डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक जागतिक स्तरावरील नावलौकिक ख्याती प्राप्त व्यक्तीमत्व.-अशोक सवाई

(जागतिक)
आज १४ एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस. या दिवसी म्हणजेच १४ एप्रिल १८९१ रोजी माता भीमाबाई व सुभेदार रामजी मालोजीराव सकपाळ यांनी भारतातील मध्यप्रदेशात इंदौर शहराजवळील एका महू गावात अशा एका नररत्नाला जन्म दिला की त्यांच्या विचाराने साऱ्या जगाला भारावून टाकले. भारत सरकारने सन १९९० ला मरणोत्तर या नररत्नाला भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. धन्य ती माता भीमाई अन् धन्य ते रामजी बाबा.
१४ एप्रिल हा दिवस देशातील सर्वात मोठा सण उत्सव मानला जातो. मानला जातो काय आहेच. अर्थात आडमुठ्या विचारांचे काही मुठभर लोक सोडले तर या उत्सवात देशातील सारे लोक न्हाऊन निघतात. यानिमित्ताने देशातील बहुतेक मान्यवर लेखक या विषयावर लिहितात किंवा लिहित राहतील त्यांनी लिहायलाही पाहिजे. डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचायला पाहिजे. जे लिहीत नाही त्यांनी लिहिते झाले पाहिजे जे बोलत नाही त्यांनी बोलते झाले पाहिजे. सुरवातीला जमणार नाही अडचणी येतील पण एकदा का लेखणी संहिता व वाणी संहिता कळली की प्रयत्न करणाऱ्यांना यात नक्कीच गती प्राप्त होईल. जेवढे जास्त लिहाल/बोलाल तेवढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होईल आणि तो झालाही पाहिजे. असो.
भारतात १४ एप्रिल हा उत्सव साजरा होत असताना साऱ्या भारतीय आया माया त्यांचे चिलेपिले, चिल्यापिल्यांचे बाबा त्या बाबांचे बाबा आई यांच्या उत्साहाला पारावर उरत नाही. कारण या सर्वांच्या म्हणजेच भारताच्या बाबांचा जयंती उत्सव असतो. साऱ्या देशभर रोषणाई असते. वाद्यांचा गजर असतो कारण या दिवशी भीम जयंती असते. या दिवशी बाबासाहेबांचे कित्येक कोटींचे विचारधन विकले जाते. या दिवशीच नव्हे तर एप्रिल महिना संपेपर्यंत व्याख्याते/व्याख्याता आपल्या व्याख्यान मालेतून भारतीय समाजात बाबासाहेबांचे विचार पेरत राहतात. भारतात ठिकठिकाणी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. *जयभीम* या जयघोषात अशी काही अद्भुत शक्ती आहे की साऱ्या भारतीयांना एक प्रकारचे स्फुरण चढते. साऱ्या देशभर चैतन्यमय वातावरण निर्माण होते. आणि याच शक्तीमुळे आज भारतीय समाज अखंडित आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
१४ एप्रिल हा उत्सव आता फक्त राष्ट्रीय उत्सव राहिला नसून तो जागतिक स्तरावरील उत्सव झाला आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. अमेरिका, इंग्लंड, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, फ्रान्स अशा प्रगत देशात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतोच शिवाय व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, ऑस्ट्रीया, दक्षिण आफ्रिकेतील छोट्या छोट्या देशात तसेच मुस्लिम आखाती देशात देखील बाबासाहेबांची जयंती साजरी होते. एकंदरीत पाहिले की जगाच्या १९२ देशात १४ एप्रिल हा उत्सव साजरा केला जातो. एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघाच्या (UNO = United Nation Organization) कार्यालयात देखील बाबासाहेबांचा जन्म दिवस मोठ्या थाटात साजरा केला जातो. वरील देशाच्या कित्येक देशाच्या ग्रंथ संग्रहालयात डॉ. बाबासाहेब लिखित संविधान ठेवले आहे. त्यांचे लिखित असंख्य ग्रंथ भाषांतरित करून त्यांच्या त्यांच्या ग्रंथालयात आहेत. कित्येक देशात बाबासाहेबांच्या मुर्त्या आहेत. जगात जर सर्वात जास्त पुतळे असतील तर आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यापैकी काही देशांनी त्या देशातील प्रत्येक युनिव्हर्सिटीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवले आहेत. काही देशांनी त्यांच्या मुर्ती स्थापन करण्याचा संकल्प केला आहे. यामागे त्यांचा उद्देश आहे की, डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करण्याचा. जेव्हा वरील देश बाबासाहेबांची जयंती साजरी करतात तेव्हा त्यामागे त्यांचा कोणता ना कोणता उद्देश असतो. कुणी हा दिवस समानता दिवस पाळतात कुणी ज्ञान दिवस पाळतात. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांच्या मुर्तीच्या चबुतरऱ्यावर लिहूनच ठेवले आहे *The symbol of knowledge* (ज्ञानाचे प्रतीक) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तेव्हा म्हणाले होते की *’जर डॉ. बी. आर. आंबेडकर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही त्यांच्या नावाला सूर्याचे नाव दिले असते’* अमेरिकेसारख्या महाशक्तीच्या एका राष्ट्राध्यक्षाचे हे उद्गार आहेत साहेब. हा बाबासाहेबांचा उच्च कोटीतील सन्मान आहे. त्याच बरोबर आपल्या देशाचा देखील. महाशक्तीच्या राष्ट्राध्यक्षांनी जगातील कोणत्याही नेत्याला तसेच भारतातील कोणत्याही दुसऱ्या नेत्याला एवढा उच्च दर्जाचा सन्मान दिला नसेल जो बाबासाहेबांना दिला. डॉ. बाबासाहेबांच्या नावाला सूर्याचे नाव देणे अमेरिकेला शक्य झाले नसले तरी अमेरिकेच्या नासा NASA = National Aironotics & Space Administration (नॅशनल एरोनॉटिक्स ॲन्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) या संस्थेने आकाशातील सूर्याजवळील एका तेजस्वी ताऱ्याला डॉ. बी. आर. आंबेडकर असे नाव दिले आहे. आकाशात जोपर्यंत तो तारा चमकत राहिल तोपर्यंत साऱ्या जगभर बाबासाहेबांचे नाव व त्यांचे विचार चमकत राहील यात शंका नाही. यावरून विचार करा बाहेरच्या जगातील देश बाबासाहेबांच्या विचारांना किती महत्त्व देतात. हे आमच्या भारतीयांनी मनात कोरून ठेवले पाहिजे. जगाच्या कित्येक देशात त्यांच्या सामाजिक संस्थांना/शाळांना त्यांच्या ग्रंथालयांना डॉ. बी. आर. आंबेडकर असे नाव दिलेले आहे. बौद्ध राष्ट्रे तर बाबासाहेबांना बोधिसत्व मानतात. त्यांच्या राष्ट्रीय वैचारिक मंचावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्या शिवाय त्यांचे वैचारिक मंथन पूर्ण होत नाही.
आपला देश इंग्रजांच्या गुलामीत होता. डॉ. बी. आर. आंबेडकर आपल्या गुलाम देशाचे एक नागरिक आहेत म्हणून इंग्रज किंवा त्यांच्या देशाने बाबासाहेबांना संकुचित दृष्टीने कधीही पाहिले नाही. उलट ते बाबासाहेबांना एक महान अर्थ तज्ञाच्या रूपात पाहतात. व त्यांच्या विचारांना आत्मसात करून आपल्या देशासाठी त्यांच्या विचारांचा कसा उपयोग करून घेता येईल या प्रयत्नात असतात. म्हणूनच त्यांच्या विद्यापीठात बाबासाहेबांना शिकवले जाते. त्यांच्याच नाही तर जगातील बहुतेक विद्यापीठात बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातील अनेक विषय शिकवले जातात. डॉ. बाबासाहेब जेव्हा इंग्लंडला शिक्षणासाठी गेले तेव्हा तेथे ते ज्या घरात राहत होते ते घर आता महाराष्ट्र सरकारने जरी विकत घेतले असले तरी इंग्रज सरकारने सहिष्णुता दाखवून त्या घराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे. आपले भारतीय लोक जेव्हा इंग्लंडला जातात तेव्हा त्या स्मारकाला आवर्जून भेट देतात. डॉ. बाबासाहेब अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे या मागणीसाठी ते तीन वेळा (१९३०/१९३१/१९३२/) गोलमेज परिषदेत उपस्थित होते. तेव्हा त्यांच्या तर्कशुद्ध भाषणाने व बध्दीमत्तेने परिषदेचे इंग्रज अध्यक्ष खूप प्रभावित झाले होते. त्यांच्याजवळ बाबासाहेबांच्या मागण्या मंजूर करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. हे लक्षात घेतले पाहिजे.
जगातील नवतरूणी/तरूण मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांच्या विचारांकडे वळले आहेत/वळत आहेत. त्यांना त्या विचारांचे आकर्षण वाटत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनावर शोध निबंध लिहून डाॅक्टरेट मिळवित आहेत. कित्येकांनी मिळवलेली आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा त्याच्या विचारांचा अभ्यास करत आहेत. त्यासाठी ते अभ्यासक भारत दौऱ्यावर येत असतात. बाबासाहेब डी. बी. लॅपल कोट (डबल ब्रेस्ट लॅपल कोट) व डोक्यावर इंग्लिश हॅट असा सुटाबूटातील पेहराव करून ते जेव्हा पाश्चिमात्य देशांत जात तेव्हा बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व तिथल्या सरकारला व नागरिकांना बाबासाहेब त्यांच्या देशातील नागरिक असल्यासारखे वाटत असत. आजही इंग्लंड, अमेरिका यांच्या संग्रहालयात, ग्रंथालयात, विद्यापीठात इंग्लिश वेषभूषेतील बाबासाहेबांचे छायाचित्रे आहेत. म्हणून तिथली तरुणाई त्यांच्या व्यक्तीमत्वाकडे आकर्षित होत असावी. कदाचित त्याला हेही कारण असावे. बाबासाहेबांच्या विचारामुळे सारे जग प्रभावित झाले/होत आहे. याच कारणांमुळे जग भारताकडे सन्माननीय दृष्टीने पाहात आले/पहात आहे. भारत सरकारने तो त्यांचा दृष्टीकोन अबाधित ठेवावा.
पाश्चिमात्य देशांमध्ये तिथल्या नागरिकांसाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे ग्रंथ सामुग्री, त्यांचे संघर्षमय जीवन प्रेरणा स्त्रोत बनले आहे. त्यांचा अभ्यास करत आहेत. काही देशात तर बाबासाहेबांना प्रायमरी स्कूल पासून शिकवले जाते. ‘जयभीम’ चा नारा तेथेही गुंजतो. खास करून बाबांच्या जयंतीच्या दिवसी. कोणीतरी म्हटलेलेच आहे की जागतिक स्तरावर २१ शतक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शतक असेल म्हणून. त्याचा प्रत्यय यायला लागला. म्हणूनच की काय चीनने यात मागे राहू नये म्हणून आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देखील चीनमध्ये डॉ. बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारण्याच्या संकल्प केला आहे. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण १४ एप्रिल २०२६ होईल असेही सांगण्यात आले. चीन मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून तेथे ग्रंथालय/वाचनालय उभारण्यात येणार आहे. वाचकहो लक्षात घ्या. जर चीनने आपला संकल्प प्रत्यक्षात आणला तर समजून चला की, साऱ्या जगावर आपल्या विचारांचे अधिराज्य गाजवणारे जगातील एकमेव भारतीय नेता असतील ते म्हणजे जगासाठी डॉ . बी. आर. आंबेडकर तर आपल्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ही बाब भारतीयांसाठी अभिमानाची असेलच पण भारत सरकारला सुद्धा अभिमानास्पद असली पाहिजे. वरील माहिती सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्मवर उपलब्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद व आंबेडकरवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. म्हणूनच ते म्हणत असत की, *’मी प्रथम आणि अंतिमतः भारतीयच आहे’.*
आज आपल्या परमपित्याची जयंती आहे. आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होत आहोत. आणि हमेशा होत राहू.
– अशोक सवाई.
9156 1706 99.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत