१४० मुलांचे निवासी शिबिर आशान्वित करुन गेले !

🌻 प्रा रणजित मेश्राम
कृतीकार्यक्रमाच्या सुंदर आयोजनात हजेरी सुखावून गेली. १५ वर्षाखालील मुलामुलींचे ते निवासी शिबिर होते. स्थळही शांत , निवांत. चिंचोलीचे शांतीवन. या शांतीवनाने आठ दिवस १४० मुलामुलींचा चिवचिवाट सांभाळला.
प्रभावित केले ते मुलांच्या मनोगतांनी. मुली तर थेट इंग्रजीत बोलल्या. एक मुलताईची , दुसरी छिंदवाड्याची , तिसरी गडचिरोलीची तर चवथी मुंबईची. मुलें पण छान बोलली. गायली सुध्दा. एक बैतुलचा बोलला. ‘ये पाया .. वो पाया .. लेकिन सबसे अच्छा .. यहां अच्छे दोस्त पाया’. ते वाक्य मनाला भिडले. लहानपणचे ‘स्काऊट’ आठवले.
२५ मे ते १ जून असे आठ दिवसांचे ते निवासी शिबिर होते. व्यक्तिमत्व विकास हा उद्देश होता. धम्मज्ञान ते वर्तमानज्ञान वर्ग इथे झाले. या शिबिरात नागपूर , वर्धा , अमरावती , बुलढाणा , अकोला , यवतमाळ , औरंगाबाद , मुंबई , छिंदवाडा , मुलताई , बैतुल , गडचिरोली , छत्तीसगड इथली मुलेमुली होती.
शिबिराचे समापन माझ्या हस्ते झाले. प्रसंग अविस्मरणीय झाला.
'राहो सुखाने माणूस इथे .. या भूवरी .. या भूवरी .. ! या समूह प्रार्थनेचा प्रारंभ आसमंत स्तब्ध करून गेला.
बहुजन सौरभच्या संपादिका संध्या राजुरकर , समाजसेवक नितीन सरदार व अभ्यासक डॉ एम एस वानखेडे पाहुणे म्हणून छान बोलले. याशिवाय काही प्रासंगिक भाषणे झाली.
विशेषत्वाने सांगायचे म्हणजे , आयोजनामागचे अदृश्य कष्ट जाणवत होते. मुलांकडून एकही पैसा घेण्यात आला नव्हता ! सर्व दानातून हे आयोजन होते.
१४० मुलेमुली. काही अभ्यागत. रोज नवा व्याख्याता. येजाची सोय. रोजचे दोन वेळचे जेवण. नाश्ता. निवासाची बऱ्यापैकी सोय. सारे लोकदानातून. ते पैशाचे वा धान्याचे. हे सर्व समर्पण वाटले.
प्रिय अप्रिय दोन्ही हिंदोळ्यावर असणारा अशोक सरस्वती हा माणूस या शिबिराचा शिल्पकार आहे. तो अथक आहे. इतरांना थकवतो. सरस्वतींचा उत्साह थकत नाही. शिबिर यसस्वीतेला सतीश गायकवाड , सावित्री नाखले , डॉ प्रमिला चिंचखेडे , प्रा सुषमा पाखरे , प्रा भारत सिरसाट , भिमराव म्हैसकर , बबिता गायकवाड , सुमिता लोखंडे , वनिता कर्हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यातून हेही जाणवले. बौध्द दानी आहेत. ते कृती प्रकल्पांना शोधतात. ते सापडावे.
० रणजित मेश्रामलेखक ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक समीक्षक आणि अभ्यासक आहेत
👤
(छायाचित्रात मुंबईची मुलगी बोलतांना व वर्धेच्या सुषमा पाखरे दिसत आहेत)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत