दीपस्तंभाला काजव्याने दीपस्तंभ म्हणायचे नाकारल्यावर……जयवंत हिरे

अ अज्ञानाचा
अ अस्पृश्यतेचा
अ अत्याचारांचा
अ अधर्माचा
हे ध्यानी मनी रूजलेले असताना
गाडलेल्या पेशवाईवर
इंग्रजांचा युनियन जॅक
दिमाखात फडकू लागला होता.
तो फडकवण्यासाठी
प्राणाचे मोल
भीमा कोरगावच्या रणांगणावर
दिलेल्या महारांना
शिक्षण आणि माणूसकीची दारे
किंचितशी किलकिली करायला
इंग्रजांनी सुरुवात केली होती.
एखादा शुद्र महात्मा होऊन
आपल्या हौदातल्या पाण्यासोबतच
ज्ञान वाटायला
आपल्या सावित्रीसह बाहेर पडून
ब्राह्मणी कसब उलगडून
सत्याचा शोध घेऊ लागला होता.
त्याच काळात एक बाप
इंग्रजांच्या सैन्यात सुभेदार होऊन
सैनिकांसोबतच
आपल्याही लेकरांना
ज्ञानी बनवायसाठी
झपाटला होता.
त्याच बापापोटी त्याचा जन्म झाला
जन्माला घालून माय मरून गेलेल्या
त्या लेकरात बापाने
पाहिला असेल का दीपस्तंभ?
बापाने त्याची ओळख
कबीराशी करून दिली.
तो ज्ञानमार्गाचा वाटसरू होऊन
बुद्धापर्यंत कधी पोहचला
त्याचं त्यालाही कळलं नाही.
तो करू लागला साय्राच
ईश्वरांची पोलखोल
तो करू लागला
धर्माच्या नावाने
अधर्म माजवणाय्रा
धर्माची चिरफाड.
त्याने हिंदूत्वाचे रिडल्स उलगडले.
त्याने अस्पृश्यांमध्ये
लढण्याचे निखारे चेतवले
तो ईश्वरी कैदेतून
माणसांना मुक्त करणारा
मानवतेचा उद्गाता झाला
त्याने बल्र्ट्राड रसेलला आव्हान दिले
त्याने मार्क्सलाही अभ्यासले
त्याने मनुला पार उघडे नागडे केले.
त्याने जाता जाता एक दिवस
क्रांतिबा अन् कबीराचे बोट धरून
त्याने बुद्धाच्या दिशेने
साय्रा शोषितांना नेले अन्….
जाता जाता तो
स्वत:च दीपस्तंभ झाला;
अवघ्या जगाला
ज्ञानाच्या वाटेवरून
चालण्याची उमेद देणारा.
तो दीपस्तंभ झाला;
अवघ्या जगातल्या
शोषितांच्या लढ्याचा.
कुणी त्याच्या पुतळ्याखाली कोरलं;
सिम्बॉल ऑफ नॉलेज.
कुणी त्याच्या पुतळ्याखाली कोरलं;
सिम्बॉल ऑफ सोशल जस्टिस.
कुणी त्याच्या पुतळ्याखाली कोरलं
सिम्बॉल ऑफ इक्वॅलिटी.
पण काजव्याला काय त्याचं?
दीपस्तंभाच्या तेजात
तोही तर झाला होता तेज:पूंज.
दीपस्तंभाच्या किरणांनी
तेजाळलेला काजवा.
काजवा भरसांडला अन्…
बरळू लागला;
तो दीपस्तंभ कसा?
तो दीपस्तंभ नाहीच.
काजव्याच्या चमचमण्याने
दीपस्तंभ तेजाळतो का कधी?
दीपस्तंभाच्या सावलीत काजवाच
आणत असतो आव
प्रकाशमान तारा असण्याचा.
-जयवंत हिरे
६मार्च२०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत