडले. तिसऱ्या स्थानी राहीले. २००३ ला भाजपात प्रवेश घेतला.
भाजपत धनखडांना पुन्हा वरची संधी मिळाली. २०१९ ला ते पश्चिम बंगालचे राज्यपाल करण्यात आले. तिथे ते चमकले. राज्य सरकारशी त्यांचे भिडणे भाजपला प्रभावित करत गेले. आधीच विधीतज्ञ असल्याने त्यांची उपयोगिता वाढत गेली. त्यांचे पाठीला वाक देऊन बोलणे अधिक प्रभावित करुन गेले. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची संधी चालून आली. २०२२ ला उपराष्ट्रपती झाले.
लोकमानसात मात्र त्यांचेसाठी 'चमचासन' हा शब्द रुढ झाला.कदाचित त्यांना ते कळले नसावे. कळते असे की , त्यांची महत्त्वाकांक्षा वाढत गेली. विरोधी पक्षाचे नेतृत्व करावे असेही मनात आल्याचे सांगण्यात येते. विरोधकांशी गाठीभेटी वाढल्या. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांशीही कुरबुरी वाढल्या. सोयी , सन्मान हाही मुद्दा धनखड उचलत गेले.
सरकारी कार्यालयात राष्ट्रपती , प्रधानमंत्री यांचेसोबत उपराष्ट्रपती यांचेही छायाचित्र असावे. सांसदीय क्रमवारीत उपराष्ट्रपती दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतात आले तेंव्हा माझी सरळ भेट ठरवायला हवी होती. पत्नी विदेशी दौऱ्यावर गेली असताना दुतावासांनी ‘प्रोटोकाल’ पाळला नाही. माझा सन्मान , सुरक्षा दर्जा राष्ट्रपती खालोखाल असावा .. असे तक्रारींचे स्वरूप असायचे.
याशिवाय सरकार धुरिणांच्या पाठीमागे त्यांची नकारार्थी तक्रार करणे रोजचेच झाले. प्रधानमंत्री यांचे विरोधात धनखड बोलतात हे पसरले. याशिवाय माझा अपमान केला जातो हीही तक्रार होती. हे सर्व कदाचित वाढत गेले.
आणि २१ जुलै २०२५ दिवस उजडला. सकाळी सकाळी राष्ट्रपती यांचेकडे जड मनाने पद सोडण्याचे पत्र मिळाले.
संसद आवाराला त्यांचे हटणे चांगले ठाऊक आहे. सभागृहात धनखडांची बदललेली वागणूक लपून नव्हती. एक दिवस आधी पत्नीच्या वाढदिवसाला दिलेली शाही पार्टी चर्चेत होती. पार्टीला विपक्षी सदस्यांची मोठी उपस्थिती होती. सत्तारूढ संसद सदस्यांचे कोऱ्या कागदावर सही घेणे उगाच नव्हते.
संसद आवाराला ते हटणे सारे कळतंय. तुर्तास दोन्हीकडून मौन आहे.
दरम्यान अनेक कंड्या पिकत आहेत. धनखडांचा राजीनामा खरा की खोटा ? ते बोलत का नाहीत ? स्वभाव तर बोलका आहे. नक्की आहेत कुठे ? घरबंदीत तर नाहीत ? एक महिना होऊन गेला. अतापता कळत नाही. खरे कळावे. खरे ते धनखडच सांगू शकतील.
येत्या ९ सप्टेंबरला नवे उपराष्ट्रपती येतील. तोपर्यंत ध्यानही हटलेय.
७४ वर्षीय एका महत्वाकांक्षीचे असे स्वप्नभंग झाले. ते किती स्मरणात राहतील कोण जाणे ? पण 'अचानक' नावाचे हे धनखड फार लवकर विस्मरणात गेले !
० रणजित मेश्रामलेखक ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत साहित्यिक समीक्षक आहेत
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत