
…… उज्वला गणवीर
आज सकाळचा पहिला चित्रपट शो “छावा” बघितला. चित्रपट चांगला बनवला आहे. बघावा असा आहे. चित्रपटात काही कमी अथवा काही जास्त असणारच शेवटी ही कलाकृती आहे.
चित्रपटात काय सत्य काय खोटे या भानगडीत न पडता बघितला. या चित्रपटातील संभाजी महाराज व येसूबाई यांचा एक संवाद अतिशय मनाला भिडला. संभाजी महाराज येसूबाई ला विचारतात “आईसाहेब कैसे होगी? मुझे तो पता ही नही कैसी होगी आई साहेब?” यावर येसूबाई प्रेमाने आणि आदराने म्हणते,” हम कैसे बता सकते है, जिन्हे आप नही देख सकते? हम यही चाहते है की आप हमारे कोख से जन्म ले और हम आपकी माँ बनकर आपकी आईसाहेब की कमी पुरी करे।” जबरदस्त काळजाचे काळजापर्यतचे तार जोडलेले दिसले.
चित्रपटात अनेक चांगले दृश्य दाखवले आहेत. एखादा चांगला विचार किंवा सत्ता कशी विस्कटल्या जाते याचे हुबेहूब चित्रण या चित्रपटात केले गेले.
औरंगजेब सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करीत असतो त्याला यश मिळत नाही शेवटी तोडफोडीचे राजकारण करतो आणि सभाजी महाराजांना बंदिस्त करतो. संभाजी महारांच्या शिलेदारांपैकी अनेक शिलेदार औरंगजेबाच्या तंबूत जातात व समर्थन करतात त्यांना सत्तेची लालच दिल्या जाते. खुद्द संभाजी महाराजांचे मेव्हणे मुगलांच्या तंबूत गेलेले दाखवले आहे. ते स्वतःचे भले करण्याच्या नादात सर्व गुप्त रस्ते, बाबी, यांची माहिती त्यांना सांगतात व मराठे सैनिक अक्षरशः मुंग्या पाखरांसारखे युद्धात मरतात. हे सर्व कोणत्याही गुन्ह्याचे गुन्हेगार नसतात केवळ राज्याचे हितकर्ते असतात.
आजची परिस्थिती तेव्हाच्या परिस्थिती पेक्षा काही वेगळी नाही. आजही आमच्या आंबेडकरवादी राजकारणातील अनेक नेते भाजपच्या तंबूत गेले आहेत व स्वतःच्या स्वार्थासाठी निष्पाप जनतेचा गळा घोटत आहेत. सत्तेची आणि राजकारणाची लालच त्यांना स्वस्थ बसू देत नाही. तत्वांना तिलांजली देत विरोधी विचारांच्या लोकांना समर्थन देत आहेत . जो समाज वर्षोवर्षे छळ सहन केला तो समाज आता थोडे बरे दिवस दिवस दिसायला लागले असतांना संपतांना दिसत आहे.
या चित्रपटाच्या अनुसंघाणे तरी घुसखोरांनी, हेरगिरी करणाऱ्यांनी सावध व्हावे. तुम्ही तर संपणार आहेत सोबत हा समाज सुद्धा संपवणारे तुम्हीच असणार आहेत. आम्ही घाबरणारे किंवा डरपोक लोक नाहीत. आम्ही घाबरत नाही म्हणून आम्हाला घाबरवण्याचे कारस्थान सुरू आहे, जेणेकरून आमची हिम्मत कमजोर होईल
जिसके जिगर मे डर नही होता असे तडपा-तडपा कर मारते है।
सावध व्हा…
आमच्या साठी डॉ बाबासाहेब शेर आहेत आणि आम्ही त्यांची लेकरं छावा. काय सत्य काय असत्य, इतिहास काय सांगतो याचा विचार न करता या छावा च्या निमित्ताने एकच वाटते.
या छावांनो….
परत कळपात या!!!
कळप तुटण्याच्या आधी
सावरण्यास हात द्या!!!
उज्वला गणवीर
नागपूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत