दिन विशेषप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

दोरखंड त्याच्या हातून निसटला आणि तो वाहून गेला! त्याला आक्रोश करता आला नाही कारण तो मूकबधिर होता!

माणदेश बारोमास दुष्काळी असणारा भाग. कधी नव्हे तो यंदा माणगंगेला पूर आलाय. ती दुथडी भरून वाहतेय. परवा दिवशी या नदीपात्रात एक विलक्षण दुःखद घटना घडली. माण – दहिवडी तालुक्यातील म्हसवड हे छोटंसं गाव.

माण नदी दहिवडीवरून गोंदवलेजवळून वाहत म्हसवडजवळ येते, तिथून पुढे काही अंतरावर राजेवाडी धरणात नदी रोखून धरलीय. माणदेशातला एव्हढाच भाग काहीसा सुपीक आहे बाकी सगळा आनंद!

तर या म्हसवड गावालगत असणाऱ्या शेम्बडेवस्तीवर अठरा वर्षांचा हणुमंत राहायचा. तो यंदा दहावीला होता. तो जन्मतः मूकबधिर होता. खेड्यात पूर्वी अशांचे अतोनात हाल व्हायचे, लोक त्यांचं भांबड करून ठेवायचे!

हणुमंतच्या आईवडिलांनी ठरवलं की त्याला असंच गावात ठेवून वाया जाऊ द्यायचं नाही. त्यांनी त्याला साताऱ्याच्या मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेत घातलं. तो अभ्यासात हुशार होता. अल्पावधीत तो शिक्षकांच्या गळ्यातला ताईत झाला.

शाळेला सुट्टी लागली की त्याला गाव खुणवायचं, मित्र आठवायचे, त्यांचं शेतशिवार डोळ्यापुढे तरळायचं! कधी एकदा गावी जाईन असं त्याला व्हायचं. आताही गणेशोत्सवाची सुट्टी लागताच तो गावी आला होता.

रविवारी तो आणि त्याची आई शेतातली मोटर चालू करायला गेले. शेतात जायचं म्हटलं तर एरव्ही सहज जाता यायचं, आता नदीला पूर आल्याने तशी परिस्थिती नव्हती. मात्र ही गोष्ट त्याने पूर्वीही अनुभवली असल्याने तो आईसोबत नदीपात्राकडे गेला.

नदीला पाणी वाढलं तेव्हा दोन्ही बाजूस येजा करण्यासाठी मोठा दोरखंड बांधण्यात आला होता. त्या दोरखंडास धरून त्याने अनेकदा येजा केली होती.

रविवारी दुपारी तो दोरखंडास धरून शेताकडे निघाला. मात्र ऐन मध्यभागी असताना दोरखंड त्याच्या हातून निसटला आणि तो वाहून गेला! त्याला आक्रोश करता आला नाही कारण तो मूकबधिर होता!

इकडे नदीपात्रापाशी उभ्या असलेल्या त्याच्या आईच्या डोळ्यादेखत तो वाहून गेला! त्या माऊलीला काय वाटले असेल! ती देखील आरडा ओरडा करून कुणाला हाक मारून बोलावू शकली नाही कारण ती ही जन्मतः मूकबधिर होती!

ती धावतच घरी गेली आणि तिने खाणाखुणा करून घटना कथन केली. हणुमंतचे वडील आले, अन्य नातलग आणि गावकरीही आले मात्र तोवर हणुमंत पाण्यात वाहून गेला होता.

हणुमंतच्या आईला आपल्याला बोलता येत नाही याचे फारसे शल्य नव्हते कारण साऱ्या कुटुंबाने त्यांना सांभाळून घेतले होते मात्र ज्या दिवशी आपला तरणा पोरगा डोळ्यादेखता वाहून गेला त्यादिवशी त्या माऊलीला आपल्याला बोलता येत नाही याचं अतोनात दुःख झालं असणार!

माणगंगेच्या उदरात गडप झालेल्या हणुमंताच्या वेदना नदीला कळल्या असतील का?
नदी ही देखील आईच आहे, तिला एका आईचं आणि तिच्यापासून तिनेच हिरावून घेतलेल्या मुलाचं मूक दुःख उमजलं असेल!

आपल्या अवती भवती रोज शेकडयाने माणसं मरत असतात, आपण दखल तरी कुणाची नि कशी घेणार!
मात्र काहींचं मरण चटका लावून जातं, भले आपण उभ्या आयुष्यात त्यांना भेटलेले असू नसू!

जी गोष्ट आपल्याला अगदी विनासायास सहज मिळालेली असते त्याची आपल्याला शून्य किंमत असते. आपण अगदी सहज बोलू शकतो मात्र काहींना वाचा नसते त्यांची किती तगमग होत असेल, खास करून असा दुःखद प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडल्यावर! आपण बोलू शकतो ही गोष्ट किती मोठी आहे याचे आपल्याला नेमके भान नसते!

  • समीर गायकवाड

नम्र विनंती – माण तालुक्याचे आमदार, तसेच हा भाग ज्या लोकसभा क्षेत्रात येतो ते खासदार, अन्य लोकप्रतिनिधि वा अन्य प्रभावी राजकीय व्यक्ती, शासकीय अधिकारी यांच्यापर्यन्त ही माहिती कुणी पोहोचवू शकत असेल तर कृपया ही माहिती फॉरवर्ड करावी. कदाचित त्या माऊलीस काही अर्थसहाय्य होऊ शकेल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!