सर्वसामान्य दलित हवालदिल तर पुढारी आनंदात..!
‘अघोरी मेजॉरीटीने’ RSS/भाजपाने महाराष्ट्रात भक्कमपणे पाय रोवलेत.
2014 साली हुकुमशाहीची लागलेली चाहूल 2019 पर्यंत दारात येवून ठेपली अन आता तिने घरात मजबुत पाय रोवले आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही इत्तर राज्यांपेक्षा निश्चितपणे वेगळी असते कारण या राज्याचे महत्व छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा जोतीराव-क्रांतीज्योत सावित्रीमाई, शाहू महाराज, बाबासाहेब, प्रबोधनकार, अण्णाभाऊ यांनी संबंध देशाला दिलेल्या पुरोगामीत्वाच्या धड्यामुळे तर निश्चितच आहे पण या राज्यात देशाची आर्थिक राजधानी असल्याने याचे महत्व द्विगुणित झालेलं आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीला महाराष्ट्रापासून तोडण्याचं, अगदी सुरुवातीपासूनचं कारस्थान महायुती सरकारच्या कारकिर्दीत पूर्णत्वास नेलंच होतं.. त्यावर आता या निकालाने ठसठशीत शिक्कामोर्तब केलंय. देशातील इतर कुठल्याही राज्यातून नव्हेतर, फक्त गुजरात (अहमदाबाद) पासून मुंबईत ‘बुलेट ट्रेन’ दौडविण्याचा उपक्रम, धारावीसह अख्खी मुंबई अदाणीला आंदण, हे त्या विस्तृत अशा कारस्थानाचाच एक मामूली नमुना.
मुंबई एयरपोर्टच्या शासकीय जमिनीवर गेली 50-60 वर्षांपासून प्रामुख्यानं राहणारे दलित, यांनी राम-डासच्या दाढीला वा प्रकाश आंबेडकराच्या आडनावाला भाळून किंचितसं मतदान थेट वा आडवाटेनं RSS/भाजपाला केलं असेलही पण ही संख्या, मुंबईत तर माझ्या मते नगण्य असणार..असो
मूळ मुद्दा हा आहे की RSS/भाजपाला मिळालेल्या या ‘अघोरी मताधिक्याने’ सर्वसामान्य ‘दलित’ हवालदिल झालाय तर दलित पुढारी मात्र आनंदात आहेत ते कसं पाहूया:
राम-डास: याने या निवडणुकीत जाम स्वाभिमानी ‘तेवर’ दाखविले.. भाजपाने आम्हाला ‘जागा’ दिली नाहीतर आम्ही वेगळी वाट धरू असं काहीबाही बरळला.. RSS/भाजपाने कलिना मतदारसंघ राम-डास RPI ला सोडला खरा मात्र एका अटीवर… उमेदवार भाजपाचा असणार अन निवडणूक चिन्ह देखील भाजपाचेच .. अर्थात अशा स्थितीत तो उमेदवार राम-डास रिपाईचा कसा हा विचार करण्याच्या भानगडीत ना राम-डास पडला ना त्याचा राईट हँड अविनाश ~कांबळे~ महातेकर ना रिपाई (राम-डास) ला मानणारे गल्लीबोळातील कार्यकर्ते. कलिनातील आपला उमेदवार पडून देखील ‘राम-डास’ खुष आहे कारण त्यानं त्याच्या पद्धतीनं दलित मतं उमेदवाराकडं वळवली.. दलितांच्या पट्यात त्याच्या उमेदवाराला बर्यापैकी मतं मिळालीत. अन मुख्य म्हणजे राम-डासचा मूळ मालक/पक्ष जिंकलाय.. आपल्या पोराच्या पुढिल आयुष्याची सोय करण्याची संधी राहिली.. अविनाश ~कांबळे~ महातेकर खुश आहे कारण राम-डासच्या पोरासोबत आपल्यालाही ‘फूल न फुलाची पाकळी’ मिळणारच हे त्याच गणित…
कवाडे/कुंभारे: फडणवीस ने उमेदवारी अर्ज भरतांना संविधान चौकात जी बाबासाहेबांची ‘विटंबना’ केली, त्याबद्दल विदर्भातील सुजाण दलितांनी कवाडे-कुंभारे वर जोरदार हल्लाबोल केला होता… कवाडे/कुंभारे या समजुतीने खुश आहेत की फडणवीस जिंकल्याने, त्यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या दलितांची ‘चांगलीच जिरली’.. कफन रूपी शालचे भिक्षापात्र बनवुन कवाडे आता ऐटीत आपल्या पोराची सेटिंग करायला मोकळा…
प्रकाश आंबेडकर: एकदम ‘निस्वार्थ’ व्यक्ति. याला काळजी एव्हढीच लागली होती की काँग्रेस आल्याने SC/ST/OBC आरक्षण संपणार अन शरद पवार आल्याने मुंबईत ‘गैंगवार’ सुरू होणार…कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार वगैरे वगैरे .. एव्हढी माफक इच्छा असणारे प्रकाश आंबेडकर आनंदात आहेत कारण काँग्रेस व ‘शरद पवार राष्ट्रवादी’ निवडून आली नाही..
गवई: बाबासाहेबांचा मूळ ‘रिपाई’ माझ्याच बापाच्या मालकीचा अशा गुर्मीत वावरणारा ‘गवई’ नक्की कुठाय हे त्याच्या ‘जज’ भावाला देखील माहित नसणार… पण सध्या त्याचा काहीच फारसा ‘गाजावाजा’ नसल्यामुळे तो खुशीतच असणार असं गृहित धरण्यास हरकत नाही.. कदाचित, भाजपा फुल्ल मेजॉरीटीने आल्यामुळे आपला ‘पार्किंग’चा चिघळलेला प्रश्न आता हमखास सुटणार म्हणूनही तो आनंदात असू शकतो..
प्रागतिकचे काही होतकरू उमेदवार: आम्हाला महाविकास आघाडीने उमेदवारी नाही दिली…आम्हाला ‘फॉर ग्रांन्टेड’ अर्थात हलक्यात घेतलं ना..भोगा आता फळं..
अर्थात वरील दलित पुढाऱ्यांची वरील अवस्था मी माझ्या बुद्धिला पटण्यासारखी मांडलीय. यात काही चूक असेल तर त्यांचे ‘भक्त-कार्यकर्ते’ पुराव्यानिशी सिद्ध करतीलच की RSS/भाजपाला मिळालेल्या ‘अघोरी मताधिक्याने’ त्यांचे ‘नेते’ आनंदात नाही…तर ‘दुःखी’ आहेत….!
मिलिंद भवार
पँथर्स
9833830029
23 नोव्हेंबर 2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत