दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

1 जानेवारी 1818 च्या भीमा कोरेगाव लढाईचा युद्धधुरंदर, महापराक्रमी, रणझुंजार,सेनापती वीर शिदनाक


^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^•^
गेल्या काही दिवसापूर्वी मी आणि माझे सहकारी मित्र
आदर्श गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, विकास दळवी व नितीन काटे असे आम्ही मौजे कळंबी ता. मिरज जिं सांगली येथे वीर महायोद्धा शिदनाक यांचे थेट १२ वे वंशज आदरणीय मिलींदजी इनामदार यांचे भेटी साठी गेलो होतो.
ठरल्या प्रमाणे गाठभेट झाली. व चर्चेच्या ओघात मिलिंदजी इनामदार यांचे कडून रणझुंजार सेनापती वीर शिदनाक यांचे बाबत अनेक महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली.
इतिहासात अनेक शिदनाक होऊन गेले. काही अज्ञात राहिले मात्र काहींनी आपल्या पराक्रमाची मोहोर इतिहासावर उमटवली. त्यापैकी ज्ञात असलेले पहिले शिदनाक महार हे तेराव्या शतकातील बहामनी राज्यात सेनापती होते. तर इ.स.१६ व्या शतकात दुसऱ्या सिद्धनाक महार यांनी अहमदनगरच्या निजामशाहीकडून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावातील महार वतनाच्या इनामी जमिनीच्या सनदा आणल्या. या सरदार शिदनाक यांचे नातू असलेले तिसरे ज्ञात असलेल्या शिदनाक तथा शिदनाक बाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जावळीच्या चंद्रराव मोरे यांचा बिमोड करण्यास खुपच सहाय्य केले. किर्द दाट जंगलातून जावळीचा मार्ग दाखविला व झालेल्या लढाईत सहभागी होत चंद्रराव मोरे यांचा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा विश्वास संपादन केला व शाबासकी मिळवली. पुढे स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खान याच्या सैनिकांशी इशारा मिळताच प्रतापगडाच्या पायथ्याशी लढाई करून अनेकांना कंठस्नान घातले. व अफजल खाना समवेत आलेल्या व्यापाऱ्यांचा माल व धन ऐवज स्वराजासाठी जप्त केले. या सरदार शिदनाक बाजी यांचे पराक्रमी पुत्र कृष्णनाक हे वाई प्रांतातील कळक येथे मराठा- मोगल यांच्या लढाईत मराठ्यांकडून लढताना शाहिद झाले. यांचे वंशज (कांबळे) आज ही वेलंग ता. कोरेगाव जि. सातारा येथे वास्तव्यास आहेत तर ज्ञात असलेले चौथे शिदनाक हे विश्वासराव व सदाशिवराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सन १७६१ च्या पानिपत लढाईत सक्षम नेतृत्वाचा अभाव व ढिसाळ रणनीति मुळे त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. ज्ञात असलेले आणखी एक शिदनाक हे अत्यंत महापराक्रमी होते. छत्रपती संभाजी राजे यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज (दितीय) हे औरंगजेबाच्या कैदेत अनेक वर्षे होते. औरंगजेबाच्या मृत्युनंतर शिदनाक यांनी त्यांना मुक्त केले. छत्रपती शाहू महाराज हे स्वराजात दाखल झाले आणि स्वराज्य रक्षक ताराराणी व छत्रपती शाहू महाराज यांच्यात राजगादी वरून सन १७०७ मध्ये वाद सुरु झाला तेंव्हा सर्व मराठी सरदारा मध्ये फूट पडली. कुणी स्वराज्य रक्षक ताराराणी यांच्या गोटात तर कुणी छत्रपती शाहू महाराज यांच्या गोटात डेरेदाखल झाले. या वेळी सरदार शिदनाक यांनी अत्यंत निर्णायक अशी भुमिका घेत छत्रपती शाहू यांचा पक्ष घेतला छत्रपती शाहू महाराज यांची ताकद वाढली आणि या युद्धात छत्रपती शाहू महाराज हे जिंकले. पुढे दोन्ही बाजूने समझोता झाला व सातारा ही गादी छत्रपती शाहू महाराज यांचे कडेच राहिली तर ताराराणी यांना कोल्हापूरची गादी मिळाली. या सगळ्या घडामोडीने छत्रपती शाहू महाराज हे सरदार शिदनाक यांचेवर प्रचंड खुश झाले व पुढे याचे इनाम म्हणून सांगली जिल्हयातील कळंबी हे गाव व त्या गावची सुमारे ९०० एकर शिवारा सह वस्त्र,अलंकार.आभुषण व मस्तकी शिरपेच आणि पालखीचा बहुमान सरदार शिदनाक यांना दिला. त्या वेळे पासून कळंबी येथील शिदनाक यांच्या वंशजांना इनामदार (वाघमारे) याच नावाने संपुर्ण महाराष्ट्र ओळखतो.
या सरदार शिदनाक यांचे नातू म्हणजे महापराक्रमी, महायोद्धा वीर शिदनाक यांनी अनेक लढ्यात भाग घेत विजयश्री खेचून आणली.भीमा कोरेगाव च्या लढाई पुर्वी त्यांनी पेशव्यांसाठी खर्डी जि. (अहमदनगर) येथे मुगला विरुद्ध झालेली लढाई पेशव्यांना जिंकून दिली होती. पेशव्यांसाठी तळ हाती आपले शिर घेऊन लढणारा हा योद्धा भीमा कोरेगावच्या लढाईत पेशव्या विरुद्ध हाती तलवार घेऊन रणमैदानात का उतरला.???
याचे कारण पेशव्यांची तीव्र वर्णव्यवस्थावादी मनुमानसिकता
१३ जून १८१७ रोजी इंग्रजांनी बाजीराव पेशवे (द्वितीय) यांचे वर नवीन तह लादून त्याचे अधिकार अगदीच मर्यादित केले. शिवाय पेशवे व इंग्रजाच्या झालेल्या दुसऱ्या युद्धात इंग्रजांनी पेशव्यांना त्यांच्या पदरी आपली तैनाती फौज ठेवण्यास भाग पाडून पेशव्यांना इंग्रजाचे मांडलिकत्व स्विकारावे लागले. परिणामी पेशव्यांच्या दरबारी सर्वच्या सर्व मराठी सरदारांना इंग्रजा पुढे शरणागती पत्करावी लागली होती. त्यामुळे बाजीराव पेशवे हे सुडाने पेटले होते. इंग्रजा विरुद्ध कुठून आणि कशी लढाईला सुरुवात करावी, मोर्चेबांधणी करावी याचाच विचार करत होते.
१८१७ साली सातारा जिल्हयातील माहुली या गावातून युद्ध सुत्रे हलवू लागले सगळ्या सरदारांनी पुण्यात एकत्र जमावे असा निरोप धाडल्यामुळे १९ ऑक्टोंबर १८१७ सर्व सरदार पुण्यात एकत्र जमु लागले. २८ ऑक्टोंबर १८१७ पुण्यात इंग्रजाच्या छावणीवर मुंबईहुन इंग्रज अधिकारी व सैन्याची कुमक येण्या आधी अचानक हल्ला केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुळा मुठा नदीच्या संगम बेटावर हल्ला करून जाळपोळ केली.
३० ऑक्टोंबर १८१७ रोजी गणेश खिंडीवर हल्ला केला.
५ नोव्हेंबर १८१७ रोजी गणेश खिंडीच्या पुर्वेस असणाऱ्या खडकी च्या युद्धास सुरुवात झाली. या युद्धात पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांच्या नेतृत्वा खाली अनेक हल्ले केले मत्र ते हल्ले यशस्वी झाले नाही. जवळपास १ वर्ष इंग्रज व पेशवे यांच्यात युद्ध सुरु होते मात्र यात महार सैनिकाचा कुठलाच सुतराम संबंध नव्हता.
सरदार शिदनाक हे तर पेशव्यांसाठी नेहमीच लढाई करणारे होते. शिदनाक यांनी खर्डा येथे झालेल्या लढाईत अभूतपुर्व पराक्रम करीत स्वबळावर ही लढाई पेशव्यांना जिंकून दिली होती. इंग्रजाविरुद्ध निर्णायक लढाई करण्यासाठी बाजीराव पेशवे ( द्वितीय) हे खुपच उत्सुक होते. लढाईस अजून दोन दिवसचा अवधी होता. पेशव्यांनी इंग्रजाची चार ही बाजूने नाकेबंदी केली होती.
या होऊ घातलेल्या लढाईच्या अनुषंगाने वीर शिदनाक हे बाजीराव पेशव्यांना भेटावयास आले. त्यांनी आम्ही तुमच्या कडून लढाई लढतो असे सांगून उत्तराची वाट पाहू लागले.
वीर शिदनाक यांचे बरेचसे नातेवाईक हे इंग्रजाच्या फौजेत होते. हे बाजीराव पेशवे यांना ही माहित होते. म्हणून त्यांनी शिदनाक यांना उद्देशून म्हणाले की, तुम्हा लोकांना आमच्या बाजूने लढावेच लागेल ही धर्माज्ञा आहे. पण तुझे सगेसोयरे हे इंग्रजाच्या बाजूने आहेत. मग खडकी तळ हे सर झाल्यावर तुझ्या सग्यासोयऱ्यांचे आम्ही काय करावे.? या प्रशावर शिदनाक यांनी थेट उत्तर देण्याचे टाळून “श्रीमंतानी खडकी तळावर हल्ला करू नये, इंग्रजाचा खडकी तळ हा नेहमी युद्धाच्या तयारीत असतो खडकी तळावर इंग्रजांचा भरपूर दारु गोळ्यांचा साठा आहे आणि तिथे रात्रंदिवस जागत्या सैनिकांचा पहारा असतो.! “
असे म्हणाल्यावर बाजीराव म्हणाला की आम्ही तर जिंकल्यातच जमा आहोत तुझे सगे सोयरीक त्या तळावर आहेत त्यांचे मुडदे मी जवळून पाहणार आहे आणि ते जर यातून जगले वाचले तर त्यांच्या गळ्यात मडके बांधणार आहे ते मडके तुझ्या ही कामास येईल. हे ऐकून शिवनाक यांना खुप राग आला. मस्तकाची शीर भिनभिनायला लागली. अंगात रक्त उसळायला लागले. तरीही, त्याने एक आवंढा गिळला डोके शांत ठेवत शिदनाक पुढे म्हणाले की, आम्ही आजपर्यंत श्रीमंताच्याच बाजूने लढलो आहोत. आमी आज ही तुमच्या बाजूने लढू पण फतेह झाल्यावर श्रमित आम्हाला काय देणार.? आम्ही कुठे राहणार.? आमचे स्थान काय असणार.? या वर बाजीराव पेशवे हे रागाने लालबुंद झाले.
ते शिदनाक यांना म्हणाले की, “तुमचे स्थान होते तसेच राहिल. शास्त्रात जे काही लिहले आहे त्यात गुंज भर बदल होणार नाही.
तुम्हा महारांचे कामच हे आहे की, सांगितलेली कामे गपगुमानं करायची. आणि तसे काही केलं नाही तर तुमच्या बायका पोरांना हत्तीच्या पायी देऊन तुमचा शिरच्छेद करून त्याचा चेंडू बनवून गुलटेकडीच्या मैदानात आम्ही खेळ खेळू. आता माझ्या समोर थांबू नको नाही तर इथेच तुझा शिरच्छेद करेन.!”
तेंव्हा जास्त काही न बोलता स्वतःच्या तळावर रागाने आले. रागाने संपूर्ण अंग थरथरत होते. उसळत्या रक्ताने हात शिवशिवत होते. त्यांनी आपल्या साथीदारांना बोलावून हा घडलेला प्रसंग इत्यंभूत सांगितला व या पेशव्यांना त्यांच्या जातीचा आणि गादीचा माज आलेला आहे. आपण ही माणसंच आहोत. आपल्या वरचा दांडगाईने करत असलेला जुलूम कमी न करता हे उद्या आपल्या बायका पोरांना हत्तीच्या पायी देण्याचे सांगत आहेत. तेव्हा पेशवे संपलेच पाहिजेत. पेशवाई संपविण्यासाठी आपण मेलो तरी बेहत्तर. चला, उठा त्यांना त्यांची जागा दाखवू अशी गर्जना केली व आपल्या ५० जणांच्या तुकडी सह ते इंग्रज अधिकारी कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांची भेट घेऊन “आम्ही तुमच्या बाजूने लढतो आम्हाला काही नको पण आमच्या माणसांच्या गळ्यात त्यांनी जी मडकी बांधली आहेत ती सोडवा !” एवढी आणि एवढीच मागणी करून इंग्रजी फौजे समवेत भीमा कोरेगाव कडे वीर शिदनाक यांनी कूच केले.
भीमा कोरेगाव येथे पेशव्यांचे अमाप सैन्य पाहून आपल्या एवढ्या तुटपुंज्या सैन्याच्या जीवावर आपण कसे लढणार.?
असे हताश,निराश, हतबल व चिंताक्रांत झालेल्या कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांना महायोद्धा वीर शिवनाक यांनी सांगितले की, माघार घेऊ नका! आम्ही आहोत शेवटच्या श्वासापर्यंत लढू आमच्या वर विश्वास ठेवा.! असे म्हणत भीमा कोरेगावच्या रणमैदानात या रणझुंजार योद्ध्याने उडी घेतली. समोर येईल त्याला व दिसेल त्यास सपासप कापत रक्ताची रंगपंचमी खेळली.
वीर शिदनाक यांचे लढाऊ महार सैनिक व कॅप्टन स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली असलेली “महार” रेजिमेंट ने अकल्पीत, अचंबीत,
अवर्णनीय असा रक्तरंजीत अभुतपुर्व असा इतिहास भीमा नदी च्या तिरी १ जानेवारी १८१८ रोजी निर्माण केला. जुल्मी, अन्यायी, वर्णवर्चस्वविषमतावादी पेशवाई संपुष्टात आणली, नष्ट केली, नेस्तनाबूत केली.
महान वीर महायोद्धा वीर शिदनाक यांचा विजय असो !
भीमा कोरेगाव रणसंग्रामाचा विजय असो.!
वीर शिदनाक यांच्या जिगरबाज लढवय्या सैनिकांचा विजय असो.!
पहिल्या महार रेजिमेंटचा विजय असो !
भीमा कोरेगावचा विजयी जयस्तंभ हा शतकानुशतके दाबल्या गेलेल्या वर्गांच्या विद्रोहाचा अविष्कार आहे. शुद्रातिशुद वर्गाच्या पिढ्यानुपिढ्या साठीचे चिरंतन प्रेरणास्त्रोत आहे. महार जातीच्या गौरवाचे, अभिमानाचे, सन्मानाचे ते गौरवशाली प्रतिक आहे.
तर चला आपण जाऊया… त्या विजयी जयस्तंभाला निरखुन, डोळे भरून पाहुया, गर्वाने ताठ मानेने अभिवादन करुया….
तिथल्या भुमीला वंदन करुया, नतमस्तक होऊया….
जयभीम….! 🙏🏻
✍🏻 प्रकाश काले. अकलूज जि. सोलापूर
( वरील फोटोत भीमा कोरेगाव रणसंग्रामाचा लढवय्या महायोद्धा वीर शिदनाक यांचे स्मारक व त्या पुढे वीर शिदनाक यांचे थेट १२ वे वंशज मिलिंदजी इनामदार आणि मी व माझे सहकारी )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!