‘शकुंतला’-अशोक सवाई

(मनोरंजन)
आपल्या देशात परकीय ब्रिटिश लोक राज्य करत होते, शासक होते. जरी ते परकीय असले तरी सुधारणावादी होते. त्यांनी भारतीयांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यापैकी त्यांनी भारतीय प्रवाशांसाठी सन १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली प्रवासी रेल्वे सुरू केली. ती प्रवासी रेल्वे प्रथम तेव्हाचे बाॅंम्बे व्हीटी ते ठाणे या दोन स्टेशन दरम्यान धावली होती. तेव्हा भारतीय लोक तिला मोठ्या अजब गजब नजरेने पहात होते. आज साऱ्या देशभर रेल्वे लाईनचे जाळे पसरले आहे. आपल्या देशात मीटर गेज, ब्राॅड गेज, नॅरो गेज व स्टॅंडर्ड गेज (दिल्ली मेट्रो) असे चार रेल्वे ट्रॅकचे प्रकार आहेत. मीटर गेज रेल्वे ट्रॅक आता देशात फार कमी प्रमाणात आहे. म्हणजे जिथे पुर्वीच्या डिझेल इंजिनचा वापर होतो तिथेच मीटर गेज ट्रॅक उपलब्ध आहे. गेज म्हणजे दोन रूळांमधील अंतर. ज्या दोन रूळांमधील अंतर बरोबर एक मीटरचे असते त्याला मीटर गेज म्हणतात. तसेच हे अंतर एक मीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला ब्राॅड गेज म्हणतात. (अंतर १६७६ मि. मी.) आणि हेच अंतर जर एक मीटरपेक्षा कमी असेल तर त्याला नॅरो गेज म्हणतात. (अंतर ५१० मि. मी.) तर असे हे दोन रूळामधील गेज चे गणित आहे.
आता रेल्वेचाच विषय आहे म्हणून सांगायला पाहिजे. जंक्शन रेल्वे स्टेशन बाबत काही लोकांचा गैरसमज आहे किंवा संभ्रम आहे. जंक्शन म्हटले की त्यांच्या मनात काहीतरी भव्यदिव्य स्टेशन बाबतची कल्पना निर्माण होते. तसी ती त्यांची कल्पना अनेक जणांकडून मी ऐकली, पण ती चुकीची आहे. रेल्वेच्या भाषेत जंक्शन या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. जंक्शन म्हणजे एखाद्या रेल्वे स्टेशनवरून लोहमार्गाचा फाटा फुटून तो वेगळ्या दिशेच्या शहराकडे किंवा वेगळ्या राज्याकडे जातो त्या रेल्वे स्टेशनला जंक्शन रेल्वे स्टेशन म्हटले जाते. उदा० आपल्या राज्याचे मुंबई शहर हे राजधानीचे शहर आहे आणि देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. परंतु तरीही ते रेल्वे जंक्शन स्टेशन होत नाही. कारण तेथून दुसरीकडे कुठेही लोहमार्गाचा फाटा फुटून जात नाही. मुंबई पासून अलिकडे आलं की उपनगरीय दादर रेल्वे स्टेशन मात्र जंक्शन स्टेशन आहे. कारण तेथून गुजरात मधील अहमदाबाद व पुढे दिल्लीकडे लोहमार्ग जातो. दादरच्या अलिकडे कल्याणला आलं की तेथून एक पुण्याकडे व दुसरा नागपूरकडे लोहमार्ग जातात. तर अशा रेल्वे स्थानकांना जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणतात. राज्यात पुणे, पुण्यावरून मिरज, कोल्हापूरकडे व तिथून पुढे आंध्र व तामिळनाडूकडे. रेल्वे जाते. इकडे दौंडकडे लोहमार्ग जातो. भुसावळ, वर्धा असे काही मोठे जंक्शन आहेत. या स्टेशनवरून पर राज्यात रेल्वे जाते. नागपूर तर असे देशाचे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन आहे की इथून मुंबई, चेन्नई, कोलकाता व दिल्ली अशा चारही बाजूंनी रेल्वे जाते. म्हणून अशा स्टेशनला जंक्शन रेल्वे स्टेशन म्हटले जाते. कर्जत जवळचे छोटे नेरळ रेल्वे स्टेशन सुद्धा जंक्शन आहे. कारण तेथून लोहमार्गाचा फाटा माथेरानला जातो. हा नॅरो गेजचा ट्रॅक आहे. या ट्रॅक वरून छोटी माथेरानी दुडूदुडू धावते.
आता पुन्हा नॅरो गेज कडे येवू नॅरोगेज च्या ट्रॅक वरून धावणाऱ्या छोट्या रेल्वे गाडीला (छोटे तीन किंवा चार डबे असणारी) वऱ्हाडात (विदर्भ) *’शकुंतला’* म्हणतात आता तिला शकुंतला का म्हणतात हे माहिती नाही पण म्हणतात ऐवढे मात्र नक्की. कदाचित त्या रेल्वेच्या गतिविधीमुळे वऱ्हाडी इब्लिस पोट्ट्यांनी ते नाव ठेवले असावे आणि तेच नाव सर्वांच्या तोंडी पडून प्रचलित झाले असावे. असो… पुलगाव ते आर्वी व आर्वी ते पुन्हा पुलगाव अशा शकुंतलेच्या चकरा होत असत. ही ‘शकुंतला’ व नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी ही ‘माथेरानी’ या दोघीही सख्खा बहिणी. दुडूदुडू धावणाऱ्या. या दोघींचाही कारभार अजूनही इंग्रजांच्या अखत्यारीत चालतो.
सन १९८९ ते १९९५ या कालावधीत मी पुलगाव जि. वर्धा. येथे कामाला होतो तेव्हा कामाच्या निमित्ताने पुलगाव ते आर्वी असा प्रवास या *’शकुंतलेने’* अनेक वेळा केला आहे. त्या प्रवासाचे किस्से भन्नाट आहेत. त्यापैकी काही किस्से इथे आवर्जून सांगावेसे वाटतात.
पुलगाव ते आर्वी हे अंतर जेमतेम ३० कि. मि. चे पण ते पार करण्यासाठी ही बया म्हणजे *’शकुंतला’* दोन तास घेत असे. कारण मधे खेड्यापाड्यांच्या अनेक स्टेशनवर ती थांबत असे. स्टेशन वरील बाया, माणसं, लेकरं पाखरं, कोंबड्या, बकऱ्या, जित्राबांचा चारा असं सारं आपल्या सोबत घेऊन ही बया पुढच्या स्टेशन कडे धावत असे नव्हे चालत असे. बरं या शकुंतलेचे ड्रायव्हर व गार्ड भलतेच सहिष्णुतावादी होते. दूरून आडमार्गाने कोणी म्हातारे कोतारे किंवा एखादी गरोदर महिला शकुंतलेच्या दिशेने लगबगीने येतांना दिसले की, त्यांच्यासाठी ड्रायव्हर व गार्ड यांचे दयाभाव किंवा करुणा अगदी ओसंडून वाहत असे. त्यांना गाडीत घेतल्यावरच ड्रायव्हर तीन तीन वेळा भोंगा वाजवूनच तीन डब्याच्या शकुंतलेला धावण्याच्या इशारा देत असे. या शकुंतलेचे डबे जसे छोटे छोटे होते तसेच वाफेचे इंजिन ही छोटे होते. मला या शकुंतलेने प्रवास करण्यात मोठी गंमत वाटे. तसा मला एसटीचा ही पर्याय होता. पण शकुंतलने प्रवास करण्यात काही और मजा होती. या प्रवासात अनेक प्रवाशांचे चेहरे, चेहऱ्यावरील भाव, त्यांचे आपसातील संवाद टिपण्यात भलताच आनंद वाटे. लोकांचे निरिक्षण करता येत होते. एकदा काय झाले एक लहान पोरगं व त्याचा बाप एका बाजूला तर पोराची माय दुसरीकडे पण एकाच डब्यात होते. पोरगं माय जवळ नसल्याने ती मार कल्ला करत होती. “अय पोराच्या बापा पोरगं कुठीसा हाय वं माह्ये पोरगं ऱ्हायलं काय वं खाली?” इकडून पोराच्या बापानं आवाज दिला, ‘हाय वं माह्या जवळ हाय कल्ला नोको करू एवढा” तवा पोराची माय उगीमुगी झाली. असेच काही संवाद खाली शेअर करत आहे. वऱ्हाडी भाषेतील संवाद ऐकताना मोठी मजा व मनोरंजन होत असे.
१) “अहो डायवर वाले दादा आमच्या लेकरं बायाले गाडीत धसू देजा जी, चालू नोका करजा”.
२) “अगा भाऊ, इकडे लेडिज बसल्या आहेत ना… इकडे बकऱ्या कायले घुसवता जी?”
“बकऱ्या लेडीजच आहे ना जी, बाई… यायच्यात जेन्ट कोणी नाय, बसू द्या एका बाजूनं बसतीन त्या बिचाऱ्या”…
३) “अगा वो… श्यामराव भौ… माही कोंबड्याची पाटी घेतली काय गा?”
४) “ते पाय बे… शकुंतला आली”… ” कोणती बे?” “अबे याची वाली”.
५) “शकुंतला पकडाले बुढा पाय कसा धावून ऱ्हायला”…
६) “मा… वो मा… चल लवकर, नाय तं ऱ्हायसीन इथीसा खाली”
“हावो मी तुह्या मांगच आहो चल”
७) ” रूख्मे… वो… रूख्मे… ही रूख्मी कुठं गेली वं?”
“का जी नं माय कुठं गेली तं”
“जावू दे… येईन एसटी नं थे”
८) “अगा… हे तुह्येवालं धसकट जरा बाजूले घेनं गा… माह्या आंगाले रूतून ऱ्हायलं ना!”
“हव भौ, मले उतराचच हाय आता”…
तर असे हे संवाद. तसे संवाद भरपूर आहेत परंतु लेख लांबलचक होईल. उदाहरणासाठी एवढे संवाद खूप झाले. पुलगाव ते आर्वी दोन तासांचा प्रवास माणसांच्या संवादांनी मनोरंजनात कधी पार पडायचा कळतच नव्हते. तासी २० कि. मि. ने धावणाऱ्या शकुंतलेला सायकल वाला वाकुल्या दाखवून पुढे जात असे तेव्हा शकुंतलेच्या प्रवाशांना भारी अपमान झाल्या सारखे वाटे. कारण शकुंतलेचा ट्रॅक व मोटारीचा रस्ता समांतर रेषेत आर्वी पर्यंत जात होता. दोघांमधील अंतर मुश्किलीने दहा-बारा फुटाचे होते.
आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असणाऱ्या घरचे पोट्टे सोट्टे आपली मोटरसायकल मुद्दामहून शकुंतलेच्या गतीने चालवत असत. कारण शकुंतलेतील एखाद्या काॅलेज कन्येची लाइन मिळते का बघण्यासाठी. तेव्हा ते पोट्टे उगाच *"मेरे सपनो की रानी कब आयेगी तू"...* या गाण्याचा फिल स्वतःसाठी करून घेत असत. एखादा बैलगाडी वाला आपली बैलगाडी जोराने हाकत शकुंतलेच्या पुढे घेऊन जात असे. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील भाव बैलगाडा शर्यत जिंकल्याचा वाटत असे तर गाडीतील प्रवासी चेहऱ्यावर हरल्याचे भाव असत. अशी ही शकुंतलेची धमाल.
अजून एक किस्सा. एकदा शकुंतलेच्या ट्रॅकवर एक दोन भैसाचा एकच अगडबंब ताकदीचा भैसा (रेडा/हेला) काळाशार, भले मोठे पांढरे डोळे, त्याच्याकडे बघून आपले डोळे पांढरे व्हायचे असे त्याचे भयानक रूप. दोन्ही बाजूंना दोन तलवारीच्या आकाराचे लांबलचक सिंगे. गडी ट्रॅक वरून हटायला तयार नव्हता. चुकून जरी तो काळाभोर हेला पळत येवून शकुंतलेच्या छोट्या काळ्या इंजिनला त्याने धडक दिली असती तर त्याचे काय झाले असते हे महिती नाही पण शकुंतला ट्रॅक च्या खाली नक्कीच उतरली असती. त्याला दुरूनच बघून इकडे शकुंतलेच्या ड्रायव्हर व गार्डची चांगलीच टरकली होती. ड्रायव्हरने शंभर-दिडसे फुटावरच शकुंतलेला रोखलं. तो काळा भयानक यमदूत बाजूला व्हायची वाट पाहत होते. पण भैसा जागचा हालत नव्हता. मोठमोठ्याने हंबरत होता, मान हलवत होता. जमीनीला खुरं घासत होता. जसा काही इंजिनवर चाल करण्याच्या तयारीत असल्यासारखा. इकडे ड्रायव्हर सहित प्रवाशांची पाचावर धारण बसली. बराच वेळ गेल्यावर कुठून तरी भैसाचा मालक म्हशीला घेऊन आला. भैसा च्या समोरून म्हशीला घेऊन जावू लागला. म्हशीला पाहून भैसा ही तिच्या पाठोपाठ जावू लागला. म्हशीचा मालक म्हशीला घेऊन दूर गेला भैसा ही तिच्या मागे गेला. तो दूर गेल्यावर ड्रायव्हर व प्रवाशांचा जिव भांड्यात पडला. ड्रायव्हर पुन्हा शकुंतलेला घेऊन धावू लागला. तर अशी ही *'शकुंतला'* आणि तिचे ते भन्नाट किस्से. नेरळला कधी 'माथेरानी' ला बघीतले की मला अजून ही पुलगावच्या शकुंतलेची व तिच्या किश्शांची आठवण होते व नकळतपणे ओठांवर हसू सुद्धा येते.
– अशोक सवाई.
91 5617 0699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत