मर्त्य लोकी, जिवंत मनुस्मृती!
ढोल गवार,शुद्र और नारी….! म्हणजे ,आमची तुलना ढोल आणि गुरांशी केली आहे.हा आमच्यावर अन्याय आहे.आम्ही सहन नाही करणार.खूप राग आला.आलाच पाहिजे.मला सुद्धा राग आला.म्हणून संतापाने मनुस्मृती चे पुस्तक जाळून टाकले.कोण तो मनु पुरोहित?जर सापडला तर जिवंत नाही सोडणार!
मनुस्मृती चे पुस्तक जाळले.आता मी शुद्र नाही.मी ढोल नाही.मी गवार नाही.असा गैरसमज करून घेतला.पण प्रत्यक्षात आज मनुस्मृती चे आम्ही तंतोतंत पालन करीत आहोत.
भारतातील महाराष्ट्र राज्यातील जळगाव शहर आहे.तेथील आमदारांच्या कार्यालयासमोर महिला ,पुरूषांची मोठी लाईन लागलेली आहे.कशासाठी?तेथे पांच किलो धान्य फुकट मिळते.तेथे आनंदाचा शिधा मिळतो.तेथे फुकट साडी मिळते.तेथे फुकट भांडी मिळतात.तेथे गणपती नवरात्री शिवजयंती उत्सव साठी देणगी मिळते.दारूसाठी पैसे मिळतात.दारू सुद्धा मिळते.दारू प्यायल्यानंतर स्वर्ग मिळतो.
या लाईन मधे कोण आहेत?ज्यांनी वर्णव्यवस्थेचा विरोध केला.जातीव्यवस्थेचा विरोध केला.तिरस्कार केला.ज्यांनी मनुस्मृती पुस्तक जाळले.मला नाही वाटत या महिला व पुरूषांना कोणी मनु पुरोहित किंवा त्यांचा वारस शिकवत असेल कि , तुम्ही शुद्र आहात.जा फुकटचे मिळते आहे, घेऊन या.काय गरज आहे,कोणी शिकवण्याची?ती तर प्रवृत्ती आहे.जाता जात नाही.जाळता जळत नाही.
मनुस्मृती मधे आमचा उल्लेख शुद्र म्हणून केला.म्हणून आम्ही निषेध करतो.पुस्तक जाळतो.पण शुद्र वृत्ती प्रवृत्ती ला विरोध करीत नाही.कोणीच करीत नाहीत.का?जेथे विना कष्टाचे मिळते तेथे विरोध का करावा?मिळते तर घेऊन घ्यावे.त्या बदल्यात मत देऊन यावे.काय गरज आहे मताची?मत म्हणजे काय असते हो?काय किंमत त्याची?कारण त्यासाठी आम्ही काहीच केले नाही.ना मत पेरले.ना खत पाणी घातले.ते तर आपोआपच उगले.तरोटा सारखे.तसे आम्हाला आपोआपच चिपकले.आम्ही तर कधीच कोणाकडून ही मताचा अधिकार मागितला नव्ह्ता.जर न मागता बळजबरीने अंगावर येत असेल तर मताचे ओझे का बाळगावे?नको ते मतांचे ओझे.म्हणून आम्ही विकून टाकतो.घेणारा काहीही करो.आम्हाला काय खंत त्याची?
अशी विचारधारा काल होती,आजही आहे ,उद्याही असेल.ती कोणीही खोडून काढत नाही.आतापर्यंत तरी कोणीही भाषण, संभाषण, व्याख्यान, प्रवचन, किर्तन,शाळा , कॉलेज मधे सांगत नाहीत .कारण आम्ही मर्त्य लोक मनापासून मनुस्मृती चे अनुपालन करतो.
… शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
२२/९/२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत