अंधश्रद्धेची ऊतुगिरी !

🌻रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत
परवा अहमदाबादेत आभाळ कोसळले. भीषण .. भयंकर .. असाच हा अपघात आहे. दु:ख ते दु:खच. देशाला अखरले. देशमनें अजून सावरलेली नाहीत. घिसाडघाईचा रागही येतोय.
अशावेळी प्रसंगाचे गांभीर्य जपावे. अजेंडा घुसवू नये. पण कसे सोडणार ? सांगतात असे , अपघात असा भीषण की , लोखंडही वितळले. पण कागदी
‘भगवद् गीता’ सुरक्षित राहिली. एक पानही जळालेले नाही. अगदी वाचता येण्याच्या स्थितीत प्रत आहे. कोण्या श्रध्दाळू प्रवाशाचे ते असावे. प्रवासी देवप्रिय झाले. प्रत राहिली. दैवी ते दैवीच.
आता दैवी चमत्काराची तीच वेधिता फिरत आहे. खरेखोटे कोणास ठाऊक ?
दुसरे फिरणे-फिरविणे असेच. मृतकांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही आहेत. ते मुलीकडे लंडनला निघाले होते. पत्नी अंजलीबेन आधीच तिथे होत्या.
अजेंडावाल्यांनी रुपाणींची देवप्रियता किंचित बाजूला ठेवली. रुपाणींचा आवडता शुभक्रमांक पूढे केला. रुपाणींना म्हणे , १२०६ क्रमांक खूप आवडायचा. त्यांची दुचाकी असो वा चारचाकी. क्रमांक हमखास असेल १२०६. त्यांच्या राजकोटला लोकतोंडी ही बाब पाठ होती. त्यांच्या कारची नंबरप्लेट माध्यमात फिरते आहे.
आता सांगतात , विमान अपघाताचा दिवस १२ तारीख ०६ वा महिना होता. १२०६ क्रमांकाने रुपाणींची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. देव आहे. दैव आहे. म्हणून हे घडते. सारे विधिलिखित आहे. वगैरे.
आपण काय म्हणावे.
डोक्यावरुन जाऊ द्यावे. काय करणार ? मनोरंजक म्हणूनही पाहता येईल.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत