महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ” ऐतिहासिक समज ” किती?

महाराष्ट्र हे देशातील आधुनिक विचारांचे राज्य म्हणून ओळखले जाते . या महाराष्ट्राची पहिली मोठी अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत. महाराष्ट्र म्हणजे शिवराष्ट्र असेच आम्ही मानतो. अशावेळी महाराष्ट्रातील एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला प्रश्न पडतोय की , महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक समज किती?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री… हे पद दुसऱ्या वेळी भूषवणाऱ्या व्यक्तीने किमान थोडी ऐतिहासिक समज बाळगावी अशी माझी इच्छा आहे. कालच त्यांनी वक्तव्य केलं की ” प्रशांत कोरटकर चिल्लर माणूस आहे , कारवाई होणार. पण पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकात शिवरायांच्या केलेल्या उल्लेखाचा तुम्ही निषेध करणार की नाही ? . महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरा नीट माहिती घेतली असती तर अधिक योग्य झाले असते. नेहरूंनी शिवरायांच्या केलेल्या उल्लेखाचा निषेध या महाराष्ट्राच्या भूमीवर त्याचवेळी झाला आहे. पण त्यांना हे ठाऊक असावे की हा निषेध ते ज्यांना पूजनीय मानतात त्या वि.दा. सावरकर यांनी केलेला नसून ” महाराष्ट्राचा प्रखर सत्यशोधक प्रबोधनकार ठाकरे” यांनी केला आहे. ” रायगडाची गर्जना – गुर्रर ढॉक ” ही छोटी पुस्तिका लिहून आणि त्याकाळातील इंग्रजी वर्तमानपत्रात लेख लिहून प्रबोधनकार ठाकरे यांनी ” शिवसन्मान” जपला होता. नेहरूंनी त्याचवेळी ” माझ्या अज्ञानातून ही चूक झाली , पुढील आवृत्तीत दुरुस्ती करेन ” असे जाहीरपणे सांगून दुरुस्ती केली.” महाराष्ट्राचा ठाकरे वाघ मेला नाही” अशी प्रबोधनकार ठाकरे यांनी तेव्हा गर्जना केली होती.स्वातंत्र्यपूर्व तो कालखंड होता. आणि स्वातंत्र्यनंतर देखील प्रतापगड शिवराय पुतळा उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्री नेहरू यांना विरोध केला तो सत्यशोधकांनीच. ही एवढी माहिती जाणून घेतल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री यांनी आपली ऐतिहासिक समज वाढवण्यासाठी काही प्रतिप्रश्न स्वतःला नक्की विचारावेत. नेहरूंनी शिवरायांच्या केलेल्या उल्लेखाचा सावरकरांनी अथवा संघीय विचारवंतांनी नेहरुंना जाब का विचारला नाही? ज्या नेहरूंविषयक निषेधाचा मुख्यमंत्र्यांनी सतत उल्लेख करतात ते स्वतः सावरकर व गोळवलकर यांचा निषेध कधी करणार ?या दोघांनी लिहिलेल्या लिखाणातून शिवनिंदा आणि शंभुनिंदा मुख्यमंत्र्यांना ठाऊक नाही काय ?नसेल तर संदर्भासहित सांगण्याची तयारी आहे. सध्याच्या प्रधानमंत्रीनी स्वतःच्या डोक्यावर शिवरायांची खास ओळख असणारा जिरेटोप प्रतिकृती चढवून घेतली किंवा शिवरायांच्या चित्रात बदल करून प्रधानमंत्री शिवराय म्हणून दाखवले जातात तेव्हा तुम्ही कधी साधा निषेध केल्याचे मला तरी आठवत नाही. तुम्हाला आठवतेय का ?
महाराष्ट्र नागरिकांनो , व्यक्तीव्देष अथवा विरोधी राजकीय मत यामुळे इथे मुख्यमंत्री यांना प्रशनांकीत करत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री हे पद वैयक्तिक नसून सार्वजनिक आहे याचे भान राखून त्यांच्या नावाचा उल्लेख देखील मी टाळलाय. महाराष्ट्राच्या आधुनिक विचारांची परंपरा जर त्यांना जपायला जमत नसेल तर त्यांनी जिभेला लगाम घालणे योग्य ठरेल. इतिहास हा वेगळा विषय आहे. त्यामधील तज्ञ लोकांची सहकार्य घेणे ही शिकवणी नक्की लावून घ्यावी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या सारख्या सर्वसामान्य महाराष्ट्र प्रेमी नागरिकांची हीच अपेक्षा की , कोरटकर , सोलापूरकर , आझमी असा कुणीही शिवराय द्वेषी असेल त्याच्यावर कारवाई करणे हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे. ते नीट पार पाडावे आणि मग भूतकाळात घडलेल्या घटनांची वाच्यता करण्याचा आणि त्याविषयी प्रश्न विचारण्याचा नैतिक हक्क कमवावा. तोपर्यंत तरी… ” महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक समज किती ? प्रश्न विचारावाच लागेल.
— उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत