देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

आरक्षण प्रमाणपत्रांचा महाघोटाळा :दलितांच्या राजकीय हक्कावर दरोडा टाकण्याची तयारी

(संदर्भ : माळशिरस मतदारसंघ)

दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या अनुसूचीत जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून उत्तमराव जानकर पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समजल्यामुळे मी एक पोस्ट बनवली होती. या पोस्टच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर उलट सुलट चर्चा झाली. मातंग समाजा बरोबरच बौद्ध, चर्मकार व होलार समाजातूनही अनेक जणांनी माझ्याशी संपर्क साधला. या संपूर्ण चर्चेतून दलितांचे राजकीय हक्क ओरबडण्याचे पद्धतशीर प्रयत्न कशा पद्धतीने सुरू आहेत याची धक्कादायक माहिती समोर आली. छत्रपती शिवाजी महाराज – महात्मा फुले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेत काही मंडळी अनुसूचीत जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील समाजाचे राजकीय हक्क मिळवण्यासाठी कशा पद्धतीने प्रस्थापित राजकारण्यांवर दबाव आणत आहेत हे यातून स्पष्ट झाले आहे.
एक गोष्ट सत्य आहे की, मराठा, धनगर, वंजारी, माळी या समाजामध्ये गरीब लोक आहेतच पण धनवान व जमीनदार लोकांची संख्या सुद्धा मोठी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत तर हा समाज राजकारणामध्ये किती प्रभावी आहे हे महाराष्ट्र जाणतो. राजकारण किती महत्त्वाचे आहे याची पूर्णपणे जाणीव असलेले हे समाज असून कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या जातीतील लोक मोठ्या प्रमाणावर करीत असतात. अर्थात यामध्ये काही गैर आहे असे अजिबात नाही.
परंतु आपले राजकीय हक्क मिळवत असताना इतरांच्या हक्कावर गदा आणणे, त्यातही मागासवर्गीय दलितांच्या हक्कावर गदा आणणे, त्यांचे राजकीय हक्क हिसकावून घेणे आणि त्यासाठी खोट्या आरक्षण प्रमाणपत्रांचा आधार घेणे या गोष्टींचे प्रमाण सध्या महाराष्ट्रामध्ये वाढले आहे. महाराष्ट्रातील काही धनदांडग्या जाती तर अनुसूचीत जाती आणि जमातींच्या राजकीय हक्कावर अक्षरशः टपून बसल्या आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातून लिंगायत समाजाच्या एका स्वामीने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घेऊन लोकसभा लढवली. त्या मतदारसंघांमध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या मोठी असल्यामुळे त्या जातीने आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान केले व त्या लिंगायत स्वामीला मागासवर्गीयांच्या राखीव जागेवरून निवडून आणले. पुढे ती केस कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टात ते प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, त्या लिंगायत स्वामीने मात्र आपले संसदेतील राजकारण पाच वर्ष एन्जॉय केले. म्हणजेच या लिंगायत स्वामीने खऱ्याखुऱ्या दलितांचे राजकीय हक्कावर अक्षरशः दरोडा टाकला होता.
काल परवाच झालेल्या, 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून डॉ. शिवाजी कोळगे या लिंगायत माणसाला काँग्रेसने लोकसभेला उमेदवारी दिली. लातूर जिल्ह्यातही लिंगायत जातीची लोकसंख्या मोठी असल्यामुळे डॉ. शिवाजीराव कोळगे खासदार झाले. डॉ. शिवाजी कोळगे हे लिंगायत आहेत. ते जंगम आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला आणि लातूरला माहित आहे. परंतु केवळ उचापती करून अनुसूचित जातीचे मागासवर्गीय आरक्षण प्रमाणपत्र घेऊन या माणसाने दलितांच्या राजकीय हक्काची जागा बळकावली आणि मागासवर्गीयांच्या हक्काच्या जागेवर डॉ. कोळगे हा जातदांडगा आणि धनदांडगा माणूस जाऊन बसला आहे. लातूर मधील आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांना ही गोष्ट माहीत असूनही मागासवर्गीयाच्या राजकीय हक्कावर कोणताही काँग्रेस पुढारी बोलत नाहीत, बोलला नाही. यावेळी, दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीने या खोट्या आरक्षण प्रमाणपत्राच्या आधारावर दलितांचे राजकीय हक्क हिरावून घेणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांवर सडकून टीका केली होती. एवढेच नाही तर, पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक दिवसाचे “आत्मक्लेष” आंदोलन ही केले होते.
पुन्हा हे सर्व संदर्भ देण्याचे कारण एकच की, आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. आणि मागासवर्गीयांच्या जागेवर डल्ला मारण्यासाठी पुन्हा एकदा काही जात दांडगे आणि धन दांडगे लोक टपून बसले आहेत. त्यातलीच एक जागा आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघ.
या मतदारसंघांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घराण्याचा विलक्षण प्रभाव आहे. मराठा आणि धनगर समाजाची लोकसंख्याही तुल्यबळ आहे. विजय दादा मोहिते पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी धनगर समाजातील काही मंडळींनी आपल्या जातीचे कार्ड वापरून राजकारण सुरू केले. त्यातूनच उत्तम जानकर हे धनगर समाजातून पुढे आलेले नेतृत्व आहे. उत्तम जानकर यांनी दलित मागासवर्गीयांना सोबत घेऊन विजयसिंह मोहिते पाटील यांना मोठे राजकीय आव्हान दिले आणि त्यात ते यशस्वीही झाले. माळशिरस पंचायत समिती दहा वर्ष त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवली होती. माळशिरस मध्ये उत्तम जानकर यांनी साखर कारखाना स्थापन केला आणि आपले आर्थिक साम्राज्य ही उभे केले. जात लोकसंख्येचे बळ आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर वाटेल ते करून आमदार व्हायचे असा चंग उत्तम जानकर यांनी बांधला होता. परंतु 2009 मध्ये माळशिरस मतदारसंघ राखीव झाला आणि उत्तम जानकर या धनगर नेत्याच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. आता वीस पंचवीस वर्षे आपल्याला आमदार होता येणार नाही असा विचार करत असतानाच त्यांना एक नवा पर्याय सापडला आणि तो पर्याय म्हणजे खोटे मागासवर्गीयांचे जात प्रमाणपत्र मिळवण्याचा पर्याय.
उत्तम जानकर यांनी कामाला सुरुवात केली. आपले आजोबा हे मांस कटिंगचा व्यवसाय करीत होते असे काही दाखले निर्माण करून या हुशार जानकार नेत्याने अत्यंत शांतपणे “हिंदू – खाटीक” असल्याचे प्रमाणपत्र मिळविले आणि 2014 च्या निवडणुकीत त्यांनी हनुमंत डोळस यांच्या विरोधात मागासवर्गीयांच्या राखीव जागेवर आपला अर्ज देखील भरला. परंतु हायकोर्टामध्ये उत्तम जानकरचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले. मग उत्तम जानकर यांनी एका मातंग समाजातील माणसाला उमेदवारी दिली आणि त्याला हनुमंत डोळस याच्याविरुद्ध उभे केले. उत्तम जानकर पुरस्कृत मातंग समाजातील या उमेदवाराला एक लाख मते मिळाली. अर्थात यावरून धनगर समाजाची लोकसंख्या या मतदारसंघात किती आहे तसेच राजकीय दृष्ट्या धनगर समाज किती संघटित आहे याचा अंदाज येऊ शकतो. एवढेच नाही तर, धनगर समाज राजकीय हक्कांसाठी किंवा आपल्या जातीसाठी किती पद्धतशीर वाटचाल करीत आहेत याच्यावर ही प्रकाश पडतो.
2019 च्या निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने राम सातपुते या बीड जिल्ह्यातील आरएसएसच्या चर्मकार समाजातील कार्यकर्त्याला माळशिरस मधून उमेदवारी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा जबरदस्त नेता आणि विजय दादांची साथ यामुळे राम सातपुते माळशिरस मधून विजयी झाले. हनुमंत डोळस दोन वेळा आणि राम सातपुते एक वेळा असे सलग तीन वेळा चर्मकार समाजाची व्यक्ती माळशिरस मधून आमदार झाली. ( मान महार या समाजातील कार्यकर्त्याची विजय दादांना यावेळी आठवण झाली नाही.) परंतु, शेवटच्या काही दिवसांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यामध्ये मतभेदाची लागण सुरू झाली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघ राखीव असल्यामुळे आणि उत्तम जानकर यांनी हिंदू खाटीक असे बनावट जात प्रमाणपत्र मिळवल्यामुळे सोलापुरातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घ्यायची असा त्यांनी प्रयत्न सुरू केला आणि तशा पद्धतीने सोलापूर मतदारसंघांमध्ये चाचपणीही सुरू केली. भाजपातील काही मंडळींनी ही त्यांना साथ केली होती. उत्तम जानकर यांच्या आशा पल्लवीत झालेल्या होत्या. सोलापुरातून मागासवर्गीयांच्या जागेवर बनावट प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुकीला उभे राहून आता खासदार होण्याचे स्वप्न उत्तम जानकर बघत होते. परंतु अचानक भारतीय जनता पक्षाने राम सातपुते यांची उमेदवारी सोलापूर राखीव मधून फायनल केली.उत्तम जानकारांचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले. यावर मात्र त्यांनी अत्यंत जबरदस्त असा राजकीय डाव टाकला. त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ज्यांच्या विरोधात त्यांनी आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले. त्या मोहिते पाटील घराण्याबरोबर तडजोड करण्याचा निर्णय घेतला. उत्तम जानकारांच्या माध्यमातून धनगरांची शक्ती पाठीशी उभे राहतेय म्हटल्यानंतर विजय दादांनी हा प्रस्ताव मान्य केला. मराठा व धनगर समाजाच्या बळावर धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा मतदारसंघातून खासदार बनविण्यात आले. उत्तम जानकर यांचे अर्धे राजकारण यशस्वी झाले होते.
आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, माळशिरस येथील जागेवर उत्तम जानकर पुन्हा एकदा आमदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत. अर्थातच त्यासाठी मागासवर्गीयांच्या राजकीय हक्कांवर दरोडा टाकण्याची तयारी उत्तम जानकर यांनी केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार या दोघांनीही त्याला पाठबळ दिले आहे.
काल परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विजयसिंह मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यामध्ये जो राजकीय करार झाला होता. तो करार असा होता की, 2024 च्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर उत्तम जानकर यांचे हिंदू खाटीक हे बनावट आरक्षण सर्टिफिकेट खरे ठरले, तर उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस मधल्या राखीव जागेवरचे उमेदवार असतील आणि त्यांना विजयी करण्याची जबाबदारी विजयसिंह मोहिते पाटील यांचे असेल.आणि जर का उत्तम जानकर यांचे आरक्षण प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टात रद्द झाले तर उत्तम जानकर तीन नावे सांगतील त्यातील विजयसिंह मोहिते पाटील यांनी एका नावाला पसंती द्यायची आणि त्याला आमदार करायचे… अशी ही कमिटमेंट ठरली आहे किंवा करार झाला आहे. त्यातूनच धैर्यशील मोहिते पाटील हे बीजेपीतून राष्ट्रवादीमध्ये आले आणि खासदार झाले आहेत. विधानसभेचे माळशिरस मधील चित्र काय होणार आहे हे स्पष्ट होईलच, परंतु एक गोष्ट आवर्जून सांगतो की, आरक्षण प्रमाणपत्रांचा महाघोटाळा सध्या महाराष्ट्र मध्ये सुरू आहे. आणि राज्यभर दलितांच्या राजकीय हक्कावर दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये अनेक जातींचे लोक अक्षरशः टपून बसले आहेत. यामध्ये अनुसूचित जमातींच्या जागेवरही राजकीय दरोडा टाकण्याची तयारी सुरू आहे. आणि असा दुसऱ्यांच्या राजकीय हक्कावर दरोडा टाकणाऱ्या “दरोडेखोर जाती” महाराष्ट्रामध्ये संघटित व आक्रमकपणे पुढे येत आहेत.
मित्रहो, महाराष्ट्रातील धनगर समाज हा केंद्रीय पातळीवर ओबीसी मध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तांच्या (NT )यादीमध्ये आहे. या मूळ भटक्यांच्या यादीमध्ये राजकीय प्रभावातून क आणि ड अशी वर्गवारी करून वंजारी आणि धनगरांनी इथे शिरकाव केला. मला आजही स्पष्ट आठवतंय, वंजारी आणि धनगर समाजाला भटक्या विमुक्तांमध्ये समाविष्ट करू नये म्हणून लक्ष्मण माने यांनी फार मोठे आंदोलन त्याकाळी उभे केले होते आणि लक्ष्मण माने यांच्या भूमिकेला दलित महासंघाच्या माध्यमातून मी स्वतः विरोध केला होता. वंजारा आणि धनगर समाजाच्या भटक्या विमुक्तांच्या यादीमधील प्रवेशाला मी आंदोलन करून साथ दिलेली आहे. म्हणजेच मी या जातींचा विरोधक नाही किंवा नव्हतो हे स्पष्ट होण्यात अडचण नसावी.
आता प्रश्न असा आहे की, धनगर समाज हा केंद्रामध्ये ओबीसी म्हणून लाभ घेत आहे. महाराष्ट्रामध्ये भटका विमुक्त म्हणून आरक्षणाचा लाभ घेत आहे. शिक्षण व नोकरीमध्ये हा लाभ घेत होते तोपर्यंत ठीक आहे. परंतु आता अनुसूचित जातीची खोटी प्रमाणपत्र तयार करून दलितांच्या राजकीय हक्कावर डल्ला मारण्याच्या मारण्याच्या तयारी सुरू झाली आहे. म्हणूनच मला या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधावे लागत आहे. माझे इतकेच म्हणणे आहे की, जे तुमचे आहे ते तुम्ही जरूर घ्या. पण जे दुसऱ्याचे आहे ते घेणे हा मूळ लोकांच्यावर अन्याय करणारा प्रकार आहे. तो थांबला पाहिजे म्हणून मी हा लेखन प्रपंच केला आहे. आज माळशिरस तालुक्यामध्ये धनगर समाजातील जवळपास 32 राजकीय लोकांनी अनुसूचित जातीचे दाखले काढले आहेत. यामध्ये अकलूजच्या एका माजी नगराध्यक्षाने ही “हिंदू खाटीक” म्हणून अनुसूचित जातीचा दाखला मिळविला आहे. आणखी एका माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापतीने ही अनुसूचित जातीचा बनावट आरक्षण दाखला बनवून घेतला आहे. याशिवाय, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा सरपंच पद जर मागासवर्गीय पडले तर त्याचा लाभ घेण्याच्या तयारीत हे सगळे धनगर राजकारणी आहेत. एकूणच, दलितांच्या न्याय हक्काची राजकीय चळवळ आता अधिक मजबूत बनवावी लागणार आहे यात शंका नाही.
माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जातीमधील मांग, महार, बौद्ध होलार, ढोर, चांभार आणि इतर सर्व जातींनी एकत्र येऊन उत्तम जानकर यांना उमेदवारी देऊ नये म्हणून मोठा मोर्चा काढला होता. या खऱ्या दलितांचाही उत्तम जानकरच्या उमेदवारीला माळशिरस मध्ये विरोध आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांना उमेदवारी देऊ नये असा आग्रह सर्व पक्षातील आणि संघटनातील दलितांनी धरला पाहिजे. शरद पवार साहेबांनी ही आपले पुरोगामी पुरोगामीत्व टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत.
आणखी एका गोष्टीचा खुलासा करतो, उत्तम जानकर हे माझे चांगले मित्र आहेत. दलित महासंघाने केलेल्या माळशिरस आणि अकलूज येथील आंदोलनामध्ये त्यांनी अनेक वेळा भेट दिली आहे. आम्ही एकत्र चहा पाणी सुद्धा घेतले आहे. म्हणजे आमचे वैयक्तिक संबंध मुळीच वाईट नाहीत. उत्तम जानकर हे एक धनगर समाजातील चांगले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे त्यांनी आमदार, खासदार होण्याला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. फक्त आमचे एवढेच म्हणणे आहे की, त्यांना मागासवर्गीयांच्या मतदारसंघातून उमेदवारी देऊ नये आणि त्यांनी सुद्धा मागासवर्गीयांचे राजकीय हक्क हिरावून घेण्यासाठी प्रयत्न करू नयेत. शरद पवारांनी त्यांना बारामतीतून उमेदवारी द्यावी, त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी किंवा विजयदादा आणि जानकर यांनी आलटून पालटून लोकसभेमध्ये संधी घ्यावी, यातील कोणत्याही गोष्टीला आमचा विरोध नाही. आमचे म्हणणे फक्त एवढेच आहे की, जे दलितांच्या न्याय हक्काचे आहे ते त्यांना मिळाले पाहिजे, अन्यथा समोर कोण आहे ते न बघता सर्व दलितांना एकत्र येऊन अशाप्रकारे बनावट आरक्षण प्रमाणपत्रांच्या आधारे जे लोक राजकारण करू इच्छितात, त्यांच्याविरुद्ध संघटितपणे आवाज उठवावाच लागेल.

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे
संस्थापक अध्यक्ष
दलित महासंघ, महाराष्ट्र

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!