
एकाच नेत्यावर दोषारोप ठेवणे हे अयोग्य आहे.बहुतेक आंबेडकर घराण्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना म्हणजे ते आनंदराज आंबेडकर असो अथवा नामदार रामदासजी आठवले,कवाडे,माने असो हे सर्व एकाच माळेतील मणी आहेत.असे म्हटले तर सत्य हे काही लोकांना मिरचीसारखे झोंबते.याचे कारण म्हणजे ज्याच्या त्याच्या नेत्यांचे अंधानुकरण करणारे त्याचे चाहते होय.
सर्वात जास्त जबाबदार घटक म्हणजे त्यांना साथ सहयोग करणारे,त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी,तालुका,जिल्हा,प्रमुख,आणि कार्यकारिणी सदस्यगण होत.या सर्वांनी मिळून आंबेडकरी चळवळ विभाजित करून खिळखिळी केलेलली आहे.असे दृष्टीक्षेपात येत आहे.त्यांना मित्र आणि जहरीला शत्रू याची पारख राहिलेली नाही.त्यामुळे, त्यांना,वाटेल तसे ते राजकीय निर्णय घेऊन मोकळे होतात.
सर्व नेते,त्यांचे पाठीराखे मंडळी आपली व्होट बँक काँग्रेस,बीजेपी व “शी”वसेनेच्या दावणीला बांधत असतात.नेत्याला व नेत्याच्या कार्यकर्त्याला दोष देऊन उपयोग नाही.दोषपणात सर्वांचा कळत नकळत सहभाग आहे.
एखाद्या कार्यकर्त्याला पक्षाचे पद बहाल केले की तो खुश होतो.पण त्याला हे कळत नाही की आपण अल्प संख्यांक आहोत.पद घेऊन आपण आपल्यात फूट पाडत असतो.ऐक्य,एकजूट करा. असे सांगण्याची हिंमत त्या पद घेणाऱ्यात नसते.त्यालाही गट तट हवा असतो.कारण पद मिळालेले असते.बुद्धांचा संदेश पाळा “संघं सरणं गच्छामी” असे तो ठणकावून सांगत नाही.
सारे नेते, पुढारी व नेत्यांचे चेले जोपर्यंत एकत्र येत नाहीत,डॉ. बाबासाहेबांचा संदेश शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. यातील “संघटित” व्हा हा शब्द पाळीत नाहीत तो पर्यंत आंबेडकरी समाजाची प्रगती खुंटत जाईल.पूर्वी तुम्हाला अस्पृश्य म्हणायचे,क्षुद्र म्हणायचे सर्व सामाजिक लाभांपासून वंचित ठेवायचे.
आतातर तुम्ही “वंचित बहुजन” हा शब्द स्वीकारलेला आहे.आणि तुमच्या मते आकर्षक असेलही?जरा विचारमंथन करा.शब्दाने माणसे जोडली जातात आणि शब्दांनीच माणसे तोडली जातात.शब्दांचे युद्ध घनघोर असते.
सत्तेपासून तुम्हाला दूर कसे ठेवायचे,याचे नियोजन तुमच्या शत्रुपक्षाकडे अगोदरच ठरलेले असते.तुम्हाला ते फक्त “जय भीम” म्हणून हाती “निळे झेंडे” धरून भावनिक करून फसवत असतात.वापर करून सोडून देतात.
हा आमचा नेता स्वाभिमानी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा आहे.स्वाभिमानी,स्वाभिमानी म्हणून नेत्यांचे चेले चपाटे,पदाधिकारी नेत्यांची बाजू घेतात.जनमानसात प्रचार करतात.काही वेळेला समाजाच्या भल्यासाठी स्वाभिमान,गर्व,अहंभाव,मी पणा,मोठेपणा बाजूला ठेवावा लागतो.हे यांना कुणी सांगावे.
सध्याचे ताजे उदाहरण आहे की फडणवीस दोन वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते.कमीपणा स्वीकारला होता.हे कुणाच्या सांगण्यावरून तर ते आर.एस.एस.च्या आदेशावरून.त्याचप्रमाणे तुमच्या नेत्यांनी सुद्धा स्वतः एक पाऊल मागे यायला हवे.
तुमचे नेते स्वतः म्हातारे होत आहेत आणि चळवळ सुद्धा म्हातारी करीत आहेत.होतकरू तरुणांना पुढे येऊ देत नाहीत.यात नेत्यांना साथ सहयोग करणाऱ्यांचा सुद्धा दोष आहेच.दोष कुणाला जाऊ नये म्हणून सामाजिक व सार्वजनिक जीवनात खूपच दक्ष राहायला पाहिजे.सध्याच्या राजकीय परिस्थिनुसार,काळाची पाऊले ओळखून डावपेच,नियोजन करून सर्वानुमते राजकीय निर्णय घेणे उचित होईल.
निदान तुमचे सर्व नेते जरी एकत्र आले तरी खूपच फरक पडू शकतो.तुमच्यातील काहीजण म्हणतात की याच्या मागे या,त्याच्या मागे या.यांस आर्थिक मदत करा.या संस्थेचे सभासद व्हा.असे म्हणणे कसे वाटते.याचा विचार तुम्हीच करा.सर्वांनी लोकशाही मार्गाने तुमचा एकच नेता बहुमताने ठरवायला हवा.किंवा सामुदायिक नेतृत्व स्वीकारून एक विचारावर कृती कार्यक्रम करणे योग्य होईल.
आप आपसात नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तद्वतच एकमेकांशी समन्वय सुद्धा ठेवायला काही हरकत नसावी.पण “मी पणा” आडवा येत असतो.”स्वाभिमान” नडतो.तुमच्या अराजकीय जनतेने किंवा नेत्यांच्या चमच्यांनी,साथ सहयोग करणाऱ्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तरच एकजुटीचा प्रयोग यशस्वी होईल.शिवाय तुमच्या नेत्यावर अंकुश ठेवण्यासाठी आर.एस.एस.सारखी मजबूत संघटना हवी.
कवी व लेखक:- भूपती अर्जुन मोरे. ठाणे,9594386277.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत