उद्योगदेशभारतमहाराष्ट्रमुख्य पानविचारपीठ

“दिवाळ”


माझ वय अठ्ठावन्न पूर्ण आहे.
मला अक्कल आली तेंव्हाची परिस्थिती आजच्या पेक्षा फारच वेगळी होती. आमची लोक शेती करायला लागली होती. खाऊन पिऊन सुखी होती. पण आजची दिवाळखोरी करण्याची ऐपत तेंव्हा कुणाच्यातही नव्हती. ना कुणब्या मराठ्यांची ना आमची महारामांगांची. आणि हा दिवाळी नावाचा संसर्ग खेडोपाडी तेंव्हा पसरला नव्हता. हा हंगाम म्हणजे शेती कापण्याचा हंगाम. तांबड फुटायच्या आत उठायच, राबराब राबायच ,कसबस जेवायच. माणूस इतका व्यस्त की त्याला कुठली आलीय दिवाळी अन कुठला दसरा. कधी धान्य घरात येतय आणि कधी ते मळून, दळून चार घास पोटाला मिळतात अशी परिस्थिती घरा घरात होती. चाळीस पंचेचाळीस वर्षा पूर्वी ही परिस्थिती. मग एकोणीसशे छप्पन्न साला पूर्वी काय असेल परिस्थिती ?
आमच्या कडे नव्हती शेती, शेतात मोलमजूरी कराण्याचही स्वातंत्र्य आम्हाला नव्हत. मग आमच्या महारांना काय काम होत त्या काळात माहीत आहे ?
महारांना म्हारकीच काम होत. मेलेली जनावर ओढून गावाबाहेर दूर नेऊन टाकण, गावच्या वेशीची गावाबाहेरून राखण करण, मैताचा सांगावा घेऊन गावोगावी जाण, गावात पंचायत (मिटींग) बसणार असेल तर रात्री गावात हाक मारण. ( मिटींग आहे अस जोर जोरात ओरडून सांगण ) या कामाचा मोबदला जो होता तो खूपच तुटपुंजा होता. त्या मुळ पराकोटीच दारीद्र्य आमच्या महार , मांग,चांभार बांधवांच्या वाट्याला आल होत.
दोन वेळच पोटभर अन्न नव्हत. अंगभर सोडा अर्ध अंग झाकेल इतक वस्त्रही नसायच. स्त्रीयांना चोळी माहीत नव्हती, पदरानच जेमतेम अंग झाकून त्या जगत होत्या . सहसा बाहेरच पडत नव्हत्या.
लेकर सगळी नागडी उघडी मनगटान शेंबूड पुसत खेळायची , बागडायची. प्यायला पाणी नव्हत आंघोळीची काय परिस्थिती असेल कल्पना करा.
सावलीचा विटाळ होता. भर दुपारी किंवा रात्रीच गावात फिरायला मुभा होती. मोल मजूरीच स्वातंत्र्यच नव्हत. चटणीवर टाकायला तेल नव्हत तिथ दिवाळीचा दिवा लावला असेल आमच्या लोकांनी ? केली असेल दिवाळी साजरी ?
14 आॕक्टोबर 1956 रोजी आपल्या महान बापान बौध्द धम्माची दिक्षा दिली त्या वेळीही हीच परिस्थिती होती. मग बाबासाहेब आंबेडकरांनी का आम्हाला बौध्द धम्माची दिक्षा दिली याचा विचार करण आम्हाला गरजेच वाटत नाही ? का ?
मुळातच दिवाळी ही ना बौध्दांची प्रथा आहे ना बहुजनांची. इडा पीडा जावो आणि बळीच राज्य येवो ! हे वाक्य अधून मधून ऐकायला यायच. कोण हा बळी ? हा बहुजन दानशूर राजा. नितीन वागणारा न्यायप्रिय राजा. त्याला वामन नावाच्या ब्राम्हणान कपटान ठार मारून त्याच राज्य बळकावल. या दिवसालाच ब्राम्हणांनी बळीप्रतिपदा म्हणायला सुरवात केली. कारण महान राजा बळीचा त्यांनी या दिवशी खून केला होता. आणि याच बळीप्रतिपदेला मोठा उत्सव साजरा करण सुरू केल. जर आमच्या बहुजन राजाला मारून हा उत्सव साजरा करायला लावला असेल तर तो बहुजनांनी का करायचा ? दुसरी घटना महान भिक्खू सारीपुत्त आणि महा मोग्लान यांचाही खून कार्तीक आमावास्येला करून ब्राम्हणांनी दिवे लाऊन उत्सव साजरा केला होता. तसेच बौध्द राजा बृहद्राथाचा खून पुष्यमित्रशुंग या ब्राम्हण सेनापतीने याच कार्तीक आमावास्येला केला होता. जर दिवाळी हा आमच्या बौध्द महामानवांच्या खूनाचा उत्सव दिवस असेल तर तो आम्ही बौध्दांनी का साजरा करायचा ? इतिहास माहीत नव्हता तोपर्यंत ठीक होत. परंतु आता इतिहास माहीत झालेला असताना आपण का चुकीच्या प्रथा परंपरा जपायच्या ? का आम्ही थुंकलेली थुंकी पुन्हा चाटतोय ?
मला सगळ्यात मोठा पुरावा हा वाटतो की
आद. प्रबोधनकार ठाकरेंनी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळ. या लहानशा ग्रंथात स्पष्ट लिहिलय की हे सण उत्सव हे बहुजनांच्या पराभवाचे , दुःखाचे दिवस आहेत आणि ब्राम्हणांसाठी आनंदाचे आहेत. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की हे सण उत्सव आपले नाहीत.
इतक स्पष्ट सांगूनही आम्ही का दिवाळी साजरी करायची ?
आमच्या लोचट बौध्दांनी ऐपत आली म्हणून दाव तुटलेल्या वळूगत उधळून समाजाला सैरभैर करण्याचे सल्ले देऊ नये.
आमच्या बापान हिंदू सण, परंपरा, कर्मकांड जपायला आम्हाला बौध्द नाही केल. आमची प्रगती संविधान, आरक्षण या दोनच गोष्टीमुळ झालेली नाही. आम्ही इतर बहुजनांच्या चार पावल पुढ गेलो ते बौध्द झालो म्हणून.हे मान्य नसेल त्यांनी सन्मानान पुन्हा हिंदू धर्मात जाव. बौध्द धम्म नासऊ नये.
दिप दानोत्सव म्हणे बौध्दांचा. अरे बुध्दांच्या विज्ञानवादाचा तरी विचार करा. खरच तथागत बुध्दांनी दिवाळी साजरी करा म्हणून सांगिली असती का ? की बंदी आणली असती ?
अरे आजही जेवणाला फोडणी द्यायला तेल नसलेले करोडो लोक आहेत. तमाम भारतीय शुध्द शेंगदाणा, तीळ, मोहरीच तेल खाऊ शकत नाही. ऐंशी टक्के पाम तेल आणि पंधरा वीस टक्के शेंगदाणा तेलाचा फ्लेवर दिलेल भेसळीच तेल अख्खा देश खातोय. तरीही करोडो दिव्यात तेल जाळायला बुध्दांनी परमिशन दिली असती ?
आपण का मेणबत्ती जाळतो ? विचार तरी करा ?
करोडो दिवे जाळून का वातावरणात कार्बन वाढवताय ? का आॕक्सिजन नष्ट करताय ? का फटाक्यांच्या धुरान हवा अशुध्द करून माणसांना पशु प्राण्याना इजा करताय ? आपण विज्ञानवादी बुध्द स्विकारलेला आहे याच भान ठेवा. दिवाळीत तेल आणि फटाके जाळून तुम्ही पैसाही जाळताय अक्षरशः. दहा रुपयाची नोट जाळून बघा. पण फटाके किती रुपयांचे जाळता ? केलाय विचार ?
जीव श्रुष्टीला उपयुक्त आॕक्सिजन सुध्दा आम्ही नष्ट करतोय. मी शाळेत असताना शाळेत एक प्रयोग शिकवला होता. एक टेबलावर एक मेणबत्ती पेटवली. नंत त्या मेणबत्तीवर एक काचेचा ग्लास उपडी ठेवला. काही सेकंदात मेणबत्ती विझली.
शिक्षकांनी विचारल ,मेणबत्ती का विझली ? कुणालाही बरोबर उत्तर देताच नाही आल. मग शिक्षकांनी सांगितल , ग्लासातल आॕक्सिजन जळून नष्ट झाल म्हणून मेणबत्ती विझली. हा प्रयोग प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यान केला असेल. तरी करोडो दिवे जाळताना का मनाला प्रश्न पडत नाही की आम्ही वातावरणारला आॕक्सिजन नाहक नष्ट करतोय. कधी याचा विचार करणार आम्ही ?
बौध्दांनीच नाही तर कुणीच दिवाळी साजरी करून आपल्या ऐपतीच आणि बुध्दीच दिवाळ काढू नये .
घातक प्रथा परंपरा बाद करायला पाहिजे.
मी यु ट्युबवर विषय टाकला, दिवाळी हा सण बौध्दांचाच आहे. शेकडो व्हिडियो आल्या. मग मी विषय टाकला , दिवाळी हा सण बौध्दांनी का साजरा करू नये. या विषयावरही शेकडो व्हिडियो आल्या.याचा अर्थ काय होतो ? याचा अर्थ स्पष्ट हा होतो की बाजारात जशा ओरीजनल आणि डुप्लीकेट अशा दोन्ही वस्तू मिळतात तशा आजच्या विज्ञानयुगात ज्ञानाच्या बाजारातही दोन्ही गोष्टी मिळतात. मग प्रश्न हा निर्माण होतो की यातल योग्य अयोग्य,खर खोट निवडायच कस ? तांदूळ निवडताना तांदळातले खडे निवडताना हा प्रश्न पडतो कुणाला ? नाही. असा एकही माणूस जगात भेटणार नाही की तो तांदूळ फेकून देईल आणि दगड शिजवेल. का ? कारण जगातला एकही माणूस असा नाही की त्याला तांदूळ माहीत नाही. हेच कारण आहे की आम्हाला योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही. सत्य काय असत्य काय हे कळत नाही. जस तांदूळ जाणतो तो माणूस तांदळातले खडे निवडून खडे फेकून देतो . सेम तसच ज्याला बुध्द माहित आहे त्याला बाजारात आलेले विचार सत्य आहेत की असत्य हे ठरवायला वेळच लागणार नाही. आमचे लोक बुध्द जाणून घ्यायला तयारच नाहीत. त्यामुळ मग बाजारतल्या झगमगाटान हे लोक बुजतात आणि बुजलेला बैल जसा उधळतो तसे उधळतात आणि काहीही स्विकारातात. स्विकारतात इथपर्यंत ठीक आहे. पण घातक गोष्ट ही आहे की हे लोक स्वतः स्विकारलेल्या असत्याला सत्य मानून पसरवतात. हे पसरवताना त्यांना आपण तथागत बुध्द आणि विश्वरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचाही अपमान करतोय याच भानच राहात नाही.
आज मला एका बौध्द शिक्षकान दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तेंव्हा आश्चर्य नाही वाटल पण खूप वाईट वाटल. एका शिक्षकालाही बुध्द कळलेला नाही. त्याला बुध्द आणि आपला महान बाप कळला असता तर त्याने मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याच नसत्या ना ?
वीजेचा शोध लागला नव्हता तेंव्हा घरा घरात तेलाचे दिवे रोज जळायचे. आज द-या खो-यात वीज पोहोचली.
मग का लावायचे माणसाच उपयुक्त खाद्य तेल असलेल्या तेलाचे दिवे ? आजही भारतातले देव आणि देवळांचा धर्मवाले जाळत आहेत, ओतत आहेत रोज देवाच्या पुढ्यात लाखो लीटर तेल आणि तूप.
म्हणून बाबासाहेब उद्वेगान म्हणतात की भारतातले लोक माणसाला उपयुक्त असलेल खाद्य तेल, तूप आणि दूध देव मानलेल्या दगडावर ओततील आणि भाकरी कोरड्या चटणी बरोबर खातील. या वरूनच हे सिध्द होतय की रोज इथ लाखो लीटर तेल , तूप, दूध, दही, जाळल आणि ओतल जातय. त्यात सण उत्सवात ते मोठ्या प्रमाणात जाळल जातय.
कशा साठी ?
तेलाचा, तुपाचा दिवा लावण ही असेल श्रध्दा/अंधश्ध्दा देव मानणारांची. पण बौध्दांनी का लावायचे तेला तूपाचे दिवे ?
का आपण वागायच अवैज्ञानिक ?
जर आम्ही बौध्द असे अवैज्ञानीक वागत असू तर मग आम्ही स्विकारला तो बुध्द कोणता ? विज्ञानवादी की ब्राम्हणी भेसळयुक्त ?
बाबासाहेबांना विचारल की बाबासाहेब तुम्ही कोणता धम्म स्विकारलात ?
महायान की हीनयान ?
बाबासाहेब म्हणाले,
नवयान.
नवयान म्हणजे काय ?
नवा बुध्द ?
की खरा बुध्द ?
बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला खरा बुध्द धम्म दिला. जो भेसळीन लोप पावला होता.
लोक तांदूळातून खडे निवडतात. बा भीमान खड्याच्या राशीतून धम्म निवडला. सखोल अभ्यास करून आम्हाला खरा बुध्द दिला. तो खरा बुध्द आम्ही समजून घेतला पाहिजे. तस न केल्यास भेसळ अशीच कुष्ठरोगासारखी पसरत राहील. आपल्या आपल्यात वाद होत राहातील. शिक्षक, वकील, डाॕक्टर दिवाळीच्या शुभेच्छा देतील आणि आमचे सामान्य लोक या रोगाने पिडीत होतील.
एक वर्ग असा तयार होतोय की प्रत्येक हिंदू सण हा आपला बौध्दांचाच आहे हे ठामपणे सांगत आहे. आणि दुसरा वर्ग याच्या विरोधात उभा आहे. संसर्ग होणारा वर्ग भर भर वाढतोय. आणि सत्यासाठी भांगणारे लोक खूप कमी आहेत. त्यामुळ रोग भरभर वाढतोय. याच भान ठेऊन खरा बुध्द आम्ही स्विकारला पाहिजे. तो स्विकारला तरच या रोगाचा संसर्ग होण थांबेल. थांबवायचा की नाही हे ठरवा.
जयभीम.
नमो बुध्दाय.
🙏
वसंत कासारे.
(8087480221)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!