फाटलेले आभाळ शिवतोय; हुसैन मंसूरी !

🌻 प्रा रणजीत मेश्राम लेखक अभ्यासक विचारवंत साहित्यिक समीक्षक आहेत
कोणताच भपका नाही. की चमको नाही. सहज वागतोय. सहज सहज. ते आवडते. भिडते. चटकन शिरते. मनात. हृदयात. अजब गोडवा आहे. असहायतेला हा शिवायला निघालाय. कोण हा ? हुसैन मंसूरी. मुंबईचा.
विवाहित आहे. चार्टर्ड अकाउंटंट आहे. दुसऱ्यांच्या अर्थव्यवहाराला मार्गी लावतांनाच इथे पडला. आता त्याचे जीवनदेणे झाले. कमालीचे समर्पण आहे. त्याची चित्रफित पहात असतांना भेसूर गरीबीचे दर्शन होते. किती असहायता ? भूकभय दाटून आलेय. रस्त्यावरचा भारत भीषण आहे. किती गरीबी ? किती फाटलेपण ? दाटलेल्या काळोखात एक पणती ! असे जाणवतेय !
किती प्रसंग सांगू ? प्रत्येक प्रसंग एक पाठ आहे. हुसैन च्या चित्रफिती बोलतात. संवाद करतात. हाक देतात.
रस्त्यावर कोबी , सांभार विकणारी. वर छत नाही. पावसात भिजत असलेली. भिजलेल्या नजरा गिऱ्हाईक शोधतांना. तेव्हा हा येतो. हाही भिजतो. सगळा भार विकत घेतो. जेव्हा तो पैसे देतो .. तेव्हा त्या माऊलीचे भाव .. जगातील सारी कृतज्ञता एकवटावी !
असेअसेच प्रसंग. रोजचे. नित्याचे. मदतीचे. मायेचे. पैसे देतांनाची नम्रता. खूप खूप शिकवून जाते. मदत तिथे हुसैन असे झालेय. त्याच्या एका आवाहनावर लाखो रुपये येतात. हे त्याने कमावलेय. हुसैन ची ही देनंदिनी झालीय.
तो आनंद वाटतोय. दिलासा देतोय. पूर्ण मिसळतोय. तो दिसला की आधार दिसला. असे झालेय. तोही थकत नाही. पठ्ठा मुठी भरुन देतो. देतांना , आंगठ्यात झाकून देतो. गंमत गंमतीच्या समाज माध्यमात हे क्वचित आहे. या आक्रोशी काळात .. हे वागणे वाळवंटात सावलीचे झाड वाटावे.
यार हुसैन मंसूरी. तू आवडलाय. तू आवडतोस.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत