लोकशाहीचे उद्दिष्ट काय ?
प्रा रण जी जीत मेश्राम
आपण सांसदीय लोकशाही (Parliamentary Democracy) स्वीकारली. ते खरंय. पण आज तिचे नक्की उद्दिष्ट (Purpose) काय? सारे स्वैर दिसते. यावर फारशी चर्चाही नाही. रचना वा स्वरुप (Format) यावरच चर्चा असते.
घोर कष्टातून स्वातंत्र्य मिळाले. ते कशासाठी मिळविले ? इंग्रज नको. आमच्याच लोकांनी आमच्यावर राज्य करावे. पण, ते कशासाठी ? स्पष्ट व्हायला हवे.
उद्दिष्टविहिन राज्यशासन, आतून विभागलेले घर ठरावे. फार तग धरेल काय ? विचार व्हावा.
आधी लोक कल्याण (Public Welfare) हे लोकशाहीचे उद्दिष्ट नमूद होई. कल्याणकारी राज्य (Welfare State) सांगितले जाई. आता ते अपवादानेही ऐकू येत नाही. निवडणुका येतात. होतात. सरकार येत राहते.
शांततेने निवडणुका पार पडणे. यालाच सफल लोकशाही सांगितले जाते. इथेही हजार शंका निर्माण झाल्या आहेत. मात्र, लोककल्याणाचा पत्ता नाही. सर्व स्तरावरील विषमता थैमान घालते आहे. अक्षरशः जीवघेणी विसंगती निर्माण झाली आहे.
अलीकडे गरीबी स्वीकारोक्त झाली की काय ? काळजी वाटते.
ही कशी लोकशाही ? 'लोकांचे सरकार, लोकांनी नियुक्त केलेले सरकार आणि लोकांकरिता राबणारे सरकार' (A Government of the people, by the people and for the people) असे सांगितले जाई. 'चर्चेवर आधारलेली शासनसंस्था' (Government by discussion) असेही सांगितले गेले. संविधानकारांनी तर, 'रक्ताचा थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी शासनपध्दती म्हणजे लोकशाही' असे सांगितले.
पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही. उलट चाललेले दिसते. लोकशाही ही सण, उत्सव झाली की काय ? पाच वर्षातून एकदा येणारी प्रथा, परंपरा असेअसेच दिसतेय. दूरच्या स्वप्नात जे आहे ते जमिनीवर कमी आलेले दिसतेय.
आपल्या सांसदीय लोकशाहीचा सरळ संबंध संविधानाशी येतो. ती संविधानाला पूर्ण बांधील आहे. असे असले तरी दोन्हींचे कर्तेपण माणसाच्या हाती असते. हा माणूस कसा हे महत्त्वाचे झालेय. विश्लेषण तसे जायला हवे. बंद वाटा मोकळ्या होत जातील.
बेइमानी मनात असलेले लोक ईमान देतील काय ? लोककल्याण नावाचे उद्दिष्ट दूर कुठे अंथरुणात रडत, कण्हत पडलेले दिसेल.
आम्ही भारताचे लोक ( We the people of India) म्हणजे काय ? जर भारतीय लोक मधील ९० टक्के लोक निर्णय प्रक्रियेत शून्यवत असतील तर लोकशाहीची यशस्वीता कशात ? या देशाला मुठभरांनी खंडीभरांवर वर्षोनुवर्षे राज्य केल्याचा इतिहास आहे.ती धर्मशाही होती. अर्थात इतिहास हे नेहमीच उदाहरणासाठी नसते. ती धोक्याची सूचनाही असते. सध्याची लोकशाही मनाने नव्या वेष्टणात तशीच येते की काय ?
व्यवस्थेच्या विरोधात असणे व परिस्थिती वा परिणामाच्या विरुद्ध असणे यात फरक आहे. इथे प्रासंगिकतेसह स्पष्ट ध्येयतेची गरज आहे. लोकशाहीच्या स्पष्ट उद्दिष्टाची मागणी करावी लागेल. आम्हाला समानता हवी. आम्हाला समभागही हवा. (We want equality. We want equity also.) नारा द्यावा लागेल.
समुच्चयाला निश्चयाशी जोडावे लागेल.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत