बुद्धत्वाची प्राप्ती

*_!! भाग ५ !!_*
आजपासून २५४० वर्षांपूर्वी वैशाख पौर्णिमेची रात्र होती. तपस्वी राजकुमार आधुनिक बोधगयेच्या जवळ उरुवेला अरण्यात नेरंजरा नदीच्या काठी पोहचला आणि तिथे बोधी वृक्षाखाली मांडी घालून बसला. त्याने असा दृढ निश्चय केला की जोपर्यंत तो परमार्थ सत्य व सम्यक संबोधी प्राप्त करणार नाही तोपर्यंत त्याच आसनात अचल बसून राहील, भले या प्रयत्नात त्याला आपले प्राण सुद्धा का न गमवावे लागोत.
सत्याच्या शोधासाठी एकाग्र चित्त होणे आवश्यक आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी तपस्वी राजकुमार प्रयत्न करु लागला. शुभ समय समीप येऊ लागला. तपस्व्याने आपल्या समस्त मानसिक शक्तींना संग्रहित केले. त्याने पाहिले साधारणपणे सहजतेने एकाग्र होणारे चित्त आज विचलीत होत आहे. त्याने अनुभवले की उच्च श्रेणीच्या चित्तवृत्तींबरोबर निम्न श्रेणीच्या चित्तवृत्तींचा संघर्ष होत आहे आणि चित्ताला एकाग्रता प्राप्त करण्यात वेळोवेळी बाधा येत आहेत. या विघ्नकारी शक्तींच्या बाधा इतक्या घनीभूत होत्या की आतील प्रकाशाची किरणे यांचे भेदन करु शकत नव्हती. असे संभवतः यासाठी होत होते की बुद्धत्व प्राप्तीचा हा अंतिम संग्राम होता आणि दुषित प्रवृत्तीरुपी आपल्या समस्त विरोधी शक्तींसोबत दुष्ट मार स्वयं युद्धात उतरला होता. तपस्वी हिंमत न हारता धैर्यपूर्वक सर्वं विघ्नांचा जोमाने सामना करीत राहिला. असंख्य जन्मातील संचित कुशल पुण्यांचे बळ ऐन वेळी मदतीला येणे आवश्यक होते आणि आले सुद्धा. पूर्व जन्मांमध्ये ज्या दहा पारमीतांचे महान व्रत पूर्ण केले होते, त्यांच्या साक्षीने सर्व देव-ब्रह्मांना त्याने आवाहन केले आणि वर्तमान संग्रामात विजयी होण्यासाठी त्यांच्या सहयोगाची कामना केली. असे करताच स्व-अर्जित पारमीतांच्या बरोबरीने देव-ब्रह्मांच्या परम परिशुद्ध अतींद्रिय मानसिक शक्तींच्या सहयोगाने चमत्कारी प्रभाव निर्माण केला. त्या सर्व घनीभूत दृष्ट शक्ती ज्या पहिल्यांदा अभेद्य वाटत होत्या, आता छिन्न-विछिन्न होऊ लागल्या, मानसिक नियंत्रण दृढ होऊ लागले. परिणामतः त्या सर्व बाधा नेहमीकरता निघून गेल्या. जेव्हा साऱ्या बाधा दूर झाल्या तेव्हा राजकुमाराने चित्ताची एकाग्रता अजून अधिक तीव्र केली आणि फलस्वरुप मन परम विशुद्ध, प्रशांत आणि स्थिर झाले. आता हळू-हळू आंतरिक प्रज्ञेचे चैतन्य उभरु लागले. त्या परम चैतन्याच्या अवस्थेत त्या साऱ्या प्रश्नांचे समाधान आपोआप होऊ लागले जे अजून अनुत्तरीत होते. साधकाने गंभीर अंतर्दृष्टीने आत्म निरिक्षण केले. प्रकृतीच्या वास्तविकतेचे परिक्षण केले आणि त्याला स्पष्टपणे जाणवू लागले की त्याचे हे भरीव, ठोस वाटणारे शरीर वस्तुतः किती निस्सार आहे. हे तर केवळ असंख्य-असंख्य परमाणुंचा, कलांपाचा पुंज मात्र आहे आणि एक-एक कलाप इतका सूक्ष्म की ग्रीष्म काळातील रथाच्या चाकांमुळे उडणाऱ्या धुळीच्या छोट्यातील छोट्या कणाचा ४६६५६ वा हिस्सा मात्र. अजून अधिक लक्ष दिल्यावर त्याने पाहिले की या परमाणुंचा पुंज सुद्धा सतत प्रवाहमान आहे, सतत परिवर्तनशील आहे, नित्य-स्थिर नाही आहे. हिच दशा मनाची सुद्धा आहे. ते सुद्धा अत्यंत अस्थिर आहे, सतत परिवर्तनशील आहे, सतत उत्पन्नधर्मा व विनाशधर्मा आहे. मन सर्व मानसिक शक्तींचे प्रतीक आहे आणि या मानसिक शक्ती ज्या उत्पादक आहेत त्या आमच्या आतून बाहेरच्या दिशेने आणि ज्या उत्पन्न आहेत त्या बाहेरुन आतल्या दिशेने निरंतर प्रवाहमान आहेत. आणि प्रवाहाचा हा क्रम अनादी काळापासून अखंडितपणे चालत आला आहे.
आता सिद्धार्थ समजला की त्याचे ज्ञानचक्षु उघडले आहेत. जेव्हा या ज्ञानचक्षुंनी त्याने आत्म निरिक्षण केले तेव्हा पाहिले की सर्व काही सारहीन आहे. तीक्ष्ण समाधीच्या अणुवीक्षणीय दृष्टीद्वारे त्याने कलापांचे पुन्हा एकदा परिक्षण केले आणि त्यांच्या अनित्य स्वभावावर लक्ष केंद्रित केले तर पाहिले की ते शून्यवत होत आहेत, त्यांचे स्वतःचे वेगळे काही अस्तित्व नाही, ते केवळ स्वभाव मात्र आहेत. केवळ ‘पति’ म्हणजे प्रज्ञप्ती मात्र आहेत. आणि अशा प्रकारे या प्रज्ञप्ती सत्यांचे अतिक्रमण करुन त्याने परमार्थ सत्याचा अनुभव घेतला, शक्तींच्या सत्य स्वभावाचा अनुभव घेतला.
असे जेव्हा त्याने आपल्या शरीराच्या आत नाम व रुप, चेतन व जड दोघांना निरंतर प्रवाहमान पाहिले तेव्हा क्रमशः दुःखाचा साक्षात्कार केला. असे होताच त्याच्या आतील अहंभाव तटुन शून्यात बदलला आणि तो दुःख निरोधाच्या स्थितीमध्ये पोहचला, तेथे आत्मभाव लेशमात्र देखील राहिला नाही; आपल्याविषयी सारी आसक्ती समाप्त झाली. आता हे स्पष्ट झाले की जड व चेतन दोन्हीही किती निस्सार आहेत, किती पोकळ आहेत. या दोघांचे संयोजन एक असा दिखावा आहे जो सतत प्रवाहमान आहे; सतत परिवर्तनशील आहे; कार्य-कारणाच्या कठोर नियमांनी नियंत्रीत आहे; प्रतीत्य-समुत्पाद, म्हणजे, कारणामुळे उत्पन्न होण्याच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. हे जाणताच सत्याचा संपूर्ण साक्षात्कार झाला. बोधिसत्वामध्ये संगृहित बुद्धत्वाचे अनंत गुण जागृत झाले आणि वैशाख पौर्णिमेची ती रात्र संपण्यापूर्वी, पूर्व दिशेला सूर्य-किरणे फुटण्यापूर्वीच त्याने बुद्धत्वाचा प्रकाश प्राप्त केला. राजकुमार सिद्धार्थ खरोखरच सम्यक संबोधी प्राप्त करुन सम्यक संबद्ध बनला जागृत ! प्रकाशमान ! आणि सर्वज्ञ !! जागृत असा की त्याच्या तुलनेत बाकी सर्व जण झोपले आहेत आणि स्वप्नांमध्ये आहेत. प्रकाशमान असा की ज्याच्या तुलनेत इतर सर्व जण अंधारात भटकत आहेत आणि ठोकर खात आहेत. आणि सर्वज्ञ असा की ज्याच्या तुलनेत इतर सर्व जण केवळ अविद्येची जाणीव राखतात.
बुद्धांची सर्व शिकवण त्रिपिटकात संग्रहीत आहे. त्रिपिटकात सूत्र (प्रवचन), विनय (भिक्षु जीवनाचे नियम), अभिधम्म (दर्शन) ही तीन पिटक आहेत. हे पाली भाषेत अनेक ग्रंथामध्ये संकलित केले आहे. त्रिपिटकाची विशालता या बाबीने जाणता येऊ शकते की पाली भाषेच्या कोणाही पंडिताला, या ग्रंथांचा पाठ करायला काही महिने लागू शकतात. याकरता मी आजच्या प्रवचनाला बुद्ध शिकवणुकीच्या सारतत्वांपर्यंत-मूलभूत तत्वांपर्यंतच सीमित ठेवणार आहे.
धर्माचा उपदेश करण्यापूर्वी भगवान सम्यक संबद्ध ४९ दिवस मौन राहिले. ते सात दिवस बोधिवृक्षाखाली आणि इतर सात-सात दिवस तेथील जवळच्या सहा अन्य ठिकाणी विमुक्ती सुखाचा-निर्वाण सुखाचा आनंद घेत राहिले आणि परमार्थ धर्माच्या सुक्ष्मतांवर चिंतन-मनन करीत राहिले. अशा प्रकारे चिंतन-मनन करतांना जेव्हा त्यांनी पट्ठान (हेतु फलवाद) च्या नियमांचे तसेच चित्त आणि चैतसिक (चित्तवृत्तीं) च्या सूक्ष्मातिसूक्ष्म पारस्परिक संबंधांचे संपूर्ण विश्लेषण केले तेव्हा त्यांच्या शरीरातून सहा रंगांची उज्वल किरणे प्रस्फुटित झाली जी हळू-हळू त्यांच्या मुखमंडळाला प्रकाशून प्रभामंडळाच्या रुपाने स्थिर झाली. भगवानांनी हे सात सप्ताह बिना भोजन करिता घालविले. या काळात भगवानांचे जीवन साधारण लोकांप्रमाणे स्थूल पार्थिव स्तरावर स्थित नसून सूक्ष्म मानसिक स्तरावर स्थित होते. सूक्ष्म लोकातील निवासी देव-ब्रम्हा इत्यादींना आपल्या पोषणासाठी स्थूल पार्थिव भोजनाची आवश्यकता नसते. त्यांचे भोजन ध्यानजन्य-प्रीती सुखच असते जे की स्वयं श्रेष्ठ पोषण तत्व आहे. भगवान बुद्ध सुद्धा सात आठवड्यांसाठी याच पोषण तत्वावर अवलंबून राहिले कारण ते स्थूल पार्थिव स्तराऐवजी सूक्ष्म मानसिक स्तरावर स्थित होते. याविषयी आम्ही जे अनुसंधान केले आहे त्यावर आम्ही पूर्णतया आश्वस्त आहोत की इतक्या उच्च मानसिक आणि बौद्धिक स्तरावर स्थित भगवान बुद्धांसाठी हे असंभव नाही.
सात आठवड्यांच्या या दीर्घ काळानंतर पन्नासांव्या दिवशी पहाटे जेव्हा भगवान ध्यानातून उठले तेव्हा त्यांना भोजनाची इच्छा झाली. असे मात्र नाही की सात आठवड्यांच्या निरंतर उपवासानंतर ते खूप क्षद्धित आणि व्याकुळ झाल्यामुळे उठले होते, परंतु सूक्ष्म मानसिक अवस्थेतून स्थूल पार्थिव अवस्थेत आल्याबरोबर साधारण भूक जागणे स्वाभाविकच होते.
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
लेखक :- सयाजी ऊ बा खिन
बुद्धवर्ष २५६१, चैत्र पौर्णिमा, ३१ मार्च, २०१८ वर्ष १ अंक ९३
संकलन :- महेश कांबळे
दिनांक :- १४/०३/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत