अन् १ लाख रुपये भूर्रर्रर्र उडून गेलेअशोक सवाई

(फसवणुक)
आपल्या बहूजनांवर दैव वादाचा एवढा जबरदस्त पगडा बसला आहे की विचारता सोय नाही. त्याला अतिरेक म्हणा किंवा कहर म्हणा. त्याचे जीतेजागते एक उदाहरण इथे देतो. माझे एक सेवा निवृत्त मित्र आहेत. ते नुसते मित्रच नाही तर परममित्र आहेत. स्वभावाने एकदम साधेभोळे. साधेभोळे म्हणण्यापेक्षा देवभोळे आहेत. ते लष्करी सेवेत होते. लष्करी सेवेतील शिस्त म्हणजे माणूस ती शिस्त सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा जीवन भर पाळतो असे म्हणतात. म्हणजे सकाळी लवकर उठून स्वतःची कामें स्वतः करणे, दररोज दाढी करणे, नंतर आंघोळ करून ताजेतवाने होणे. वगैरे वगैरे. त्यांची मनोधारणा काय असावी महिती नही. पण ते सेवानिवृत्ती नंतर जरा जास्तच धार्मिक बनले होते. रोज आंघोळ झाली की पुजापाठ करणे, कपाळावर गंधाचा टिळा कोरणे, उपवास तापास करणे, शनिवारी व मंगळवारी तसेच धार्मिक सणवारीत मटण मच्छी खाण्याचे काटाक्षाणे टाळणे वगैरे. त्यांच्या धार्मिकतेवर आपल्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही आणि तो कुणी घेवू ही नये. ते आस्तिक आहेत तर मी नास्तिक. ते टोकाचे इश्वर वादी तर मी निरीश्वरवादी. या बाबतीत आमचे विचार म्हणजे पृथ्वीवरील उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव जे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. तरीही आम्ही मित्र आहोत गेले १५-२० वर्षापासून आमची मैत्री आहे. *मैत्रीचे एक टोक मित्राने व दूसरे टोक आपण घट्ट पकडून ठेवले तर मैत्री तुटण्याचा संभव फार कमी असतो.* आम्ही कधी भेटलो तर आमची आस्तिकता/नास्तिकता यावर कधीही चर्चा होत नाही, आणि करतही नाही. असो!
आमचे मित्र पराकोटीचे गणेश भक्त. त्यांच्या पाकिटात दर्शनी भागावर एक कायम स्वरूपी गणपतीचा फोटो असायचा. पाकिटातून पैसे किंवा एखादे कार्ड काढायचे झाल्यास ते पहिले त्या फोटोतील बुद्धीची देवता मानणारे आमचे मित्र गणपतीच्या पाया पडायचे नव्हे ते अख्खं पाकिटच आपल्या मस्तकाला लावत असत. म्हणजे कोणतेही काम करण्याच्या आधी हा त्यांचा शिरस्ता बनला होता. मग भलेही कितीही घाई गडबडीचा मामला असू द्या. पण ते शीरस्ता पाळणार म्हणजे पाळणार.
असेच एक दिवस या आमच्या गड्याला एक फोन आला. फोन कर्ता समोरून बोलत होता, *’हॅलो सर मी आपल्या बॅंकेतून बोलतोय, सर… आपल्या खात्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने मला आपला अमुक-तमुक अकाउंट नंबर व कोड नंबर पाहिजे, जरा देता का?’* आमच्या देवभोळ्या मित्रांने झटकन आपले पाकिट काढले. सिरस्त्या प्रमाणे मस्तकाला लावले. त्यातून बॅंकेचे नंबर, कोड नंबर जे काही असेल ते सर्व फोनवरून सांगून टाकले. समोरून पुन्हा आवाज आला. *’थॅंक्यु सर’…* *’इतर कोणालाही असे नंबर देवू नका, आजकाल फसवणुकीचा मामला फार वाढला आहे काळजी घ्या’.* ‘येस सर’… आमचे मित्र सैनिकी आवेशात म्हणाले. त्यानंतर ते आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त झाले. फोनचा मामला विसरून ही गेले होते. एक दिवस म्हणजे जवळपास एक महिन्याने ते बॅंकेतून पैसे काढायला गेल्यावर त्यांना कळले की, त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये भूर्रर्रर्र… उडून गेले, ते कधीही परत न येण्यासाठी. बॅंकेतील अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यावर त्यांना कळले की, बॅंकेने असा कोणताही फोन केला नाही. आमचे मित्र हक्काबक्का झाले. पोलीस तक्रार झाली पण उपयोग झाला नाही. मी त्यांना भेटून धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांनी ते रस्त्यात भेटल्यावर आम्ही चहासाठी एका स्टाॅलवर गेलो. मी त्यांना म्हणालो बील मी देतो असे आमचे हो नाही होताच आमच्या दिलदार मित्राने झटकन पाकीट काढले अन् चहाचे बील चुकतेही केले. मी त्यांच्या पाकीटाकडे सहज नजर टाकली तेव्हा त्यांच्या पाकिटाच्या कव्हर कप्प्यातील बुद्धीदेवतेचा फोटो गायब होता. पण त्यावर आम्ही कधीही चर्चा केली नाही. गणपतीला विद्येची देवता म्हटले जाते. मग आपल्या या भक्ताला तिने सारासार विचार करण्याची बुद्धी देवू नये का? की आपल्या भोळ्या भक्तालाच लाखाचा गंडा घातला असे म्हणावे? इथे माझा कोणाच्याही भावना दुखावल्या जातील हा उद्देश मुळीच नाही. तर वर आमच्या भोळ्या, अंधश्रद्धा असलेल्या व परम मित्राची जशी फसवणूक झाली तशी कुणाचीही होवू नये हा उद्देश आहे
*निसर्ग देवतेने माणूस नावाच्या हुशार प्राण्याला सदविवेक बुद्धी नावाची चीज देणगी म्हणून दिली आहे जी पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्याला दिलेली नाही. त्या बुद्धीचा माणसाने सद्उपयोग करून घेतला नाही तर त्या सोन्या सारख्या देणगीचा उपयोग काय? माणसाची खरी बुद्धीची देवता म्हणजे त्याची तर्कशुद्ध बुद्धी व विवेक बुद्धी याच आहेत. आमच्या मित्राने आपले बॅंक अकाउंट नंबर देण्याआधी थोडा जरी तार्किक विचार करून ‘त्या’ फोन कर्त्याची विचारपूस केली असती तर कदाचित त्यांचे एक लाख रुपये उडून गेले नसते.*
– अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत