थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे

प्रा. डाॅ.दिलीपकुमार कसबे
जुलै/ऑगस्ट महिना आला की थोर साहित्यिक, समाज सुधारक, लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची आठवण होते १८ जुलै हा त्यांचा स्मृती दिन आणि १ ऑगस्ट हा जन्म दिवस होय. वयाच्या ४९ व्या वर्षी अनंतात विलीन झालेल्या अण्णाभाऊ नी जे साहित्य लिहले हे पाहिल्यानंतर म्हणावे लागते ” मरावे परि कीर्ती रूपी उरावे”.अण्णांच्या वाट्याला अल्प जीवन आले. अण्णांनी गरीबी, हलाखी, दुखी, कष्टी जीवन जवळून पाहिले. अंनत हाल अपेष्टा भोगल्या,सहन केल्या जातीयतेचे चटके सहन केले. मांतग समाजात जन्माला आलेल्या अण्णांना तत्कालीन समाजव्यवस्था व गरीबी मुळे शाळेत जाता आले नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी उद्याच्या रोजासाठी धडपडणारे आईवडील यांना शाळेत जाऊन काय होणार हे कळतच नव्हते. दोन वेळच्या पोटाची व्यवस्था कशी करायची याचा विचार करणाऱ्यां या मुंबईत झोपडीत राहणाऱ्या कुटूंबांना शाळा काय कळणार. केवळ दोन दिवस शाळेचे दरवाजे पाहिलेल्या अण्णांच्या लेखनी ने ,शाहिरीने त्यांच्या पोवाड्याने अत्युच्च शिक्षण घेतलेल्या आजच्या पिढीला अण्णांच्या साहित्याचा अभ्यास करावा लागतोय हे मात्र खरे.
अण्णांच्या जीवनातील बराच काळ मुंबई च्या झोपडपट्टीतच गेला .झोपडपट्टीतील जीवन जगतांना अण्णां जवळून पहात होते,झोपडपट्टीत राहणारे अधिकतर लोक दलित,वंचित समाजाचे होते. छोट्या छोट्या झोपड्या,लोकांचे गलिच्छ राहणीमान, उघडी गटारे, सातत्याने असणारे घाणीचे साम्राज्य, शिक्षणाचा अभाव, पोटाची खळगी भरण्यासाठी देशाच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेले ते गरीब लोक. एका एका झोपडीत, एका एका कुटुंबात १० ते १५ माणसे कशी रहात होती आज कल्पना न केलेली बरी.अण्णां हे सगळे जवळून पहात होते निरीक्षण करत होते त्यामुळेच अण्णांच्या मनात समाज विकासाचे, समाज सुधारणेचे विचार सातत्याने येत होते.महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य ते जवळून पहात होते. बालवयापासून डाॅ. बाबासाहेबांना ते पहात होते त्यांच्या समाज विकासाच्या साधनाकडे त्यांचे लक्ष्य होते. अण्णांना निसर्गाने अलौकिक बुद्धिमतेची चांगली देणगी दिलेली होती. त्यांच्या जवळ सूक्ष्म निरीक्षण शक्ती होती,चांगली स्मरण शक्ती होती. मानवी समाजात काही संधी मिळत नसतील तरी निसर्ग काही तरी देत असतो. तशी बुद्धिमतेची देणगी अण्णांना मिळाली होती. आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर लावण्या, पोवाडे, वगनाट्य यांच्या माध्यमातून जनजागृतीचे काम ते करत होते.
अण्णाभाऊ म्हणायचे “आम्ही ही माणसे आहोत, आम्हाला ही सुखाने, समाधानाने, स्वाभिमानाने व स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे”. त्यांच्या या न्याय मागणीने अण्णाभाऊ साठे पेटून उठलेले होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांचे कवन “जग बदल घालूनी घाव गेले, सांगून भिमराव ” प्रसिद्ध झाले. प्रारंभीच्या काळात पोटाची खळगी भरण्यात कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार,डोअर कीपर, हमाल, रंग कामगार मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा भूमिका वठविणार्या अण्णांनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे उभी केली. ‘फकिरा’ कादंबरी त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अर्पण केली. आपल्या साहित्य रचनेतून त्यांनी पददलित, अन्यायात गरीबीत जीवन जगणाऱ्या माणसांचे वास्तव चित्र रेखाटून अविरत समाज सुधारणेला महत्त्व दिले. आपल्या दलित समाज बांधवांना जागृत करण्याचे काम अण्णाभांऊनी केले.अण्णा समाजासाठी जगले. ते जे जगत होते तेच त्यांनी लिहले. कादंबरी,कथा, नाटके, लोकनाट्य, चित्रपट कथा व असंख्य लावण्या, पोवाडे इत्यादी. मग लोकरंजन, जनजागृती,समाज सुधार,वास्तववादी दर्शन, आंबेडकरांच्या समाज विकासाचा प्रसार-प्रचार अशा या मार्क्सवादी साहित्य सम्राटाने केलेले आहे.
१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्य़ातील वाटेगाव या ठिकाणी जन्मलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या वरती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचाराचा पगडा होता. म्हणूनच त्यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरलेले आहे. आजच्या तरूण पिढी ने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याला सामान्य लोकांपर्यंत पोहचवायला हवे.त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊ साठे आहे,पण वडील भाऊ सिधोजी साठे व आई वालबाई यांचे हे थोरले, मोठे रत्न असल्यामुळे कुटुंबात त्यांना सर्वजण अण्णा म्हणत. तसेच पुढे तेच नाव अण्णाभाऊ म्हणून उदयास आले, ज्याप्रमाणे संत तुकारामांचे अभंग, साहित्य समाज सुधारणा करणारे, अंधश्रद्धेपासून बाजूला करणारे होते, तसेच साहित्य अण्णाभाऊ साठेंचे आहे. त्यांचे लेखन हे कृतीशीलतेवर आधारलेले होते.जे भोगले, जे पाहिले, जे अजूबाजूला दिसत होते त्याच्यावर त्यांनी लिहलेले आहे. त्यांच्या साहित्यांने अनेकांना प्रेरणा दिली. १९५८ मध्ये मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले होते की “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे ” याचा अर्थ असा आहे की जग हे दलित, कामगार लोकांच्या मेहनतीवर चाललेले आहे. हे कष्टकरी लोकच नसतील तर जवळ असणारा पैसा कोणाला देऊन कामे करून घेणार आहोत. आज किती तरी मशिनी येत असल्या तरी यातील महत्वाचा घटक आहे माणूस. जागतिक संरचनामध्ये त्यांनी दलित,आणि कष्टकरी कामगार वर्गाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे हे मात्र स्पष्ट झाल्याशिवाय रहात नाही.यातूनच पुढे १९६१ साली त्यांना रशियात बोलाविण्यात आले. इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी च्या निमंत्रणावरून ते गेलेले होते.
अण्णाभाऊ साठेंच्या लेखनीची धार १९५१पासून आली त्यांनी लिहलेल्या कादंबरीवरती चित्रपट काढण्यात आले. १९६१ ते १९७४ पर्यंत हे काम चालू होते १८जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या ‘वैजयंता’ या कादंबरीवरती १९६१मध्ये वैजयंता हा चित्रपट, ”आवडी’ या कादंबरीवर १९६९ मध्ये टिळा लावते मी रक्ताचा ,’माकडीचा माळ’ या कादंबरीवर १९६९मध्ये डोंगरची मैंना, ‘चिखलातील कमळ’या कादंबरीवर १९६९ मध्ये मुरली मल्हारी रायाची, ‘ वारणेचा वाघ ‘ या कादंबरीवर १९७० मध्ये वारणेचा वाघ, ‘अलगूज’या कादंबरीवर १९७४ मध्ये अशी ही साताऱ्याची तर्हा, तर ‘फकिरा ‘या कादंबरीवर फकिरा असे मराठी चित्रपट बनविले गेलेले आहेत.त्यांच्या कथासंग्रह मधील निखारा, नवती, फरारी, पिसाळलेला माणूस, जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडा, गजाआड, बरबाद्या कंजारी, चिरानगरची भुतं, कृष्णाकाठच्या कथा खूप गाजलेले आहेत. तर कांदबरी मधील चित्रा, फकिरा, वारणेचा वाघ, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ,वैजयंता, रत्ना, रूपा, गुलाम, चंदन, मथुरा, आवडी, वैर, पाझर, या कादंबरी अतिशय गाजल्या.त्यांच्या कादंबर्या वर भारतीयच नव्हे विदेशी २२ भाषांत भाषांतरे झालेली आहेत.अण्णांचे अफाट साहित्य त्याच्यावर लिहणे म्हणजे एक स्वतंत्र अभ्यास होऊ शकतो. अशा या थोर साहित्य रत्न, साहित्य सम्राट अण्णांनी वंचित, शोषित,गावकुसाबाहेर राहणाऱ्या बहुजन समाजाच्या लोकांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा त्यांनी मांडलेल्या आहेत. जवळ जवळ ३५ कादंबर्या, १० लोकनाट्ये, २४ लघु कथा, १० पोवाडे, ०१ नाटक, व ०१ प्रवास वर्णन अशी ही अण्णांची ग्रंथ संपदा आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक संशोधने झालेली आहेत, चालू आहेत तर अनेक विद्यापीठा मध्ये त्यांचे साहित्य अभ्यासले जात आहे. पण अद्याप ते ज्ञानपीठ पुरस्कारा पासून बाजूला आहेत पुढे हा ही मरणोत्तर सन्मान त्यांचा होईल अशी अपेक्षा आहे.
प्रा. डाॅ.दिलीपकुमार कसबे
स.गा.म.काॅलेज, कराड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत