संविधानाची पूजा नव्हे, प्रामाणिक अंमलबजावणी करा
सुरेश सावंत
∆ संविधानाचे ‘मंदिर’ करणाऱ्या सरकारच्या या कृतीचा निषेध
∆ संविधानाचे ‘मंदिर’ नको ‘दालन’ करा
महाराष्ट्रातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय टी आय)’ संविधान मंदिर’ उभारले गेले असून त्यांचे आज १५ सप्टेंबर २०२४ रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत.
संविधान ही ऐहिक बाब आहे. देशाच्या कारभाराची ती नियमावली तसेच हा कारभार कोणत्या मूल्यांवर चालणार हे सांगणारा तो ग्रंथ आहे. त्याविषयी आदर जरुर हवा, पण त्याला पावित्र्य अर्पण करुन त्याचे मंदिर करु नये. संविधानातील विचारांना छेद देणारी ही सरकारची कृती आहे. याला सार्वत्रिक विरोध झाला पाहिजे. भटजी सांगतो तेच देवाचे म्हणणे. त्यावर शंका घ्यायची नाही. हीच बाब हे लोक करतील. हे सांगतील तेच संविधान. फुले अर्पण करून पूजा करून त्यास पवित्र मानायचे. प्रश्न विचारायचा नाही, असाही आदेश हे लोक पुढे काढतील. व्यवहार तर यांचा तसाच सुरु आहे. स्त्रीला देवत्व बहाल केले की तिच्यावर अन्याय करायला मोकळे हीच रीत इथे आहे.
संविधानाबद्दल काही करायचेच असेल तर ‘संविधान दालन’ सर्व सरकारी आस्थापना, संस्थांमध्ये उघडायला हवे. त्यात प्रत्यक्ष संविधान तसेच त्याची चिकित्सा करणारे, त्याचा अर्थ उलगडणारे साहित्य असावे. त्यातील मूल्यांचा परिचय करुन देणारे प्रदर्शन ठेवावे. संविधान विषयक व्याख्याने, चर्चा आयोजित कराव्यात.
संविधान दालन लोकांना संविधान साक्षर बनवेल; तर संविधान मंदिर त्याची केवळ पूजा बांधणारे मूढ तयार करेल. सत्ताधाऱ्यांना तेच हवे आहे. संविधान बदलणार म्हणून होणारा आरोप मंदिर करून दूर होणार नाही. उलट हा आरोप अधिक बळकट होईल. संविधान डोक्यात न घेता केवळ डोक्यावर घ्यायला सांगणे तसेच त्यावर माथा टेकवला की संविधान पाळले असा भ्रम तयार करणारे हे लोक आहेत.
यांच्यापासून सावध राहा. त्यांच्या या मंदिर करण्याच्या उपक्रमाला विरोध करा. त्याऐवजी संविधानाचे प्रबोधन करणारे संविधान दालन करण्यास भाग पाडा. संविधान वाचवा.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत