डॉ. आंबेडकरांची जयंती प्रबोधनयुक्त व्हावी

पूर्वी महापुरुषांची जयंती असो किंवा गणपती उत्सव असो त्यामध्ये व्याख्याने, देखावे, नाटक यामधून मनोरंजन आणि प्रबोधन केले जात असे. त्यामुळे यामध्ये लहान मुले, वृद्ध, तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असत; परंतु आज सर्व कार्यक्रमाचे स्वरूपच बदलून गेले आहे. नव्या पिढीमध्ये डी.जे.चे आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे विवाह विधी किंवा कोणताही उत्सव असो त्यामध्ये डी.जे. वाजल्याशिवाय त्या कार्यक्रमाला पूर्णत्व येत नाही. अलीकडच्या काळात महापुरुषांच्या जयंतीमध्ये तर डी.जे. अधिकच आवश्यक बनला आहे. या डी.जे.च्या गाण्यावर नाचल्याशिवाय जयंती केल्यासारखे वाटेनाशी झाली आहे; परंतु डी.जे.च्या परिणामाची जाणीव किती जणाला आहे? कान-नाक- घसा तज्ञ यांनी याचे जे परिणाम सांगितले आहेत ते भयंकर असे आहेत. या तज्ञांच्या मते याचा परिणाम लहान मुले, वृद्ध, हृदय रोगाचे पेशंट गरोदर स्त्रिया यांच्यावर गंभीर परिणाम होतात. यामुळे रक्तदाब वाढतो, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, हार्टचा पेशंट दगावू शकतो, कायमचे बहिरेपण येऊ शकते. मराठवाड्यातील एका प्रमुख शहरातील जयंतीतील डी.जे.चे परिणाम म्हणून जयंतीच्या दुसऱ्या दिवशी 300 लोकांना दवाखान्यात जावे लागले. काही महिला चक्कर येऊन पडल्या. आणखी एका शहरात एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. या जयंतीत पोलीस अधिकारी, मंत्री कानात कापसाचे बोळे घालून सहभागी झाले होते. पोलीस कानात कापसाचे बोळे घालून बंदोबस्त करताना दिसत आहेत. यावरून डी.जे. वाद्यांच्या परिणामाची कल्पना येते. अशाप्रकारे लातूरमध्येही काही मंडळांच्या मिरवणुकीत डी.जे. वाजताना दिसले.
परंतु या सर्व डी.जे. ला फाटा देत एम. एस. ई. बी. विभागाने मात्र या जयंती निमित्ताने “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” या अतिशय सुंदर नाटकाचे आयोजन करून या विभागाने जयंतीनिमित्त नवा संदेश दिला. त्यामुळे या जयंती मंडळाचे पदाधिकारी प्रबोधन कांबळे, सिद्धार्थ कुसभागे, शीलरत्न सूर्यवंशी, अमित श्रृंगारे, राहुल सरकाळे व अश्विन गायकवाड यांचे अभिनंदनच करायला हवे.
या निमित्ताने दगडोजी देशमुख नाट्यगृहात झालेल्या या नाटकात महापुरुषाचे कार्य हे कोणत्याही जाती धर्मापुरते नसते किंवा जाती धर्माविरुद्ध नसते, त्यामुळे कोणत्याही महापुरुषाला बंदिस्त करणे कसे अयोग्य आहे हा संदेश या नाटकाद्वारे दिला. हे नाटक म्हणजे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसांच्या पुढे वास्तव मांडून जनजागृतीची चळवळ होती. अशा दर्जेदार नाटकांचा पहिला प्रयोग 20 मे 2012 मध्ये मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाला. त्यानंतर आजवर या नाटकाचे 80 पेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. शाहीर संभाजी भगत यांचा कल्पनेतून आलेल्या आणि राजकुमार सांगळे यांनी लिहिलेल्या नाटकाला तेरा वर्ष झाले, पण सद्यस्थितीला हे नाटक लागू होते. त्याचप्रमाणे या नाटकातील कैलास वाघमारे, संभाजी तांगडे, वसुंधरा तांगडे, प्रवीण डाळिंबकर, राजकुमार तांगडे, अश्विन भालेराव, मधुकर बिडवे, राजू सावंत, अशोक देवकर, गजेंद्र तांगडे, संघराज वाघमारे, किशोर उढाव व रोशनी वाघमारे या कलाकारांनी या नाटकात जीव ओतला आहे. त्यामुळे हे नाटक आजही जिवंत वाटते. अशा प्रकारची नाटकं, व्याख्याने मनोरंजनाचे कार्यक्रम झाले तर महापुरुषांच्या विचाराची ओळख सामान्य माणसाला सहजपणे होण्यास मदत होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानेही असेच होणे अपेक्षित आहे. कारण कोणत्याही महापुरुषाची जयंती ही जाती-धर्माच्या प्रदर्शनासाठी नव्हे; तर विचार दर्शनासाठी असायला हवी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर आज भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही साजरी केली जात आहे. जगातील एकूण 195 देशांपैकी 192 देशात ही जयंती साजरी केली जाते. या जयंतीद्वारे आंबेडकरवादाचा, आंबेडकरी विचाराचा जागर केला जात आहे. ‘आंबेडकरवाद’ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीत जन्माला आले त्यांच्या पुरताच आहे, असे म्हणणे म्हणजे फार मोठी अंधश्रद्धा आहे. असे असते तर त्यांची जयंती जगभर साजरी झाली नसती.
‘आंबेडकरवाद’ म्हणजे जाती निर्मूलनाचा, मानव मुक्तीचा विचार आहे. सरंजामशाही, हुकूमशाही, धर्मांधता, विषमता नाकारणारा विचार म्हणजे आंबेडकरवाद होय. स्वाभिमान, आत्मसन्मान आणि सूर्यप्रकाशाकडे घेऊन जाणारी वैज्ञानिक वाट म्हणजे आंबेडकरवाद होय. म्हणूनच जगामध्ये त्यांच्या विचारचे स्वागत होताना दिसून येते.
ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. आंबेडकर शिकले त्या विद्यापीठाने त्यांना ‘ज्ञानाचे प्रतीक’ ही उपाधी दिली. 24 ऑक्टोबर 1991 मध्ये त्यांचा पुतळा विद्यापीठात बसवला. आज त्यांची जयंती येथे साजरी केली जात आहे.
फ्रान्समधील ख्रिस्तोफ जेफर यांनी डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक लढ्याचे अध्ययन केले. यावर आधारित ‘डॉ. आंबेडकर अँड अनटच्याबिलिटी’ नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथांनी फ्रान्समध्ये वादळ निर्माण केले. त्यानंतर श्वेत हंगेरीया येथील कार्यकर्ते ‘डेरडाक टिबोर’ यांच्या हातात हे पुस्तक पडले. डॉ. आंबेडकरांच्या विचारावर आधारित या ग्रंथाने हंगेरीयात क्रांती घडवून आली. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘जयभीम नेटवर्क’ सुरू केले. जयभीम संघ निर्माण केले. डॉ. आंबेडकर म्हणायचे “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे”. या अनुषंगाने हंगेरीयात ‘लिटल टायगर स्कूल’ ची निर्मिती केली. हंगेरीयात डॉ. आंबेडकरांची मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली जाते. येथील लोक नागपूरच्या दीक्षाभूमीला भेटी देतात, तसेच मुंबईच्या चैत्यभूमीला भेटी देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घाणासारख्या देशातही पोहोचले आहेत. येथील तरुणांचे डॉ.आंबेडकर आयकॉन आहेत. घाणामधील घाणा विद्यापीठांसमोर तेथील विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी डॉ.आंबेडकर यांचा पुतळा उभा केला आहे.
त्याचप्रमाणे मेरीलँड (वॉशिंग्टन) येथील मेमोरियल पार्कवर आंबेडकरांचा पुतळा बसवला आहे. या पुतळ्याचे दोन वैशिष्ट्ये सांगता येतील- एक म्हणजे तेथील महिलांच्या पुढाकारांनी हा पुतळा बसवला आहे आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भारताबाहेर बसविलेला डॉ. आंबेडकरांचा सर्वात मोठा हा पुतळा आहे. या ठिकाणी देखील डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते.
अमेरिकेतील मेअर एरिक ॲडम्स यांनी 14 एप्रिल 2025 हा दिन ‘आंबेडकर दिन’ म्हणून जाहीर केला व येथेही आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी केली. या वर्षीपासून कोरियातही डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली.
थायलंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतात महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले 21 खंड भिक्खू तायायामा यांनी थाई भाषेत प्रकाशित करून डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी केली. त्याचप्रमाणे थायलंडचे ज्येष्ठ टी.व्ही. पत्रकार डॉ. रंगादेव चाटना पिल्लई म्हणतात की, भगवान बुद्ध आणि डॉ. आंबेडकर आमच्या येथे जन्माला आले नाहीत; पण त्यांचे विचार येथील घरा घरात पोहचले त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. ते म्हणाले की आंबेडकर जयंती, बुद्ध जयंतीच्या वेळी या विचाराचा प्रचार प्रसार आणि आचरण कसे करायचे याचे नियोजन करतो.
त्याच प्रमाणे आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तान, बांगलादेशातही डॉ. आंबेडकरांच्या विचाराचे अध्ययन केले जात आहे. 14 एप्रिल रोजी व्याख्यानाचे आयोजन केले जाते. यासाठी महाराष्ट्रातील काही विचारवंतांना आमंत्रित केले होते. एडव्होकेट एस. एस. गाझियोदिन लिखित ‘डॉ.आंबेडकर हयात और कारनामे’ नावाचा उर्दू भाषेतील ग्रंथ तेथील तरुणाचे आकर्षण ठरत आहे. त्याचप्रमाणे इस्लापूर युनिव्हर्सिटी ऑफ सिंध येथील प्राध्यापक घनश्याम नरवाणी हे देखील या ग्रंथामुळे प्रभावित झाले व त्यांनी या ग्रंथाचे सिंधी भाषेत भाषांतर करण्याचे जाहीर केले आहे.
थोडक्यात डॉ. आंबेडकरांचे विचार भारताबाहेर गेले आहेत. आज 192 देशात डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते पण ती फक्त विचारांची, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्याचप्रमाणे आपणही जल्लोषात पण जल्लोष हा अंतिम न ठेवता डी.जे. मुक्त जयंती करून डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा जागर करणे काळाची गरज आहे. कारण आज दलित मुलांचे शिक्षणाचे प्रमाण कमी होत आहे, उच्च शिक्षणाचे प्रमाण त्याहून कमी आहे, मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती विसरत चाललो आहे. त्याचप्रमाणे कोणताही पिता आपल्या मुलांच्या वाढदिवसात मद्यपान करून नाचताना दिसत नाही, मग ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यात मद्दाच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही त्यांच्या वाढदिवसा दिवशी मद्यपान करून नाचणे कितपत योग्य आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे.
थोडक्यात आपण जयंतीदिनी जल्लोष करूया पण त्याचा अतिरेक न करता डी.जे. मुक्त जयंती साजरी करण्याची प्रतिज्ञा करूया. हे करणेच डॉ. आंबेडकरांना खरे अभिवादन ठरेल असे मला वाटते.
डॉ. सुरेश वाघमारे
ज्येष्ठ विचारवंत, लातूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत