महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ

लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- २६/८/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ३१
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
वरिल भाग २७ ते ३० मध्ये आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान राष्ट्राला सुपुर्द करतांना केलेल्या भाषणातून समता ; स्वातंत्र्य व बंधुत्व ही तत्वे भारताला व भारतीय लोकशाहीला किती महत्वाची आहेत.या गोष्टीवर प्रकाश टाकलेला आपण पाहिला आहे.
या तत्त्वांचे भारतीय संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा प्रकारे समावेश केला आहे ते पुढे पाहू.
अनुच्छेद क्रमांक १४ मध्ये समतेचे तत्व विषद केले आहे.
राज्य कोणत्याही व्यक्तीला भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.
अनुच्छेद क्रमांक १५ मध्ये धर्म; वंश; जात; लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही.
मग ते दुकाने ; सार्वजनिक उपहारगृहे; करमणूकीची ठिकाणे; सरकारी शाळा; तलाव ;विहिरी; स्नानघाट; रस्ते; इत्यादी ठिकाणी धर्म; वंश; जात; लिंग व जन्मस्थान या वरून भेदभाव केला जाणार नाही.तसेच स्री व पुरुष असा भेदभाव सुद्धा करता येणार नाही.असे स्पष्ठ आहे.
अनुच्छेद क्रमांक १६ मध्ये नोकरीतील समान संधी भारतीय नागरिकांना असेल हे स्पष्ट केले आहे.
अनुच्छेद क्रमांक १९ मध्ये स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये
क) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा.
ख) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा.
ग) अधिसंघ व संघ बनविण्याचा.
घ) भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा.
ड) भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा
छ) कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय; व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल.
अनुच्छेद क्रमांक २५ धर्म स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये सदसदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरणव प्रचार.
सार्वजनिक सुव्यवस्था व नितीमत्ता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदींच्या अधीनतेने सदसदविवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या आचरण्याच्या व त्यांचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत.यात संस्था;संघटना व तिची मालमत्ता यांचेचा सांभाळ करण्याचा हक्क सुद्धा आहे.
अनुच्छेद क्रमांक ४१ कामाचा; शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसाह्यायाचा हक्क :- राज्य हे आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत कामाचा ; शिक्षणाचा हक्क आणि बेकारी; वार्धक्य; आजार व विकलांगता यांनी पीडीत अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्याच्या वाट्याला आले आहे अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील.
अनुच्छेद क्रमांक ४७ पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. :- आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानील आणि विशेषतः मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधी प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.
मुलभूत कर्तव्ये
अनुच्छेद क्रमांक ५१- क
संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था; राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
ग) भारताची सार्वभौमता ; एकता व एकात्मता उन्नत ठेवणे.व त्यांचे संरक्षण करणे.
ड) धार्मिक; भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे.स्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
ज) विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण; मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
झ) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रह पूर्वक त्याग करणे.
समतेचे तत्व म्हणून भारतीय संविधानात. आरक्षणाची तरतूद करून मनुवादी ब्राम्हणी धर्मामुळे मागास राहिलेल्या हिंदू बांधवांसाठी संविधानात विशेष हक्क अधिकार स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले.
अनुच्छेद क्रमांक ३४० हे ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे सामाजिक; शैक्षणिक; आर्थिक; सांस्कृतिक हक्कासाठी अंतर्भूत.
अनुच्छेद क्रमांक ३४१ हे अनुसूचित जातींच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक हक्कासाठी अंतर्भूत.
अनुच्छेद क्रमांक ३४२ हे अनुसूचित जमाती यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक हक्कासाठी अंतर्भूत.
अशी अनेक कलमे भारतीय नागरिकांच्या समान विकासासाठी संविधानात अंतर्भूत आहेत.
यावरून आपणास हे लक्षात येईल की; डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील धर्माच्या रूढी; परंपरा यांच्या नावाखाली पिळवणूक झालेल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानाच्या माध्यमातून तळमळ व्यक्त केली आहे.ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. जातीव्यवस्थेच्या चष्म्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना न बघता राष्ट्र निर्माते म्हणून आपण पाहिले पाहिजे.जातीच्या संकुचित भावनेतून आपण या देशातील महान महापुरुषांना पारखे होतो.तसेच त्यांच्या चांगल्या विचारांपासून कोसो दूर राहिल्याने मानवाच्या विकासासाठी उपयुक्त विचारांपासून दूर गेल्याने एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून आपण घडत नाही. म्हणजे ही राष्ट्र हितासाठी गंभीर बाब आहे.
आपण आता पुढे व्यक्ती व समाज म्हणून या तत्वांचे आपल्या जीवनात काय महत्व आहे ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उर्वरित भाग पुढे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत