पद्मश्री नामदेव ढसाळ !एक अजब रसायण !!

भल्या भल्यांना शेवटपर्यंत न समजलेला बाप माणूस !!!
या कफल्लक फकिराला भेटण्यासाठी अंधेरेतील लोखंडवाला काॅप्लेक्समधील घरी माझे साडभाऊ सुभाष लाठकरसोबत सुमारे अडीच दशकांपूर्वी गेलो होतो. आम्ही सकाळी 11:00 ला पोहचलो… चर्चा अडीचपर्यंत सुरु होती. त्याकाळी ते ‘सामना’मध्ये ‘समष्ठीसाठी’ या सदरात लेखन करत असत. मीही माझ्या तुटपुंज्या वृत्तपत्रीय लेखनाविषयी सांगण्याचं धाडस केलं. त्यावर दादा म्हणाले, जर तुला लिखाणाचं अंग आहेच तर लिही ना ‘सामना’साठी… खरं तर ‘सामना’साठी लिहिण्याचं निमंत्रण मला 30 वर्षांपूर्वीच आलं होतं. ‘सामना’च्या वतीने तत्कालिन उप संपादक प्रशांत वि. गौतम यांनी पत्र पाठवून मानधनही देऊ असं त्यात नमूद केलं होतं. पण दादांची उंची बघून मी मौन धारण केलं. याचा साधा उल्लेखही केला नाही. असो. दरम्यान अडीच वाजले… दादा म्हणाले, सागुती शिजल्याचा वास येत आहे…’व्याकरण’ समजून घेत आम्ही निरोप घेतला…
दुसरी आणि शेवटची भेट मुंबईतील ‘सह्याद्री’ वर झाली. माझे मित्र विजयकुमार सुखदेव यांनी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यवर ‘सारथी’ गौरवग्रंथ काढला होता. या गौरवग्रंथाचं प्रकाशन करायचं होतं. विजयकुमार यांची इच्छा होती, प्रकाशन तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व्हावे ! मी अतिथी संपादक असल्याने त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण त्यांचा वेळ मिळत नव्हता. शेवटी आम्ही Lifeline वापरली. केला फोन थेट दादांना…
ते म्हणाले, तिथेच थांबा. एका तासात पोहचतो…
काय फोनाफोनी झाली कल्पना नाही. गाडी येताच ‘सह्याद्री’चं दार उघडलं गेलं. दादा, कारमधून उतरले… व्हिलचेअर खाली आली… म्हणाले, चला पुढे… मी आलोच…
आम्ही वर गेलो…
लगेच ड्रायव्हरचा फोन आला… लवकर खाली या… दादांना अटॅक आलाय्… आम्ही लगेच खाली आलो… विजयकुमार ATM मधून पाच हजार काढून सोबतच्या कार्यकर्त्याजवळ दिले. या ‘श्रीमंत’ ‘फकिरा’पुढे नतमस्तक होऊन त्यांना जड अंतःकरणाने निरोप दिला. गाडी बाॅम्बे हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली. आम्ही हताश होऊन गाडी नजरेआड होईपर्यंत पाहात राहिलो…!
आज या भन्नाट माणसाचा स्मृतिदिन !
यारों का यार !
भावपूर्ण अभिवादन नामदेव नावाच्या अकाली शांत झालेल्या झंझावाताला…!!
🪷🙏🏼
@ भीमप्रकाश गायकवाड,
‘मूकनायक’,
रविराजपार्क,
परभणी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत