“सांची स्तूप – इतिहास आणि महत्त्व”

“सांची स्तूप – इतिहास आणि महत्त्व”
सांची स्तूप मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात, भोपाळपासून सुमारे ४६ किमी अंतरावर आहे. हे भारतातील सर्वातप्राचीन आणि प्रसिद्ध बौद्ध स्मारकांपैकी एक आहे.
बुद्ध धम्माच्या पाडावानंतर सांचीचा स्तुप मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला होता. हा स्तुप प्रथम जनरल टेलर या ब्रिटिश अधिकाऱ्यांने शोधून काढला. त्यांनतर ब्रिटिश पुरातत्वीय संशोधक अधिकारी जनरल कनिंघम यांनी सहाव्या शतकात भारतात आलेल्या चिनचे विद्वान बौद्ध भिक्खु ह्येन सांग यांच्या प्रवासवर्णनाचा अभ्यास करून सांचीच्या स्तुपाचे वैज्ञानिकदृष्ट्या उत्खनन करून सर्व शिलालेख व ऐतिहासिक स्तंभ व इतर पुरातत्वीय वस्तूंचे जतन केले..
सांचीच्या स्तुपामध्ये भगवान बुद्धांचे शिष्य भिक्खू सारीपुत्त व भिक्खू महामोग्गलायन यांच्या अस्थिंचे पात्र व शिलालेख सुध्दा आढळून आला होता. सुरुवातीला भिक्खू सारीपुत्त व भिक्खू महामोग्गलायन यांच्या अस्थी ब्रिटिश पुरातत्वीय संग्रहालयात जतन करून ठेवल्या होत्या व कालांतराने भारत सरकारच्या विनंतीनुसार त्या अस्थी सांची येथील पुरातत्वीय वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये शेवटच्या शनिवारी व रविवारी ह्या अस्थी अवलोकनासाठी ठेवल्या जातात व अस्थींची भव्य मिरवणूक काढण्यात येत असते.
कलिंग युद्धानंतर हृदयपरिवर्तन झाल्यावर सम्राट अशोकाने बुद्ध धम्म स्वीकारला. बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी आपले जिवन वाहुन घेतले. सम्राट अशोकाने तथागत भगवान बुद्धांचे तत्कालीन अस्तित्वात असलेल्या आठ अस्थिस्तुपापैकी सहा अस्थिस्तुपांचे उत्खनन करुन त्या अस्थिंचे ८४ हजार स्तुप तत्कालीन जंबुद्वीपात (आजचा भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, तुर्कस्तान, कझाकस्तान, ग्रिक, चिनचा काही भाग इराण इराक) निर्माण केले. सम्राट अशोकाने असाच एक स्तुप सांचीमध्ये सुध्दा इसवीसन पुर्व तिसर्या शतकात निर्माण केला. भगवान बुद्धांच्या अस्थी-अवशेषांचे जतन करणे आणि त्यांच्या स्मृतीसाठी स्मारक उभारणे हा स्तुप निर्माण करण्याचा मुख्य उद्देश होता.
सांची स्तूपावर अर्धवट तुटलेल्या स्थितीमध्ये अशोकस्तंभ सुध्दा आहे. हा स्तंभ जेव्हा ऊभारला तेव्हा ८२ फुट लांबीचा होता. स्तंभासाठी बलुवा दगड अंदाजे सहाशे किलोमीटरवरुन चुनार (मिर्झापूर ऊत्तर प्रदेश) येथुन गंगा नदी, सोन नदी व जमीनीमार्गे सांचीच्या पर्वतापर्यंत आणन्यात आला होता. कल्पना करा त्याकाळी आताच्या काळासारख्या सुविधा व यंत्रणा नसतानासुद्धा किती मेहनतीने तत्कालीन तंत्रज्ञान वापरून ८२ फुट लांबीचा बलुवा दगड ६०० किलोमीटरवरुन कसा आणला असेल ?
सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या विटांच्या सांची स्तुपांचा नंतर पुढे शृंग राजांनी जिर्णोद्धार केला व बलुआ दगडाने (Sandstone) आच्छादीत केला व त्यावर तत्कालीन साहीत्य वापरुन मुलामा दिला. कुंपण (Railing) बसवले.
पुढे सातवाहन राजांनी सांची स्तुपाचा विस्तार व सुशोभिकरण केले तसेच पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांनी तोरण द्वार बनवले व चारही तोरण द्वारावर भगवान बुद्धांच्या जिवनावर आधारित काही प्रसंग दगडावर बारीक बारीक नक्षीकाम करून कोरून घेतले. स्तूपावर बुद्धांच्या जीवनातील चार प्रमुख घटना दर्शविल्या आहेत — जन्म (लुंबिनी)
ज्ञानप्राप्ती (बोधगया)
धर्मचक्र प्रवर्तन (सारनाथ)
महापरिनिर्वाण (कुशीनगर)
सांची स्तूपाचा आकार अर्धगोल (घुमटाकार) आहे. मध्यभागी चैत्यगृह (Relic Chamber) आहे, जिथे बुद्धांचे अस्थी-अवशेष ठेवलेले आहेत.
सांची स्तूप बौद्ध धर्माचे प्रमुख प्रतीक आहे.
तो शांती, करुणा आणि ध्यानाचा संदेश देतो.
या ठिकाणी दरवर्षी लाखो बुध्द धम्माचे अनुयायी आणि पर्यटक येत असतात. स्तूपाभोवती प्रदक्षिणा मार्ग (Pradakshina Path) आहे.
तोरणद्वारांवरील शिल्पकला अत्यंत सूक्ष्म आणि कलात्मक आहे. तोरण द्वारावर बुद्धांना थेट दाखवलेले नाही, तर प्रतीकांद्वारे दाखवले आहे-उदा.पदचिन्ह, धर्मचक्र, बोधीवृक्ष, सिंह, हत्ती इ.
सांचीच्या स्तुपाला तत्कालीन जंबुद्विपातील विविध दानदात्यांनी दान दिल्याचा उल्लेख असलेले शिलालेख मिळालेले आहेत. स्तुपाला राजांनी, स्त्रिया, कारीगिर, व्यापारी बंधुनी, अगदी हत्ती वाले यांनी सुध्दा दान दिल्याचा उल्लेख असलेले शिलालेख आढळले आहेत.. महाराष्ट्रातील आजच्या कराड येथील भिक्खूने दान दिल्याचा उल्लेख आहे. आताचे महाराष्ट्रात असलेले कराड हे एकेकाळी इसवी सन पूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकात नावाजलेले बौद्ध सांस्कृतिक शहर होते.
सांची स्तूपाला इ.स. १९८९ मध्ये UNESCO World Heritage Site चा दर्जा मिळाला. सांची स्तूप भारतीय बौद्ध कला, स्थापत्य आणि धार्मिक इतिहासाचा अद्वितीय नमुना आहे. माझी खूप दिवसांची सांची स्तुपावर जाऊन अभ्यासण्याची इच्छा होती व नुकताच जाऊन आलोय.
धनराज मोहोड नवी मुंबई.
मोबाईल नंबर 7021563408
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत