आकड्यांचे सरकार
महायुती सरकारकडून ज्या मोठमोठ्या घोषणा, योजना आणि विकासनिधींची आकडेवारी जाहीर केली गेली त्यामागे जनतेचा विकास, जनतेबद्दल तळमळ इत्यादी काहीही नसून आपण मोठा आटापिटा करुन बनवलेले सरकार किती चांगले आहे हे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती उध्वस्त करुन बनलेल्या या सरकारातील पक्षांनी त्यांचा जनाधार गमावला आहे. जनाधार गमावलेले महायुतीतील पक्ष व नेते भयगंडाने ग्रासलेले आहेत. जशाजशा निवडणूका नजीक येत होत्या तशीतशी त्यांची धास्ती वाढत होती. अशा भयग्रस्त परिस्थितीत जगणारी माणसं स्वत:लाच धीर देण्यासाठी सतत काहीतरी खटपट करीत असतात. या खटपटीचाच भाग म्हणजे महायुती सरकारच्या वतीने धडाक्यात वाटली जात असलेली घोषणा, योजना आणि आकडेवारींची खैरात! महाराष्ट्रातले महायुतीचे सरकार दिल्लीत बसलेल्या दोन गुजरात्यांच्या इशाऱ्याने चालवले गेल्याने त्या दोन गुजरात्यांचा ‘व्यापारी फॉर्म्युला’ इथे वापरला गेला आहे. ‘ढवळ्या संगं पवळ्या बसला, वाण नाही पण गुण लागलं’ अशी मराठीत म्हण आहे. खोके मिळवण्यासाठी आणि मिळवलेले खोके वाचवण्यासाठी दोन व्यापारी गुजरात्यांच्या भजनी लागलेले महाराष्ट्रातील नेतेही व्यापारी मनोवृत्तीने पछाडले आहेत. म्हणूनच जनतेच्या नाराजीची झीज आकड्यांनी भरुन काढता येईल असे यांना वाटत आहे. पण हा महाराष्ट्र आहे. संस्कृती, सभ्यता, विचार, भावना या सगळ्यांना इथे पैशाने खरेदी करता येणार नाही. इथे आई-वडिलांच्या सेवेत तल्लीन झालेला पुत्र प्रत्यक्ष भगवंताला वीटेवर उभा करुन वाट पहायला लावतो. इथे शोषणमुक्तीचा मार्ग पत्करणारा तुकोब्बा सावकारी सोडून देवून कर्ज दिलेल्या लिखापडी इंद्रायणीत बुडवतो. इथे स्वराज्यासाठी सहा बलाढ्य शाह्यांशी लढत देणाऱ्या मावळ्याचा चिमुरडा पोरगाही ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राईराई एवढ्या’ अशी डरकाळी फोडतो. इथे तत्वासाठी कायदा मंत्रीपदाला लाथ मारणारे डॉ. बाबासाहेब, मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’ पक्ष आणि विचारनिष्ठेसाठी झिडकारणारे भाई उद्धवराव यांचे संस्कार जनतेवर आहेत. इथे शेणफेक झेलून बहुजनांची लेकरं ज्ञानवंत करणारे फुले दांपत्य आणि चिरागनगरच्या झोपडीत राहून क्रांतीची चिराग पेटवणारे आण्णाभाऊ साठे झाले आहेत.
त्यामूळे घोषणांचे, योजनांचे आणि मोठमोठ्या आकड्यांचे आमीष दाखवून जनतेची नाराजी आपण घालवू शकू अशा ठार गैरासमजात महायुतीतील जे पक्ष व नेते आहेत तो गैरसमज इथली जनता निश्चितच दूर करेल. महायुती सरकारने विकास निधीच्या फुगवलेल्या आकड्यांची हवा जनता निवडणूकांत निश्चित काढेल याबद्दल तिळमात्र शंका नाही.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)
(लेख यापूर्वीच दि.१४/१०/२०२३ रोजी लिहून फेसबूकद्वारे प्रसारित केलेला आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तो पुन्हा प्रसारित करीत आहे.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत