कानठाळ्या बसवणारी भयान शांतता !

- डॉ. सुरेश वाघमारे
२० जुलै 1924 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम बहिष्कृत समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने बहिष्कृत हितकारणी सभा नावाची संघटना स्थापन केली होती. या संघटनेच्या स्थापनेला 90 वर्ष होतात. पुढील वर्ष हे या संघटनेचे शताब्दी वर्ष असेल. हिंदू धर्माने बहिष्कृत ठरवलेल्या सर्व बहिष्कृत समाजाच्या हक्काचे संरक्षण व्हावे, बहिष्कृत वर्गात जागृती निर्माण व्हावी, या समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी वस्तीग्रह निर्माण करावीत या उद्देशाने या संघटनेची डॉ. आंबेडकर यांनी स्थापना केली. या उद्देशाला अनुसरून त्यांनी या संघटनेचे ब्रीद वाक्य Educate-Agitate and Organise म्हणजे शिकवा जागृत करा आणि संघटन करा पण आम्ही सरसकट शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा अर्थ लावला आणि विविध भाषणात, सभेत असेच म्हणत राहिलो. पहिल्यांदा असा शब्दप्रयोग कोणी केला याच्या खोलात न जाता या ठिकाणी एवढेच सांगता येईल की बाबासाहेबांचा मूळ अर्थच आम्हाला कळला नाही. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या संस्थेत मारवाडी, मातंग, लमान, ब्राह्मण, मराठा या जातीचा समावेश होता या संघटनेची कार्यकारणी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते. या संस्थेचे मुख्य कार्यालय दामोदर हॉल, परळ, मुंबई 12 हे होते. व येथून डॉ. आंबेडकरांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात एका संघटनेच्या माध्यमातून केलेली दिसून येते. या संघटनेच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृतांचे प्रश्न ब्रिटिश सरकार पुढे मांडले, सायमन कमिशन पुढे ठेवले.
त्यानंतर 15 ऑगस्ट 1936 रोजी डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला राजकीय सत्ता देण्याच्या उद्देशाने स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. वास्तविक पाहता हा काळ काँग्रेसच्या लोकप्रियतेचा होता. या चढत्या लोकप्रिय चा फायदा घेऊन काँग्रेसची एक पक्षीय हुकूमशाही निर्माण होऊ नये म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली व देशात हा विरोधी पक्ष म्हणून प्रबळ व्हावा व लोकशाही वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे ही देखील या पक्ष स्थापने मागे त्यांची भूमिका होती. 15 ऑगस्ट 1935 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत ही भूमिका स्पष्टपणे मांडलेली दिसून येते. या पक्षाच्या वतीने 1937 मुंबई कायदेमंडळाची निवडणूक लढवली. विविध जिल्ह्यातून 17 उमेदवार उभा केले. त्यातील पंधरा उमेदवार निवडून आणून काँग्रेसला प्रचंड हादरा दिला. यामध्ये रणखांबे व रोकडे अंतर्गत वादामुळे पराभूत झाले अन्यथा स्वतंत्र मजूर पक्षाचे सर्वच उमेदवार निवडून आले असते. त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष स्थापन केला पण त्याला म्हणावे तसे यश आले नाही. त्यानंतर आयुष्याच्या शेवटी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची कल्पना मांडली हा पक्षही एका जातीपुरता मर्यादित राहू नये या भूमिकेतून चार डिसेंबर 1956 रोजी त्यांनी एसएम जोशी प्र के अत्रे यांना या पक्षात काम करण्याविषयीचे पत्र लिहिले होते. पण 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. आंबेडकर यांचे निर्वाण झाले. त्यानंतर रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला. या पक्षाने 1957 ची सार्वत्रिक निवडणूक लढवली. या पक्षाच्या वतीने लोकसभेसाठी मुंबईतून 11, मध्य प्रदेशातून 3, पंजाब मधून 6 व म्हैसूर, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मद्रास, आंध्र प्रदेश मधून प्रत्येकी एक असे एकूण 25 उमेदवार उभे केले होते. त्यातील नऊ उमेदवार लोकसभेवर निवडून आले होते तर महाराष्ट्र विधानसभेत 13 आमदार होते. म्हैसूर 2, पंजाब 4 मध्ये एकूण सहा आमदार होते. विशेष म्हणजे कुणाची ही लाचारी न करता हे सर्व उमेदवार निवडून आले होते.
त्यानंतर दलित पॅंथरचा अल्पकाळ वगळता राजकीय पक्षात, सामाजिक संघटनेत प्रचंड फूट पडत गेली. राजकीय पक्षांचे तर गजनीच्या मोहम्मदने ही शरमेने मान घालावी एवढे तुकडे झाले आहेत. वास्तविक पाहता आज तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघटित होण्याचा विचार अस्तित्वात येण्याची गरज होती पण आज आम्ही सर्वच आघाड्यावर विभाजित झालो आहोत. सत्तेच्या, पैशाच्या लोभासाठी, तत्व स्वाभिमान घाण ठेवून स्वाभिमान शून्य किळसवाने राजकारण केले जात आहे. स्वाभिमानांने जगण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला. या धम्माच्या माध्यमातून आम्हाला दिशा देणारे भिक्खू अपेक्षित होते पण आज काही भिकू वगळता काही भिक्खू देखील सनातनांच्या गोठात सामील झालेले आहेत. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळाव्यात दलाई लामा सह 500 पेक्षा अधिक भिक्खू स्नानासाठी उपस्थित होते. हे अतिशय वेदनादायी चित्र आहे. त्याप्रसंगी गॅरी डोलहेम म्हणाली की प्रयागराज च्या पवित्र भूमीवर बौद्ध आणि सनातनी संघाच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित आलो आहोत तर संघाचे इंद्रेश कुमार म्हणाले की सनातन म्हणजेच बुद्ध आहे. त्याला मिळालेला प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद पाहून प्रचंड वेदना होतात. आज डॉ. आंबेडकर असते तर त्यांना काय वाटले असते ही कल्पना देखील करवत नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास आज स्वयंघोषित अनुयायी स्वाभिमान शून्य लढाई शत्रूच्या हितासाठी लढत आहेत. निळा ध्वज हातात घेऊन गुलामीच्या कोंडवड्याकडे गुलामीच्या मार्गाने पळणाऱ्या गुलामाच्या शर्यतीत मोठ्या निष्ठेने पळत आहेत. नेते स्वतःला विकण्यासाठी सदैव राजकीय मार्केटमध्ये तयार आहेत. प्रसिद्धी, पद, पैसा, पुरस्कारासाठी स्वयंघोषित विचारवंतही मनुवाद्यांच्या दिंडीत तल्लीन आहेत. धोक्यात आहे फक्त येणारी पिढी. घरात कोणीही शिकलेले नसतानाही आरक्षणाच्या मोर्चात सहभागी झालेली झोपडपट्टीतील पीडित माणूस धोक्यात आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी यापासून वंचित बेकार तरुण धोक्यात आहे. पण यावर कोणी बोलायला तयार नाही, लढायला तयार नाही, लढणाऱ्या लोकामागे बळ देणारा समाजही दिसत नाही. आज दिसते आहे फक्त “कानठाळ्या बसवणारी भयान शांतता” यातून आम्ही कधी बाहेर पडणार आहोत हे केवळ काळावर न सोपवता येथील तरुणांनी विचार करण्याची गरज आहे.
डॉ. सुरेश वाघमारे
ज्येष्ठ विचारवंत, लातूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत