८ मार्च :- जागतिक महिला दिन

समाज तभी होगा महान
जब नारी का होगा सन्मान
स्त्री म्हणजे मातृत्वाचा झरा.स्त्री म्हणजे वात्सल्याचं प्रतिक अन् स्त्री म्हणजे त्यागाची मूर्तिमंत देवताच होय.स्त्री ही दोन विभिन्न कुटुंबातील सेतू असून,ती प्रत्येक युगात सातत्याने कुटुंबासाठी चंदनासारखं झिजत असते.स्त्री ही,कन्या, बहीण,पत्नी,माता अशा विविध भूमिकेतून कुटुंबाच्या उन्नतीकरिता आपलं भरीव योगदान देत असते.एवढं करूनही तिला कौटुंबिक व सामाजिक जीवनात अनेक समस्या अन् शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.हे सर्व घाव सहनशिलतेने सोसून हतबल न होता,
ती आपली पुढील यशस्वी वाटचाल करत असते,याचा आम्हा पुरुषवर्गाला सार्थ अभिमान आहे.यास्तव जागतिक महिला दिनानिमित्त माता-भगिनींना त्रिवार मानाचा मुजरा!
मित्रहो,८ मार्च हा दिवस वैश्विकस्तरावर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.२० व्या शतकाच्या सुरुवातीपासून अमेरिका,युरोप,ब्रिटन,जर्मनी,भारत या देशांमध्ये स्त्री -पुरुष समानता,स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणं,पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना वर्किंग हावर्स कमी देणं,वेतनवाढ,नोकरीच्या ठिकाणी महिलांना संरक्षण आदी मागण्यांसाठी विविध महिला संघटनांकडून आंदोलने झाली,मोर्चे निघाले.यातूनच महिलांच्या सन्मानासाठी अन् हक्कांसाठी सर्वानुमते ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.१९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.त्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र महिला दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्री महात्म्यविषयी म्हणतात,”स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे.स्त्री मग ती शत्रूच्या मुलखातली जरी असली,तरी ती मातेसमान असते.म्हणून तिचा यथेच्छ सन्मान झालाच पाहिजे”.मानवी जीवनात स्त्रीचे महत्व अनन्यसाधारण असते.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना लोकहितवादी व आदर्श राजा घडविण्यात त्यांच्या आईसाहेब राजमाता जिजाऊ यांनी अविश्रांत परिश्रम घेतले.अर्थातच शिवबाला युद्धनीतीचे प्रशिक्षण देण्यापासून तर राज्याभिषेक करण्यापर्यंत त्या आयुष्यभर झटल्या.अशा थोर मां जिजाऊंना जागतिक महिला दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! यत्र नार्यास्तू पुज्यन्ते!
रमन्ते तत्र देवता:!!
१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या असामान्य शौर्याने झांसीची राणी लक्ष्मीबाई ह्या भारतीय इतिहासात अजरामर झाल्या.इंग्रज गव्हर्नर डलहौसीला मेरी झांसी नही दूंगी असा सज्जड इशारा देत भारतभूमीच्या रक्षणार्थ तिने आपल्या प्राणाची आहुती दिली.त्यांनाही या मंगलमय दिनी आम्ही त्रिवार वंदन करतो.आजच्या महिला दिनी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आठवण येणं स्वाभाविक आहे.वैधव्याच्या दुःखाने अन् पुत्रशोकाने हतबल न होता मोठ्या धैर्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी होळकरांचे राज्य चालविले.प्रजाहितदक्ष राज्यकर्ती म्हणून रयतेत ओळख असलेल्या अहिल्याबाईंनी सर्वधर्मसमभाव या तत्त्वाचा अंगिकार करून तब्बल २८ वर्षे यशस्वीपणे होळकरांचा राज्यकारभार चालविला. आजच्या जागतिक महिला दिनी त्यांना आम्ही मराठीजन दंडवत प्रणाम करतो.
पारतंत्र्याच्या काळात म्हणजेच १९ व्या शतकाच्या मध्याला जेव्हा स्त्री ही शिक्षणापासून पूर्णतः वंचित होती.तिला चूल अन् मुल या चौकटीतच रहावं लागायचं.त्या कालखंडात स्त्रीला शिक्षण घेणं वर्ज्य होतं.अशा वेळी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी तथाकथित समाजाचे बंधनं झुगारून फुले दाम्पत्य पुढे आलं.त्यांनी पुण्यात भिडेंच्या वाड्यात १जानेवारी १८४८ रोजी मुलींची शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ केली अन् ही शाळा देशातील पहिली मुलींची शाळा गणली गेली.सावित्रीबाई फुले ह्या पारतंत्र्याच्या काळातल्या पहिल्या महिला शिक्षिका म्हटल्या गेल्या.आईच्या महानतेसंदर्भात सावित्रीबाई म्हणतात,जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाते उद्धारी. तत्कालिन कर्मकांडी समाजाचा विरोध अन् जाचक छळ सोसून सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची बिजे रोवली.आज त्यांच्या पुण्याईमुळे २१ व्या शतकातल्या सावित्रीच्या लेकी ह्या शिकूनसवरून विज्ञान,तंत्रज्ञान,शिक्षण,
राजकारण,समाजकारण,
माहिती तंत्रज्ञान,साहित्य,कला,
सिनेसृष्टी,उद्योग,बँकिंग,
क्रीडा,विधी व न्याय,वैद्यकीय, पत्रकारिता,इलेक्ट्रॉनिक मीडिया,संरक्षण,प्रशासन,
अंतराळ या क्षेत्रांत आघाडी घेताना दिसत आहेत.स्त्री शिक्षणातील त्यांच्या महान कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कृतज्ञतेच्या भावनेतून सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला दिलं.वास्तवात हीच त्यांच्या कार्याची खरी पावती होय.अत: स्त्री शक्तीला त्रिवार मानाचा मुजरा!
भारतातील प्रत्येक जिल्ह्यात अन् खेड्यापाड्यात परिचित असलेला शालिन चेहरा म्हणजे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी. स्व.इंदिरा गांधी ह्या आपल्या स्वकर्तुत्वाने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून गणल्या गेल्या.इतकेच नव्हे तर,जगातील १२० तटस्थ राष्ट्रांच्या संघटनेच्या त्या अध्यक्ष बनून जागतिक कीर्तीच्या नेत्या म्हटल्या गेल्या.त्यांच्या प्रभावी व कणखर अशा राजकीय भूमिकेमुळे भारताला सातासमुद्रापार नावलौकिक मिळाला.इंदिरा गांधींना आम्ही सर्वधर्मीय नागरिक आजच्या शुभ दिनी विनम्र अभिवादन करतो.
स्री ही प्रत्येक युगात सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.म्हणूनच तिचं नाव अग्रक्रमी घेतलं जातं.उदा.लक्ष्मीनारायण, सीताराम,राधेश्याम! श्री गजाननाची मातोश्री मां पार्वती,प्रभुरामाची मातोश्री माता कौशल्या,
श्रीबजरंगबलीची माता अंजलीदेवी,भगवान श्रीकृष्णाच्या मातोश्री देवकी व यशोदा या सर्वांच्या संस्कारांमुळे अन् शिकवणीमुळे त्यांच्या सुपुत्रांनी आपले नाव साऱ्या त्रिलोकात अजरामर केलं.ही आहे खरी आईची महिमा! अशा महान देवीमातांना आम्ही साष्टांग नमन करतो.
भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू अन् माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही मराठी भूमिपुत्र त्रिवार मानाचा मुजरा करतो.तथाकथित समाजाकडून स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काव्याच्या माध्यमातून आवाज उठविणाऱ्या अहिराणी भाषेच्या खानदेशी कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनाही महिला दिनानिमित्त भावपूर्ण नमन!
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.राज्यकर्त्यांनी स्त्रियांना राजकारणात अधिकाधिक प्रतिनिधित्व द्यावं,असं त्यांनी आवाहन केलं.भारतीय लोकशाही मजबूत व प्रभावी करण्यासाठी स्त्रियांचा राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग असायला पाहिजे,असे त्यांचे ठाम मत होतं.मनूस्मृतीने स्त्रियांचे जीवन चूल अन् मूल या चौकटीत बंदिस्त केलं होतं.त्यांना शिक्षणापासून कोसो दूर ठेवलं.त्यांना गुलामासारखी वागणूक देऊन,भोग वस्तू म्हणून हिणवले.या सर्व अमानवीय गोष्टींमुळे डॉ.बाबासाहेबांचे मन खिन्न झालं होतं.त्यांनी याचा तीव्र विरोध करत,मनुस्मृतीची जाहीर होळी केली.अशा महान लोकहितवादी युगपुरुषाला जन्म देणाऱ्या त्यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर तसेच त्यांना जीवनातल्या सुख-दुःखात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर आणि माईसाहेब सविता आंबेडकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही विनम्र अभिवादन करतो.
स्त्री शिक्षणाला कर्मकांडी समाजाकडून तीव्र विरोध होत असताना,ठाणे जिल्ह्यातील कल्याणची सुकन्या स्व.डॉ.आनंदीबाई जोशी यांनी तत्कालिन समाजाची बंधने झुगारून,उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊन एम.डी.ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादन केली.विशेष म्हणजे आनंदीबाई ह्या विदेशात शिकून पारतंत्र्यात डॉक्टर होणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून गणल्या गेल्या.त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजातील गोरगरिब,निराधार,निर्धन महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी केला.महत्वाचे म्हणजे महिला डॉक्टरांसाठी पिढ्यान-पिढ्या डॉ.आनंदीबाई जोशी ह्या रोल मॉडेल म्हणून राहतील. महिला दिनानिमित्त डॉ.आनंदीबाई जोशी यांना आम्ही मराठीजन साष्टांग नमन करतो.
भारताला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी योगदान देणाऱ्या थोर महिला सरोजिनी नायडू,अरुणा
असफअली,उषा मेहता,मॅडम भिकाजी कामा,कस्तुरबा गांधी,बेगम हजरत महल,कमला नेहरू, अँनी बेझंट,विजया लक्ष्मी पंडित या ज्येष्ठ-श्रेष्ठ महिलांना आजच्या मंगलमय दिनी हार्दिक शुभेच्छा.नंदुरबारचे बाल क्रांतीकारक शिरीषकुमार मेहता ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली,अशा महान क्रांतिवीरच्या मातोश्री स्व.सविताबेन पुष्पेंद्र मेहता यांना महिला दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
जगविख्यात गायिका,
स्वरसम्राज्ञी,भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांनी आपल्या करियरमध्ये विविध भाषेंत सुमारे ३० हजारहून अधिक गीतं गाऊन विश्वविक्रम केला.यास्तव त्यांना भारतीयांच्या हृदयात चिरकाल मानाचं स्थान राहिलं आहे.यास्तव स्व.लताजींना महिला दिनानिमित्त भावपूर्ण नमन!
गोरगरीब,अबला,निराधार जनतेची नि:स्पृह भावनेने सेवा करून त्यांना मायेचा ओलावा दिला,याबद्दल भारत सरकारने मदर तेरेसा यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलं,त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.प्रख्यात गायिका आशा भोसले,अनुराधा पौडवाल,श्रेया घोषाळ,सुनिती चौहान,वैशाली सामंत,आर्या आंबेकर आदी ख्यातनाम गायिका आणि सिने अभिनेत्री वहिदा रेहमान,हेमा मालिनी,शबाना आजमी,आशा पारेख,माधुरी दीक्षित,रश्मिका मंदाना,सई ताम्हणकर,अलका कुबल,सोनाली कुलकर्णी आदी अभिनेत्रींना महिला दिनानिमित्त शुभेच्छा! आपणा सर्वांना दीर्घायुष्य लाभो!
न्यायदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सन्माननीय न्यायमूर्ती जे.फातिमा बीवी,न्या.भानुमती,न्या.इंदू मल्होत्रा,न्या.इंदिरा बॅनर्जी,न्या.सुजाता मेहता,न्या.रंजना देसाई आदी मा.न्यायाधीश महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.आपणास आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभो,हीच सदिच्छा!
समाज कार्यात आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या मेधा पाटकर,स्व.सिंधुताई सपकाळ,मंदाकिनी
आमटे,राणी बंग,किरण बेदी आदींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणास उदंड आयुष्य लाभो.उद्योग जगतात भारताचे नाव अजरामर करणाऱ्या निता अंबानी,फाल्गुनी नायर,निस शर्मा,राधिका घाई अग्रवाल, रीचा कर,उपासना टाकू,वंदना लुथरा,सबिना चोप्रा,सायरी चहल,श्रद्धा धर्मा,सूची मुकर्जी,विणा पाटील आदी प्रख्यात उद्योजक महिलांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.ख्यातनाम महिला पायलट सरला ठकराल ,स्व.कल्पना चावला,सुनीता विल्यम्स यांना तसेच राजकीय- सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सुप्रिया सुळे,स्मृती इराणी,निलम गोऱ्हे,पंकजा मुंडे,जया बच्चन,ममता बॅनर्जी,नवनीत राणा,पूनम महाजन,मीनाक्षी शिंदे,पल्लवी कदम आदी कर्तबगार भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तबगारीची छाप पाडणाऱ्या सुजाता सौनिक,मनिषा म्हैसकर,मेधा गाडगीळ,मनीषा वर्मा,वत्सला नायर-सिंह,विनिता सिंघल,वंदना कृष्णा यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात देशाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या मेरी कॉम,सायना नेहवाल,राही सरनोबत,सानिया मिर्झा आदींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा साहित्य-कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दुर्गा भागवत,विजया वाड,अरूणा ढेरे, विजया राजाध्यक्ष,शांता शेळके आदींना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा !
दैनंदिन जीवनात कधी कधी विद्यार्थिनी एवं महिलांवर विविध प्रकारे हल्ले,अपहरण वा दुष्कृत्ये होत असल्याच्या घटना घडत असतात,याचे वाईट वाटते.त्यावर रामबाण उपाय म्हणून मुलींसाठी शालेय जीवनापासूनच स्वरक्षणार्थ मार्शल आर्ट चे प्रशिक्षण सक्तीचे करावे. जेणेकरून
वेळप्रसंगी त्या आपला बचाव स्वतः करू शकतील. याशिवाय केंद्र अन् राज्य सरकारने देखील शाळा/कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी तथा महिलांचे असामाजिक तत्वांपासून बचाव/रक्षण होण्यासंदर्भात ठोस कायदेशीर उपाययोजना कराव्यात,जेणेकरून त्या निर्भयपणे आपलं जीवन व्यतित करू शकतील.
मित्रहो,२१ व्या शतकात भारतीय महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात उंच भरारी घेताना दिसताहेत.त्यातून तिने स्त्री ही अबला नसून सबला आहे,हे प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करून दाखविले आहे.मुलींनी खूप खूप शिकावं अन् आपल्या कुटुंबाचा व राज्यासह देशाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी खारीचा वाटा उचलावा.महत्वाचे म्हणजे आधुनिक जगतात चूल अन् मूल ही संकल्पना कालबाह्य झाल्याने पालकांनी आता बेटी पढाव,बेटी बचाव हे कृतीने सिद्धीस आणावे,म्हणजे महिला दिन साजरा करणे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.तमाम सावित्रीच्या लेकींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय नारी💪शक्ती!
लेखक – रणवीर राजपूत,ठाणे
गवर्नमेंट मिडिया,महाराष्ट्र शासन
………………………………………
मा.संपादक महोदय,
कृपया आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात सदर लेख ८ मार्च च्या अंकात प्रसिद्ध करावा,ही विनंती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत