हातच्या कंकनाला आरसा कशाला?
-शांताराम ओंकार निकम
बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेल्या अक्षय शिंदे याच्या एनकाऊंटरवरून काही मुद्दे समोर येतात.
अक्षय शिंदे हा सव्वा महिने तळोजा जेल मध्ये होता. त्या दरम्यानची त्याची वागणूक कशी होती.तो खरोखरच हिंस्र होता का?
त्याला नेमके कुठे घेऊन जात होते? बदलापूर की ठाणे?
बदलापूरला नेत असतील तर मुंब्रा बायपासचा मार्ग का निवडला?
शीळ फाट्यावरून बदलापूरला जाणारा शॉर्टकट मार्ग का सोडून देण्यात आला?
ज्याठिकाणी अक्षयने पोलिसांकडून पिस्टल हिसकवली,,
तो भाग निर्जन आणि सीसी टीव्ही नसलेला का निवडला? अक्षयला माहीत होते का की, इथे सीसी टीव्ही नाही आहे,हा भाग निर्जन आहे?
या निर्जन ठिकाणी याअगोदरही एन्काऊंटर झाले आहेत का?
अक्षयला बंदूक चालवता येत होती की?
बंदूक हिसकावून घेऊन तिचा ट्रिगर दाबेपर्यंत पोलीस काय करत होते?
झटापटीत जर गोळी लागली असेल तर किती पोलिसांबरोबर झटपटी झाली? सगळेच त्याच्यावर तुटून पडले की, फक्त सपोनि निलेश मोरे?
सपोनि निलेश मोरे यांच्या मांडीत अक्षयने गोळी झाडली, पण सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी बरोबर त्याच्या डोक्यातच गोळी झाडली? ती गोळी अनवधानाने डोक्यात लागली की नेम धरला होता?
गुन्हेगारांच्या मांडीखाली गोळी मारली जाते,हे अनेक एनकाऊंटरमध्ये भाग घेतलेल्या संजय शिंदे यांना माहीत नव्हते का?
अक्षयने तीन गोळ्या झाडल्या, असे वपोनी संजय शिंदे यांचे म्हणणे आहे,एक गोळी सपोनि मोरे यांच्या पायाला लागली, मग उरलेल्या दोन गोळ्या पोलिसांनी जमा केल्या का?
अक्षयने बंदुक हिसकवल्याचे संजय शिंदे यांच्या किती वेळाने लक्षात आले?
पोलीस व्हॅन थांबवण्यात आली होती का? असेल तर तेथून जाणाऱ्या वाहनांना तो प्रसंग दिसला असेल?
ज्या ठिकाणी गोळी चालवण्यात आली ते ठिकाण निर्जन असून तेथून जास्त वाहने जात नाहीत याचा फायदा अक्षयने घेतला की पोलिसांनी घेतला?
अक्षयची शरीरयष्टी पाहिली असता तो बंदूक हिसकावून घेऊ शकत नाही,असे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे,त्यात तथ्य आहे का?की विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरण्यासाठी हा कांगावा करत आहे?
सर्वदूर मा.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उंचावलेल्या हातात बंदूक घेऊन ‘बदला पुरा ‘ असे बॅनर लावण्यात आले आहेत.अशी जाहीरपणे बंदूक दाखवता येते का?
तसेच मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायफलमधून निशाणा साधत असताना फोटो देऊन ‘करेक्ट कार्यक्रम’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.ती बरोबर आहे का?
हा एन्काऊंटर प्रायोजित होता का? सरकारने पोलिसांना आदेश दिले होते का?
सन १९९८ टेन२००८ या २० वर्षांच्या कालकीर्दीत छोटा राजन,मंचेकर ,छोटा शकील वैगरेच्या टोळीतील ५० ते ६० नामचीन गुंडांचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला . त्या टीममध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे हेही सामील होते.अनुभवी संजय शिंदे यांच्याकडे अक्षय शिंदेंचा तपास ठरवून देण्यात आला होता का?
भारतीय घटनेच्या मूलभूत तत्वात सर्वांना जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे.मग अक्षयचा एन्काऊंटर करून त्याच्या जगण्याचा मूलभूत अधिकार हिरावून घेऊन घटनेची पायमल्ली झाली आहे का?
एन्काऊंटर नंतर जल्लोष करणारे घटनेला मानत नाहीत का?
हा देवाचा न्याय म्हणणारे अप्रत्यक्षपणे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊ यांच्याकडे बोट दाखवत आहेत की,आकाशातील देवाकडे बोट दाखवत आहेत?
भारत हा भूतदया मानणारा देश आहे.येथे प्राणिमात्रांवर पण दया केली जाते.अजमल कसाब याने शेकडो निरपराध नागरिकांचा बळी घेतला होता. त्यालाही त्याची बाजू मांडण्याची संधी न्यायालयाने दिली होतीच ना?
१९९३च्या मुंबई सीरिअल बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन यालाही पोलिसांनी बाजू मांडण्याची संधी देऊन,न्यायालयाच्या आदेशाने २०१५ मध्ये फाशी दिली होती.
उद्या दाऊदला पकडून आणले तर लगेच गोळ्या घातल्या जातील का? त्याच्यावर पण खटला भरला जाईल ना?
संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे विरोधात एफ आय आर दाखल केला आहे त्यात ते म्हणतात,
“आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन येत असताना मुंब्रा बायपास येथे मुंब्रा देवीच्या पायथ्याशी आलो असता.अचानक आरोपी अक्षय शिंदे सपोनि मोरे यांच्या पॅन्टला खोवलेले पिस्तूल बाळाचा वापर करून खेचण्याचा प्रयत्न करू लागला.तेंव्हा आरोपी ‘मला जाऊ द्या ‘ असे म्हणत होता.
झटापटीत सपोनि निलेश मोरे यांचे पिस्तुल लोड झाले आणि त्यातून एक गोळी सुटून त्यांच्या डाव्या मांडीला लागली.(नंतर) आरोपीने पिस्तुलचा ताबा घेऊन,’आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही.’असे बोलून आरोपी अक्षय शिंदेने माझे व पो.हवालदार हरीश तावडे यांच्या दिशेने आम्हाला मारण्याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.पण आम्ही सुदैवाने वाचलो.
आता प्रश्न असा आहे की,
वपोनी संजय शिंदे आणि पो.हवलदार तावडे हे संजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून अक्षय शिंदे याच्या समोर बसले होते.
अक्षय शिंदे आणि पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्यात झटापट किती वेळ चालली ? आपण समजू या एक किंवा अर्धा मिनिट चालली. असे असेल तर दोन तीन फुटावर बसलेल्या एन्काऊंटर फेम संजय शिंदे यांना मध्ये पडून त्याला अडवता येत नव्हते का? शिंदेंच्याच म्हणण्यानुसार झटापटीत पिस्तुल लोड झाले आणि एक गोळी सपोनि निलेश मोरे यांना लागली.याचा अर्थ जेंव्हा गोळी लागली तेंव्हा पिस्तुल कव्हरमध्ये होते. गोळी लागल्यावर मोरे खाली पडले.म्हणजे पिस्तुल त्यांच्यासोबत खाली पडले असणार किंवा त्या अगोदर काढून घेतले असेल.आणि शिंदे व तावडे यांच्यावर रोखले असेल ,तर इतका वेळ म्हणजे अर्धा पाऊण मिनिट तिघे काय करत होते.(गाडीत चार पोलिस कर्मचारी होते).अक्षय शिंदें कधी आपल्यावर गोळी झाडण्यासाठी बंदूक रोखतो ,आणि मग आपण स्व संरक्षणासाठी गोळ्या झाडू याची वाट पाहत होते का?
दुसरा मुद्दा असा की,
शिंदे आपल्या एफआयआरमध्ये म्हणतात की, आरोपी अक्षय शिंदे यांचे रौद्र रूप व देहबोली पाहून तो आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारेल अशी माझी खात्री झाली म्हणून मी व माझे सहकारी यांचे स्वरक्षणार्थ माझेकडील पिस्टलने १ गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली.त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला.व त्याच्या हातातील पिस्टलचा ताबा सुटला.
याच्या अगोदरच्या अनुच्छेदामध्ये वपोनी संजय शिंदे म्हणतात,”निलेश मोरे खाली पडल्यावर अक्षय शिंदे याने त्यांचे पिस्टल घेऊन ,’आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही’असे म्हणून मी आणि पो.हवालदार यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या पण सुदैवाने त्या आम्हाला लागल्या नाहीत.
आता ही गोष्ट खरी असेल तर ,अगोदरच्या अनुच्छेदामध्ये म्हटल्याप्रमाणे ,”त्याचे रौद्र रूप पाहून मी व माझ्या सहकाऱ्यांच्या स्वराक्षणासाठी मी त्याच्यावर एक गोळी झाडली.’
असे त्यांचे म्हणणे आहे.म्हणजेच अक्षय शिंदेने संजय शिंदे व तावडे यांच्यावर गोळी झाडण्यागोदरच संजय शिंदे यांनी गोळी झाडली आहे.हे सिद्ध होते.
अक्षय शिंदे सपोनी निलेश मोरे यांच्या पॅंटीच्या पॉकेटमधून पिस्टल काढत असताना नक्कीच बेसावध होता. त्यावेळी संजय शिंदे व पो.हवालदार तावडे तसेच अक्षयच्या बाजूला असलेले पो.हवलदार अभिजित मोरे काय करत होते?
ते तिघे मिळून त्याला पकडू शकत नव्हते का?
संजय शिंदे पुढे असे म्हणतात की,’त्याला मी गोळी मारल्यानंतर तो खाली पडला,त्याचा पिस्टलवरचा ताबा सुटला.त्यानंतर आम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवले.व वाहन चालकाला सूचना देऊन वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल ,कळवा येथे आणून आरोपी अक्षय शिंदे ,सपोनि निलेश मोरे व मी औषधोपचारासाठी दाखल झालो.त्यानंतर सपोनि निलेश मोरे व मला पुढील औषधोपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल,ठाणे येथे दाखल केले असून पुढील औषधोपचार चालू आहेत.आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मयत झाल्याचे मला नंतर समजले.
मुंब्रा बाय पास ते छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा यातील अंतर साधारणपणे ८ किलोमीटर आहे आणि रोडने पोचायला साधारणपणे १८ मिनिटे लागतात.
मुद्दा असा आहे की, सुरुवातीला संजय शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे ,”आरोपी अक्षय शिंदे यांचा रुद्रावतार बघून तो आम्हाला मारेल या भीतीने मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या स्वरक्षणार्थ मी त्याच्यावर गोळी झाडली.”याचाच अर्थ अक्षयने गोळ्या झाडल्या नाहीत.
त्यात पुढे ते म्हणतात,” सुदैवाने आम्ही वाचलो.” म्हणजे जरी गोळ्या झाडल्या असतील तर त्या त्यांना लागल्या नाहीत.
त्यांनीच वाहनचालकाला गाडी कळवा हॉस्पिटलला घेण्यास सांगितली होती.
म्हणजे ते पूर्ण शुद्धीवर होते.
अक्षय शिंदेला त्यांनी डोक्यात गोळी झाडली,त्यामुळे तो खाली कोसळला.डोक्यात गोळी लागलेली व्यक्ती किती वेळ वाचू शकते? त्यांना एन्काऊंटरचा अनुभव असल्याने ते नक्कीच माहीत असेल.
तरीही ते म्हणतात,”मला आणि निलेश मोरे यांना उपचारासाठी ज्युपिटर येथे आणण्यात आले.अक्षय शिंदे मयत झाल्याचे मला नंतर( म्हणजे ज्युपिटर येथे आल्यावर) समजले.’
१५ ते १८ मिनिटे ते समजू शकले नाहीत का की,अक्षय शिंदे मयत झाला आहे.१९९२, पासून ते पोलीस दलात आहेत म्हणजेच ३२ वर्षे पोलीस खात्यात नोकरी करून अनेक एन्काऊंटरमध्ये भाग घेऊन १५ मिनिटे तरी डोक्यात गोळी लागलेल्या अक्षय शिंदे बरोबर गाडीत असून त्यांना कळले नाही का की, अक्षय मयत झाला आहे.
त्यांच्या ३२ वर्षांच्या अनुभवाचा फायदा नवीन रुजू झालेल्या पोलिसांनी घ्यावा काय?
अक्षय शिंदे याला गोळी झाडल्यापासून कळवा येथील हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंतचे सीसी टीव्ही फुटेज पाहिले की, कळेलच की वपोनी संजय शिंदे हे अत्यवस्थ होते, बेशुद्ध होते की कसे?
वपोनी संजय शिंदे यांच्या जबाबाबतच त्यांनी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर केल्याचे सिद्ध होते.
हाताच्या कंकनाला आरसा कशाला?
हे सगळे खरे असले तरी अक्षय शिंदे याची बाजू घेण्याची गरज नाही. पण त्याला शिक्षा न्यायालयाने दिली असती.फेक एन्काऊंटर (?)करायची गरज होती का?
शंभरच्यावर एन्काऊंटर केलेले प्रदीप शर्मा यांना फेक एन्काऊंटर केले म्हणून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, ते अपिलात गेले आहेत ,हे विसरून चालणार नाही.
न्यायालयानेही या एन्काऊंटरवर ताशेरे ओढले आहेत.हेही लक्षात घ्यायला पाहिजे.
सत्य जास्त काळ लपून राहत नाही,ते समोर येईलच.
शांताराम ओंकार निकम
२६ सप्टेंबर २०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत