महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर पासून साजरा होणार संविधानाचा अमृत महोत्सव :2024-25:घर घर संविधान.
इ झेड खोब्रागडे
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दि 10 ऑक्टोबर 2024 ला GR काढून येत्या 26 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रभर संविधान अमृत महोत्सव :घर घर संविधान हा संविधान जागराचा उपक्रम दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
संविधान फौंडेशन चे वतीने आम्ही ऑक्टोबर 2022 पासून प्रधान मंत्री, कॅबिनेट सेक्रेटरी, तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. याबाबत ,आम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, वरिष्ठ नेते , लोकसभेचे विरोधी पक्षनेते,महाराष्ट्रातील लोकसभा सदस्य यांना सुद्धा 2022 पासून निवेदने दिलीत आणि पाठपुरावा केला. देश पातळीवर संविधान अमृत महोत्सव :घर घर संविधान हा उपक्रम साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.केंद्र सरकारने अजून निर्णय घेतला नाही , तो त्वरित घेण्यात यावा.
या सप्टेंबर महिन्यात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पुन्हा ही मागणी केली. शोषित वंचितांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. अजूनही मांग गारुडी, गोंड, भटके विमुक्त, मुस्लिम मदारी व इतरही वंचित समाजाला ,त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्यामुळे, जातीचे दाखले मिळत नाही हे त्यांचे लक्षात आणून दिले. विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांचेकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे परंतु जातीचे दाखले देणे सुरू झाले नाही. त्यामुळे हा समाज सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित आहे हे त्यांचे निदर्शनास आणून दिले.याबाबत उचित निर्णय घेऊ असे पालकमंत्री व DCM यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर का असेना संविधान अमृत महोत्सव :2024-25 :घर घर संविधान साजरा करण्याचा चा 5 पानी GR निर्गमित झाला. प्रत्यक्ष भेटीत आम्ही उपमुख्यमंत्री यांना सुचविले होते की 36 ही जिल्ह्यात संविधान संमेलने आयोजित करावीत व राज्यस्तरीय समिती गठीत करावी.GR मध्ये हे प्रस्ताव अंतर्भूत करण्यात आले आहेत. खरं तर सामान्य प्रशासन विभागाने हा GR काढण्याची गरज होती. असो, या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही अभिनंदन करतो व आभार मानतो.
हा विषय घेऊन 19 सप्टेंबर 2024 ला लोकसत्ता कार्यालयात संपादक देवेंद्र गावंडे यांचेशी चर्चा झाली होती. बातमी प्रसिद्ध झाली होती. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स च्या सोशल कनेक्ट मध्ये आम्ही हे विषय घेऊन गेलो होतो. संपादक श्रीपाद अपराजित यांचेशी चर्चा झाली. सकाळचे संपादक प्रमोद कालबांडे यांचेसह इतरांनी ही या विषयाला प्रसिद्धी दिली व विषय लावून धरला. 2022 -23 मध्ये मुंबई सकाळचे मुख्यसंपादक राहुल गडपाले यांनी या विषयावर माझी मुलाखत घेतली होती. 26 नोव्हेंबर 2022 ला पत्रक काढून ,धम्म चक्र प्रवर्तन दिनी वितरण केले . दैनिक बहुजन सौरभ या वृत्तपत्राने या विषयाला सातत्याने प्रसिद्धी दिली, इतरही वृत्तपत्राने दिली. संविधान अमृत महोत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करनाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार. निर्णयानुसार ,कार्यक्रम राबविले गेले पाहिजे. आझादी चा अमृत महोत्सव ज्याप्रकारेसाजरा केला,किमान त्याप्रमाणे संविधान अमृत महोत्सव : घर घर संविधानचे कार्यक्रम, विशेषतः 36 ही जिल्ह्यात संविधान संमेलने घेतले जातील ही अपेक्षा आहे. संविधान दिवस हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला पाहिजे ही मागणी आम्ही केली आहे. शोषित वंचितांच्या वस्तीत संविधान घेऊन जाणेसाठी, लाभ मिळवून देणेसाठी, जगणे प्रतिष्ठेचे करण्यासाठी, वस्तीत सेवा सुविधा साठी शासन प्रशासनाने शोषित वंचितांचे वस्तीत जाऊन। संवेदनशीलतेने, प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. पालकमंत्री नागपूर यांनी याकडे लक्ष द्यावे ही विनंती. पुनश्च आभार.
इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि
संविधान फौंडेशन नागपूर
दि 10 ऑक्टोबर 2024.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत