समतेचे राजे : राजर्षी शाहूमहाराज

प्रा डाॅ.दिलीपकुमार कसबे
२६ जून हा दिवस बहुजन समाजाच्या सुर्याचा उगवता दिवस म्हणावा लागेल .शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ साली झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी परक्यांच्या दरबारी सरदारक्या करणार्यां व स्वत:ला राजे म्हणविणार्या चंदरराव मोरेनां अद्दल घडवत आपल्या आजूबाजूला असणाऱ्यां अठरापगड जातीतील संवगड्यांना सोबत घेऊन स्वराज्याची मूठ बांधून विजापूरच्या आदिलशाही आणि दिल्लीच्या तक्तावरून स्वत:ला हिंदुस्तान चा सम्राट म्हणवणाऱ्या औरंगजेबा सारख्या मुगल बादशाहची सुद्धा झोप उडविण्याचे काम महाराजांनी केले होते. म्हणजे १६३०-१६८० या काळात महाराष्ट्राची भीती येथील मुस्लिम सरदार मंडळीना होती. तो काळ युद्धांचा राहिला त्यामुळे महाराजांनी प्रसंगावधान राखत आपल्या शौर्याने इतरांच्या मनात एक आदरयुक्त भीती निर्माण केलेली होती. विजापूरच्या दरबारातील राणी बडी साहेबीन यांनी अफझलखाना ला पाठवून त्याच्या वधानंतर महाराजांची मोठी भीती ओढवून घेतलेली होती. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील समाजाच्या लोकांना जवळून पाहिले होते की ते कसे शूर,वीर,विश्वासू, प्रमाणिक आणि दिलेली जबाबदारी यशस्वी रीत्या पार पाडतात. हे संस्कार शाहू महाराजांच्याकडे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यशैलीतून येत राहिले. हिंदुस्तान ला परकीय सत्ताधीशांशी सातत्याने लढावे लागले. पुढे युरोपियनांशी पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि त्यानंतर शेवटी इंग्रज. मात्र इंग्रजांनी १७५७ च्या प्लासीचे युद्ध जिंकून हिंदुस्तान मध्ये सत्तेची मुहूर्त मेढ रोवलेली होती. व्यापार आणि तलवारीच्या जोरावर त्यांनी आपले पाय मजबूत केले. तर १८ व्या शतकात औद्योगिक क्रांतीचा उदय झाला. इंग्लंड मध्ये लोकशाही शासनव्यवस्था होती. इंग्रज हे जगातील लोकशाहीचे जनक होते.लोकांचे सार्वभौमत्व व व्यक्तिस्वातंत्र्य या लोकशाही मूल्यांचे ते जगातील पहिले पुरस्कर्ते होते त्यांच्याकडे एक वैज्ञानिक दृष्टि होती त्यांच्या काळात त्यांनी आपल्या अंमलाखालील प्रदेशात पाश्चात्य शिक्षणाचा पाया घातला व समाजातील सर्व वर्गांना शिक्षण खुले केले होते. शिक्षणातील त्यांच्या उदार धोरणामुळे प्रारंभीच्या काळात हिंदुस्तान मधील उच्च कुळांशी शिक्षण चिटकून राहिले पण शिक्षणाच्या वाहत्या गंगेला ज्यां बहुजन समाजांने लांबून पाहिले त्यांना तीला जवळून पाहण्याची इच्छा निर्माण होत गेली. काळ बदलत होता. १९ व्या शतकात विद्याहीन समाजाच्या सर्व दैन्याचे मूळ अज्ञान व अंधश्रद्धेत असल्याची जाणीव महात्मा फुलें ना झाली. त्याच्या निर्मूलनाचे एकच उत्तर होते “शिक्षण ” विद्येविना शुद्र खचल्याची जाणीव त्यांना झालेली होती. त्यांना वाटत होते शिक्षण झिरपविण्याच्या ऐवजी खालून वरती गेले पाहिजे. यातच न्याय व मानवतावाद होता.
राजर्षी शाहूमहाराजांनी हेच कार्य सर्व जाती धर्मातील लोकांच्या साठी सुरू केले.
१८२६ पासून कोल्हापूर संस्थानाच्या लष्करावर इंग्रजानी मर्यादा आणल्या होत्या पुढे १८६४ नंतर सर्व कारभार इंग्रजांच्या हाती गेला आणि १८६६ राजाराम महाराज यांच्या रूपाने एक जाणता राजा मिळाला होता. पण युरोपच्या दौर्यावर असतांना त्यांचे निधन झाले त्यामुळे राजाराम महाराजांचे कागलचे मावसबंधू जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे हे रीजंट म्हणून नेमले गेले. पुढे १७ मार्च १८८४ ला त्यांचे थोरले पुत्र यशवंतराव हे शाहू छत्रपती महाराज झाले व २ एप्रिल १८९४ ला गवर्नर लाॅर्ड हॅरीस यांच्या उपस्थितीत राज्याची अधिकार सूत्रे शाहू महाराजांच्या हाती आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलेल्या मुहूर्त मेढीचा खरा वारसदार कोल्हापूर च्या गादीला मिळालेला होता. प्रजेचे कल्याण, दैन्य व दारिद्र्य कसे नाहीसे करता येईल हे महाराज पहात होते.पण आबासाहेबांचे छत्र शाहू महाराजांच्या वाट्याला फारसे लाभले नाही.आबासाहेब वयाच्या तीसाव्या वर्षी निघून गेले. पण राजर्षी शाहू महाराज इंग्रजांच्या अधिपत्याखाली न राहता बारकाईने नोकरशाह वर्गाला योग्य मार्गदर्शन करत आपला प्रभाव दाखविण्यात यशस्वी होत राहिले. त्यामुळे सामान्य जनमाणसांत महार-मांग-चांभार, बारा बलुतेदार अर्थात बहुजन समाजाच्या लोकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचत राहिले. राज्यकारभारावर आपली पकड मजबूत करत सार्वभौम इंग्रज सरकारशी आपले संबंध दिवसेंदिवस अधिक सौहार्दाचे कसे बनतील हे पहात राहिले. राज्यारोहणानंतर लवकरच महाराजांना सम्राज्ञी व्हिक्टोरिया कडून G.C.S.I.हा किताब देण्यात आला.होता. शाहू छत्रपती महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक, एक समाज क्रांतिकारक या नात्याने समाजापुढे येत होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर त्यांचे गुरू सर स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर आणि कृष्णाजी गोखलेंच्या निवृत्तीनंतर रघुनाथराव व्यंकाजी सबनीस यांच्या शिकवणीचा प्रभाव होता. फ्रेझर ना इंग्रज सरकारने महाराजांचे ‘ट्यूटर व गार्डीयन ‘ म्हणून नेमलेले होते. त्यांचा महाराजांच्यावरती खूप प्रभाव होता.एक राज्यकर्ता म्हणून महाराजांच्या मध्ये व्यक्तिमत्त्व सुसंस्कृतपणा, शहाणपणा, दूरदृष्टी ,अखंड सावधानता, कर्तव्य निष्ठा, न्यायप्रियता, संयम, शिस्त या बाबी कशा निर्माण होतील व रूजविता येतील यासाठी त्याच्या गुरूनी विशेष परिश्रम घेतलेले होते.
उत्तरेत व दक्षिणेत त्यांच्या सफरी काढलेल्या होत्या. शिवाय अनेक ऐतिहासिक स्थळांना, वास्तूंना, तीर्थक्षेत्र, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रांना त्यांनी भेटी दिलेल्या होत्या.त्या भेटीमुळे, सफरीमुळे देशाच्या इतिहासाचे तेथील लोकांच्या सम्यक स्थितीचे दर्शन घडल्यामुळे त्यांच्या बुद्धीची व मनाची कवाडे विशाल होत गेलेली दिसतात. १९०२ पासून शाहू महाराज आर्य समाजाकडे आकृष्ट होत गेले. व ब्राम्हण वर्गाच्या सर्वकष मक्तेदारी विरूद्ध बंड व अस्पृश्यता अशा रूढीना कडक विरोध करणाऱ्या सत्यशोधक समाजाची पुरस्कार केलेला दिसतो आहे.ब्राम्हणेत्तर जातींचा विकास कसा करता येईल हे महाराज नेहमी पहात राहिले.
राजर्षी शाहूमहाराजांना वर्णव्यवस्था नको होती. कारण ब्राम्हणेतर .जातीची अवस्था त्यांना पहावत नव्हती ती अत्यंत शोचनीय होती. या जातींना पुढे सरसावण्यास व प्रगती करण्यास संधीच दिली जात नव्हती. महाराज स्वत: राजे असतांना त्यांनी कोल्हापूर संस्थानच्या पहिल्या देशी स्री शिक्षण अधिकारी रखमाबाई केळवकर यांचे चिरंजीव बॅ . शामराव केळवकर यांना बोलतांना सहज सांगीतले होते, सातारा या ठिकाणी एकदा ब्राम्हणी जेवण होते जेवण हे महाराज व अन्य मंडळी साठी चाललेले असतांना मी स्नान करून स्वयंपाक कुठं पर्यंत आलाय हे पहाण्यासाठी फिरत होतो,तेथेच एक सोवळेकरी ब्राम्हण हातावर मांजर घेऊन तेथूनच हिंडत होते ते मला पाहून म्हणाले “इकडून हिंडता येणार नाही आपल्याला शिवाशिव झाली म्हणजे साराच घोटाळा होऊन जाईल ” हे शब्द कानावर पडताच महाराजांना कापल्यासारखे झाले होते.त्या मांजरापेक्षाही मी खालच्या दर्जाचा?असाच प्रश्न मला पडला होता. म्हणजेच मी छत्रपती असून असा अपमान होत असेल तर अस्पृश्यांचा किती होत असेल. तेव्हा पासून मला वाटत होते की महार -पोरांना जवळ घेऊन त्यांच्या सोबत जेवाव.म्हणजेच महाराज स्वानुभवातून शिकत होते, शिकले होते. राजे असून माझीअशी अवस्था होत असेल तर अस्पृश्यांचे काय स्थिती होत असणार.
राजर्षी शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणाची चांगल्या प्रकारे हाताळणी केली होती. कार्तिक स्नानाच्या प्रसंगी जेव्हा पंचगंगा नदीच्या तीरावर गेले तेव्हा सोबत त्यांचे बंधू बापूसाहेब महाराज, मेव्हणे मामासाहेब खानविलकर आणि स्नेही राजाराम शास्त्री भागवत होते. स्नानाच्या वेळी नारायण भटजी मंत्र म्हणत होते पण ते स्नान न करता वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजाराम शास्त्रीनी महाराजांच्या लक्षात आणून दिले भटजींना जाब विचारल्यावर ते म्हणाले “शुद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात म्हणून मला स्नानाची गरज नाही. हे महाराजांना आवडले नाही आपण राजे असून भटजीने शुद्र म्हणून हिणवणे याचा स्वानुभव त्यांनी घेतला. ब्राम्हणेतर समाजातील महात्मा फुले ना सुद्धा आपल्या ब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या मिरवणूकीतून त्यांना दरडावून सांगीतले होते “अरे कुणबटाच्या पोरा, खबरदार आम्हा ब्राम्हणाबरोबर चालशील तर!…तुझ्या स्पर्शाने आम्हा ब्राम्हणांना विटाळ होत नाही काय? तू आमचे मागून चल” त्याच प्रमाणे महात्मा गांधीना सुद्धा दक्षिण आफ्रिकेतील एका रेल्वे च्या फर्स्ट क्लास च्या डब्याचे तिकीट असतांना ही तेथील गोर्या लोकांनी ‘तू काळा आहेस, तुला गोर्यांच्या डब्यात बसता येणार नाही’ म्हणून त्यांचा मार्ग अडविला होता. शिव्या घालत त्यांच्या सामानासह त्यांना रेल्वेतून ढकलून दिले होते. अशा अभद्र वाणींना बहुजनांना सामोरे जावे लागत होते. वर्णश्रेष्ठत्वामुळे ते लोक इतरांना कनिष्ठ लेखत होते. म्हणजेच शाहू, फुले आणि गांधीजींच्या जीवनातील अशा प्रसंगातून कनिष्ठाना अवमानाच्या असंख्य इंगळ्या डसत होत्या त्यामुळेच त्यांच्या विचाराचे वादळ घोंघावत राहिले अशा वैयक्तिक अवमानातून त्यांनी व्यापक सामाजिक अन्यायाचा आशय पाहिला. महाराजांना वाटू लागले आपल्या दरबारी कामाला असणारा एक सेवक मला शूद्र म्हणतो. तसेच त्या वर्गाने हे पुढे असे करण्याचा प्रयत्न केला की छत्रपतीचे कुळ हे क्षत्रिय कसे नाही असे सांगत राहिले. म्हणून पुढे महाराजांनी त्यांची इनामे जप्त केली व ५०%जागा मागासवर्गीयासाठी राखीव केल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.वेदोक्त प्रकरण हाताळण्यात पुढे मराठा समाजाने ही पुढाकार घेतला होता. १८ एप्रिल १९०८ ला महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू केले. यामध्ये विशेषत:जाधव,विचारे व सावंत या तीन मराठा कार्यकर्त्यांचा सहभाग राहिला. पुढे जैन बोर्डिंग, लिंगायत, मुस्लिम, अस्पृश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड सारस्वत, इंडियन ख्रिश्चन, वैश्य, ढोर चांभार सुतार, सोमवंशीय आर्य क्षत्रिय, कोष्टी अशा विविध जातीधर्माची २० वसतीगृहे महाराजांच्या प्रेरणेने व सहाय्याने सुरू करण्यात आली होती.यामुळे जाती जातीच्या वसतीगृहात राहून बहुजन समाजातील मुले शिकली. महाराजांना वाटायचे शिकूणच यांच्यातील जातीभेदाची दरी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. यातूनच आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी शेकडो कर्तबगार व्यक्ती उदयास येतील. असे ही त्यांना वाटत होते आणि पुढे तसे घडलेही.
अस्पृश्योद्धार व शिक्षण हे ही त्यांचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले त्यांना माहित होते शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही. असे इतिहास सांगतो. अस्पृश्यता हा मानव जातीचा कंलक आहे सामाजिक व समतेच्या दृष्टिने तो हानिकारक असल्याची जाणीव त्यांना झाली होती. म्हणून त्यांनी आपल्या संस्थानात मागासलेल्या जातींचा उद्धार शिक्षणाच्या साधनाने करण्याचे धोरण स्वीकारले होते.१९०७-०८ साली अस्पृश्य शाळांची संख्या १६ व विद्यार्थ्यांची संख्या ४१६ होती. महाराजांच्याच प्रेरणेने अस्पृश्य लोकांत वरिष्ठ शिक्षणाचा प्रसार होत गेला असे म्हणावे लागते.तर १९१८-१९ च्या काळात अस्पृश्य शाळा त्यांनी बंद केल्या. कारण त्यांना अस्पृश्यतेचे उच्चाटन करावयाचे होते. अस्पृश्य निवारणाचे त्यांनी आदेश काढले २८सप्टेंबर १९१९ च्या काळात एका आदेशात ते म्हणतात ‘सरकरी शाळांतून शिवा शिव पाळण्याची नसल्याने सर्व जातीच्या व धर्माच्या मुलांस एकत्र बसविण्यात येत जावे ‘ १९२० साली आपले धाकटे पुत्र प्रिंस शिवाजी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ अस्पृश्य लोकांच्या विद्येच्या उत्तेजना करिता १० हजार रूपयांच्या प्राॅमिसरी नोट तयार करून ठेवल्या आणि त्याच्या व्याजातून पाच रूपये प्रमाणे आठ शिष्यवृत्त्या सुरू केल्या होत्या.म्हणजेच शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरण, अस्पृश्यता निवारण, महार वतन, अस्पृश्यांचे शिक्षण, समाजातील सर्व थरांतील लोकाचा विकास कसा करता येईल यासाठी आपल्या संस्थानाच्या माध्यमातून स्वानुभवातून पुढे जात मागास जातींच्या समाजाच्या विकासासाठी, जाती उच्चाटनासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे.
प्रा डाॅ.दिलीपकुमार कसबे
स.गा.म.काॅलेज, कराड11
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत