आंबेडकरवादी लोकांनो, चला डिजे लावून नाचू या…..
आज राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.
सकाळीच बातम्या पाहात असताना निकाल काय लागणार हे स्पष्ट झाले होते, पण मनात एक भाबडी आशा होती की निदान आपली ५ ते १० माणसे निवडून आले तर फार बरे होईल, मग ती वंचित आघाडी ची असोत, किंवा बसपा ची असोत. पण सर्व आशा फोल ठरल्या अन् आंबेडकरी चळवळ धारातीर्थी पडलेले विदारक चित्र टिव्ही वर पाहिले. पुढें काय दिसणार आहे यांचे स्वारस्य क्षणात विरून गेले, मन खिन्न आणि अस्वस्थ झाले. बातम्या बंद करून बाबासाहेबांची गणी लावून मनाला दिलासा देण्याचाही प्रयतन केला, पण मनातील तडफड काय स्वस्थ बसू देईना.
महायुतीला पाशवी बहुमत कसे मिळाले, अन् तकलादू महविकास आघाडी कशी चारी मुंड्या चीत झाली यांची आता सविस्तर चर्चा होईलच पण आंबेडकरी चळवळींची आपल्याच लोकांनी केलेली माती हा विषय मनाला भेडसावत आहे.
ही निवडणुक नव्हती तर पैशाच्या जोरावर राज्यांतील जनतेला विकत घेण्याचे, ईव्हीएम व्दारे लोकशाहीवर बलात्कार करण्याचे सरकारी यंत्रणांचे षडयंत्र होते हे सर्वश्रुत आहे. तरीही या पापात आपला समाज भागीदार झाला होता हे ही मान्य करावे लागेल.
आता पुढें काय वाढून ठेवले आहे याची कल्पनाही करवत नाही.
मतदानाच्या निमित्ताने सोलापूरला गेलो होतो, अन् त्यादिवशी चळवळीचे किती अधःपतन झाले आहे हे डोळ्याने पाहिले. कधीकाळी काँग्रेस चे लोक आमच्या प्रभागात पाय ठेवायला घाबरायचे, अगदीं दगडु शिंदे सुद्धा, पण ते दिवस केव्हाच लोप पावले, पोटाला चिमटा घेउन स्वखर्चाने आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणारे लोक वस्तीतून हद्दपार झाले आहेत तर पोटभरू, गल्लाभरू लांडग्यांच्या फौजा नारंगी किड्यांना सोबत घेउन सर्वत्र फिरताना दिसल्या. पूर्ण राज्यात आपल्या वस्त्यात हा महारोग वेगाने पसरला आहे. आपल्या उद्धारकर्त्या बापाचे पांग समाजाने असे फेडावे यासारखे बापाचे दुर्दैव नाहीं.
ज्यादिवशी माझ्या समाजाला मताची किंमत कळेल, त्यादिवशी तुमच्यासारखा भिकारी कुणीही नसेल असे काँग्रेस च्या लोकांना बाबासाहेबांनी ठणकावले होते. त्यांना काय माहित, पुढे जाऊन हा समाज स्वतःच्या मताचा अशा निर्लज्ज बाजार मांडणार आहे म्हणून.
या अवस्थेला बऱ्याच अंशी आपले सैरभैर झालेले नेतृत्व, अस्तित्वहीन, अस्मिताहिन, कणाहिन वारेमाप गट तट जबाबदार असले तरी समाज ही पुरता विकाऊ झाला आहे हे ही अधोरेखीत झाले. समाजाला आरक्षणातील वर्गीकरण, क्रिमी लेअर, एका पिढी पुरतेच आरक्षण हे सर्व मान्य आहे, विद्यार्थ्यांची होणारी, अडवणूक, छळवणूक, ग्रामीण भागात वाढलेले अत्याचार, बेरोजगारी, महागाई आपलीसी वाटू लागली आहे हाच त्याचा अर्थ आहे.
उठ रही है हर नजर खरीदार की तरह,
हम भी खडे हैं गुनहगार की तरह,
बस्ती दिख रही है बाजार की तरह…
” जा आणि घराच्या भिंतीवर हे लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे” हा मंत्र पदोपदी घोकणारे लोकच आता प्रस्थापितांची पालखी वाहणारी, त्यांची पोषणकर्ती जमात होऊन, शत्रुची चाकरी अगदीं इमान इतबारे करत आहेत.
माता रमाईच्या त्यागापेक्षा भाड खाऊ लोकांनी दिलेली दरमहा १५०० रुपयाची लाच वरचढ ठरली आहे.
त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस अगदीं बेभान होऊन नाचण्याचा आहे, गेल्या ८-१० दिवसात त्यांनी केलेल्या कष्टाचे आज चीज झाले, आंबेडकरी चळवळीची दैना झाली तर होऊ दे, पण पेशवाईचा पाया मजबुत करण्याचे सत्कार्य तुम्ही पार पाडले आहे, तुमच्या नव्या बापांची सत्ता आता आली आहे, पैशाची, लाचारीची झिंग उतरली असेल तर उतारा म्हणून परत त्यांनी बापापुढे हात पसरावेत, अन् आपल्या वस्तीत त्यांची वरात काढावी, अन् येणाऱ्या विनाशाचे डीजे लावून स्वागत करावे, एका हातात तूमच्या नव्या बापाचा झेंडा तर दुसऱ्या हातात निळा झेंडा (नाईलाज म्हणून)
चळवळीला पाताळात घेउन गेल्याबद्दल अशा छटाक, अर्धा किलो, एक किलो वजनाच्या तम्माम दलाल लोकांचा गल्लोगल्ली सत्कार झाला पाहिजे.
तूर्तास इतकेच…
नागभूषण बनसोडे
सोलापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत